भारतात रेल्वे सुरू होऊन जवळपास 170 वर्ष झाली आहेत. ब्रिटिश काळात सुरू झालेली रेल्वे आजही भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. देशात सर्वाधिक लोकांना नोकऱ्या या भारतीय रेल्वेच्या माध्यमातूनच मिळतात. जवळपास 10 ते 12 लाख नागरिक भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.
भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. विशेष म्हणजे गेल्याकाही वर्षात रेल्वेमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. सोयी सुविधांनी सज्ज अशा अनेक नवीन ट्रेन्स रुळावरून धावताना दिसत आहेत. मात्र, जवळपास 2 लाख कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या रेल्वेचा प्रवास आता तोट्यातून नफ्याच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसून येते. मागील काही वर्षात भारतीय रेल्वेत कशाप्रकारे बदल झाला आहे व रेल्वेची नक्की कमाई कशी होते? त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
मागील दशकात भारतीय रेल्वेत अमुलाग्र बदल
गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेत अमुलाग्र बदल झाल्याचे पाहायला मिळत असून, याचा फायदा प्रवाशांनाही होत आहे. कमी तिकीट दरात प्रवाशांना वंदे भारत, अमृत भारत सारख्या अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या सेमी हाय-स्पीड ट्रेन्सच्या माध्यमातून प्रवास करण्याचा अनुभव मिळत आहे. याशिवाय, देशभरात 1 हजारपेक्षा अधिक अमृत भारत रेल्वे स्टेशन्सची निवड करण्यात आली आहे. या रेल्वे स्टेशन्सला प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आधुनिक बनवले जाणार आहे.
भारतीय रेल्वेची कमाई कशी होते?
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज जवळपास 2.4 कोटी लोक प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असले तरीही सर्वाधिक कमाई मात्र तिकिटाच्या माध्यमातून होत नाही. मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई होते. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या माध्यमातून जवळपास 1.62 लाख कोटींची कमाई झाली. एकूण महसुलात हा वाटा जवळपास 70 टक्के आहे.
मालवाहतुकीपाठोपाठ रेल्वेची कमाई ही पॅसेंजर ट्रेन्सद्वारे होते. 2022-23 या आर्थिक वर्षात पॅसेंजर ट्रेन्सच्या माध्यमातून रेल्वेला जवळपास 63 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला. या व्यतिरिक्त इतर माध्यमातूनही भारतीय रेल्वेला महसूल मिळते. जमीन भाडेपट्टी, जाहिरात, निविदा अशा इतर माध्यमातूनही रेल्वेची कमाई होते. विशेष म्हणजे दरवर्षी रेल्वेच्या महसूलात वाढ होताना दिसत आहे.
कमाई वाढवण्यासाठी रेल्वे वापरू शकते हा मार्ग
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रेल्वेने 100 रुपये कमवण्यासाठी 98.10 रुपये खर्च केले आहे. म्हणजेच या आर्थिक वर्षात रेल्वेने 98.10 टक्के ऑपरेटिंग रेशिओसह 2,40,177 कोटी रुपये महसूल गोळा केला. रेल्वेच्या माध्यमातून होणारी कमाई वाढवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. रेल्वेच्या खासगीकरणापासून ते नवीन ट्रेन्स सुरू करण्यापर्यंत अनेक नवीन प्रयोग केले जात आहे. याशिवाय, जनरल, स्लिपर कोचच्या तुलनेत एसी कोचची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तिकीट नसतानाही एसी कोचमधून प्रवास करणाऱ्याकडून मोठा दंड आकारायला हवा.
सरकारद्वारे 100 वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. या ट्रेन्सला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. वंदे भारत, अमृत भारत ट्रेन्सची संख्या वाढवल्यास नक्कीच फायदा हऊ शकतो. तसेच, रेल्वेला सर्वाधिक महसूल हा मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे मालवाहतुकीची सेवांचा विस्तार केल्यास जास्तीत जास्त महसूल मिळू शकेल.