प्रश्न – मला नवीन घर खरेदी करायचे आहे. घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, यासाठी मार्गदर्शन करावे.
महामनीचे उत्तर – घर खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. मात्र, तरीही स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण महिनाभर मेहनत करून मिळणारा पगार घरासाठी गुंतवतात. परंतु, व्यवस्थितपणे तपासणी न करता घर खरेदी केल्यास भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा बिल्डर्स घराची खूपच आकर्षक किंमत सांगतात. या कमी किंमतीच्या नादात अनेकजण इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून, कोणतीही पडताळणी न करता थेट घर खरेदी करतात. मात्र, हे घर अनाधिकृत जागेवर बांधलेले असल्यास अथवा तलाव, नदीच्या जागेवर असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे घर खरेदी करताना काही गोष्टींची विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
घर खरेदी करताना या गोष्टीकडे द्या लक्ष
बजेट व घराची किंमत- घर खरेदी करण्यापूर्वी तुमचे बजेट ठरवणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या भागात घर खरेदी करण्याचा विचार करत आहात, तेथील किंमतीची माहिती घ्या. बिल्डर घराच्या किंमतीच्या तुलनेत जास्त रक्कम तर मागत नाहीये ना हे तपासा व त्यानुसार निर्णय घ्या.
सोयीसुविधा – तुम्ही ज्या ठिकाणी घर घेत आहात, तेथे पाणीपुरवठा, वीजपुरवठा आहे का हे पाहा. तसेच, सार्वजनिक वाहतुकीची सोयी, मॉल्स-दुकाने, शाळा इत्यादी गोष्टी आहेत की नाही हे देखील तपासा. या सुविधा तुमच्या घराजवळ असल्यास तुम्हाला निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.
कागदपत्रे तपासा – अनेकदा घर-जागेच्या व्यवहार फसवणूक झाल्याची प्रकरणं समोर येतात. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करणे खूपच आवश्यक आहे. तुम्ही जागा, बिल्डर्सशी संबंधित कागदपत्रे तपासू शकता. सर्व कागदपत्रे योग्य असल्यावरच घर खरेदीचा निर्णय घ्या, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते.
तुमचे घर अनाधिकृत जागा, नदी-तलावाच्या ठिकाणी तर नाही?
घर खरेदी करणे हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी घर घेत आहात, ती जागा वैध आहे ना याची खात्री करणे गरजेचे आहे. घर अनाधिकृत जागा, नदी-तलावाच्या ठिकाणी तर बांधलेले नाही ना, यासाठी तुम्ही कागदपत्रे पाहू शकता. सर्वात प्रथम शहराचा मास्टर प्लॅन पाहून, घर शेतजमीन किंवा नदी, तलावाच्या पात्रात तर बांधलेले नाही ना, हे पाहा. जमिनीशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात प्रलंबित तर नाही ना, हे तपासा. स्थानिक महसूल कार्यालयाला भेट देऊन जागेचा सर्वेक्षण नकाशा पाहू शकता. तसेच, तुम्ही बिल्डर्सकडून इतर परवानग्यांशी संबंधित कागदपत्रे देखील मागू शकता.
घर खरेदी करण्यापूर्वी ही कागदपत्रे तपासा
- तुम्ही महारेराच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बिल्डर आणि बांधकाम प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता. तसेच, बांधकाम प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होईल याचीही माहिती मिळेल.
- नगररचना विभागाकडील मास्टर प्लॅन पाहा. येथे तुम्हाला कोणते क्षेत्र कशासाठी वर्गीकृत केले आहे याची माहिती मिळेल. जसे की, औद्योगिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, जंगल इत्यादीची माहिती मिळेल.
- बांधकामासाठी जागेचा बिगरशेती परवाना
- इमारत बांधकामासाठीचा महापालिकेने मंजूर केलेला नकाशा.
- खरेदीखत-विक्री करार, मालमत्तेची मालकी तपासा.
- पर्यावरणसंबंधी ना हरकत प्रमाणपत्र
- वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ते इत्यादींसाठीचा अधिकाऱ्यांनी दिलेली मंजूरी.
- इतर आवश्यक परवानग्यांना मंजूरी मिळाली आहे की नाही, ते तपासा.