Company Name Change : एखाद्या कंपनीला एखादं नाव दिलं तर शेवटपर्यंत तेच ठेवलं पाहिजे असं नसतं. काही कारणास्तव जर आपल्याला या नावामध्ये बदल करायचे असतील तर तसं आपण करु शकतो. मात्र, यासाठी कंपनीची व सरकारची ठरलेली प्रक्रिया असते त्यानुसारच आपल्याला कंपनीचं नाव बदलता येतं.
आत्तापर्यंत अनेक नामांकित कंपन्यांनी सुद्धा आपल्या कंपनीची नावं बदलेली आहेत. यामध्ये अलिकडचंच उदाहरण द्यायचं म्हणजे फेसबुक. आज फेसबुक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या नावाने ओळखला जातो. तर अॅपल या कंपनीचं पूर्वीचं नाव हे अॅपल कम्प्युटर असं होतं. मात्र या कंपनीने आयफोन्सची निर्मिती करण्यास सुरूवात केल्यावर कंपनीला व्यापक स्वरूप यावं यासाठी अॅपल हे नाव धारण केलं.
कंपनीचं नाव बदलण्याची कारणे काय असतात?
कंपनीचं नाव बदलण्याची अनेक कारणे असू शकतात. जसं की, कंपनीच्या कामाचे स्वरूप बदलले असेल, काम हे व्यापक स्वरूपाचं झालं असेल तर ते सुचित करण्याजोगं नावं असणं गरजेचं असतं त्यामुळे कंपनीचं नाव बदलण्याला प्राधान्य दिलं जातं. काही वेळेला कंपनीचं नाव हे कालबाह्य होतं, ते आधुनिकतेशी मिळतं-जुळतं असावं यासाठी सुद्धा बदललं जातं. तर अनेकदा काही कारणास्तव कंपनीची प्रतिमा मलीन झाली असेल, नव्याने कंपनीची सुरूवात करायची असेल तर कंपनीची ओळख असलेलं नाव, लोगो या गोष्टी बदलण्यास प्राथमिकता दिली जाते. तर काहि वेळेस एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये जेव्हा विलीन होत असते तेव्हा बहुतांशी वेळा कंपनीचं नाव हे बदललं जातं.
कंपनीचे नाव बदलण्याची प्रक्रिया कशी असते?
- कंपनीची नाव बदलताना सर्वप्रथम कंपनीच्या बोर्डाची म्हणजे संचालक मंडळाची बैठक आयोजित करून या बैठकीत नाव बदलण्या संदर्भात प्रस्ताव सादर करावा लागतो.
- हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर संचालक अथवा कंपनी सचिवाच्या माध्यमातुन कॉर्पोरेट मंत्रालयाच्या रिझर्व्ह यूनिक नेम अंतर्गत अर्ज दाखल करावा. 
 या ठिकाणी अर्ज दाखल करताना कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर सह नविन नाव नोंदवावे लागते. यावेळी हे नाव अन्य कोणत्या कंपनीचे नाहीये याची सरकारच्या पोर्टलवर खात्री करून घ्यायची असते.
- कॉर्पोरेट मंत्रालयाकडून नविन नावास समंती मिळाल्यावर कंपनीला विशेष अशी एक्सट्राओर्डिनेअरी जनरल बैठक (EGM) आयोजित केली जाते. या बैठकीच्या माध्यमातून मेमोरेडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये हे नविन नाव समाविष्ट केलं जातं.
- कंपनीच्या इजीएम (EGM) मध्ये नावाची घोषणा केल्यावर रजिस्टार ऑफ कंपनीज अंतर्गत एमजेटी - 14 अंतर्गत 30 दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावा लागतो.
- यानंतर कंपनीला INC-24 फॉर्म भरून तो सरकारच्या परवानगीसाठी सादर केला जातो. यावेळी या अर्जासोबत EGM बैठकीचे मीनिट्स, प्रस्ताव मंजूर झाल्याची कॉपी, मेमोरेडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये नाव समाविष्ट केल्याची कॉपी असे महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करावी लागतात.
- सगळ्यात शेवटी रजिस्टार ऑफ कंपनीज कडून हा INC-24 फॉर्म तपासून संमत झाल्यावर 15 ते 20 दिवसाच्या आत कंपनीला नविन नावाचे प्रमाणपत्र देऊन ते कायम केलं जातं.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            