देशभरामध्ये गृहखरेदी जोरदार सुरू असून मागील वर्षाचा सदनिका विक्रीचा रेकॉर्ड या वर्षात मोडला आहे. प्रत्येक वर्षी गृहनिर्माण क्षेत्र 50 टक्के वेगाने वाढत आहे. तर नवीन प्रकल्प 101 टक्के प्रति वर्ष या वेगाने वाढत आहेत. 2022 वर्षात 4 लाख 31 हजार 510 सदनिका बांधण्यात आल्याचे प्रॉपटायगर या कंपनीने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
अहवालातील माहितीनुसार 2022 वर्षात 3 लाख 8,940 सदनिकांची विक्री झाली. मागील वर्षामध्ये 2 लाख 5 हजार 940 सदनिका विकल्या गेल्या होत्या. ही आकडेवारी देशातील सात शहरांची आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपोलिटन रिजन आणि पुण्याचा समावेश आहे.
“गृहनिर्माण क्षेत्रापुढे अनेक आव्हाने असतानाही यावर्षी चांगली वाढ नोंदवली आहे. जास्त मागणी आणि लोकांचा घर खरेदीकडे असलेला सकारात्मक दृष्टीकोन ही जमेची बाजू असल्याचे मान्य करावे लागेल. व्याजदर वाढत असतानाही ग्राहक घर खरेदीस पसंती आहे. मॉर्गेज व्याजदराचा विचार न करता ग्राहक कमी किमतीतही घर बुक करत असल्याचे प्रॉपटायगर कंपनीचे चीफ फायनान्शिअर अधिकारी विकास वाधवान यांनी सांगितले.” चालू वर्षात 4 लाख 31 हजार 510 घरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती. ही वाढ 2021 च्या तुलनेत 101 टक्क्यांनी जास्त आहे. 2015 च्या तुलनेत सदनिकांची नोंदणी 6 टक्क्यांनी वाढली आहे.
सर्वात जास्त गृहनिर्मिती मुंबई शहरात झाली. एकून नव्या प्रकल्पांपैकी 39 टक्के प्रकल्प मुंबईत उभे राहिले. त्याखालोखाल पुणे आणि हैदराबाद शहरात गृहप्रकल्पांची निर्मिती झाली. शेती क्षेत्रानंतर गृहनिर्माण क्षेत्र रोजगार निर्मितीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे गृहनिर्माण क्षेत्राची वाढ काही काळ खुंटली होती. मात्र, 2022 वर्ष बांधकाम व्यवसायिकांसाठी चांगले ठरले. नव्या वर्षातही गृहनिर्माण क्षेत्राची चांगली वाढ होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.