देशात आरोग्य विम्याची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोविडनंतर (Covid) तर यात अधिक वाढ होत असल्याचंच दिसून येतंय. मागच्या वर्षीच्या तुलनेत एकूण प्रिमियमचा आकडा वाढल्याचं दिसतंय. मागच्या काही वर्षातल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आरोग्य विम्यात सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसतं. आर्थिक वर्ष 2021मध्ये 58,684.2 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022मध्ये एकूण प्रिमियम 73,598 कोटी रुपये होता. 2023मध्ये हा आकडा वाढून एकूण प्रिमियम 90,667.7 कोटी रुपये झाला. म्हणजेच मागच्या तीन वर्षात आकड्यांमध्ये झालेली वाढ पाहता ती 1 ट्रिलीयनच्या पुढे यंदा जाणार, असंच दिसून येतंय. केअरएजच्या (CareEdge) अहवालासंबंधी फायनान्शिअल एक्स्प्रेसनं वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
आरोग्य विमा - प्रतिवर्षी वाढ
आकडेवारीच्या वाढीवरून केअरएजनं आपल्या अहवालात म्हटलंय, की आरोग्या विम्याचा प्रिमियम वाढतोय. हे वाढते आकडे नॉन-लाइफ इन्शुरन्स उद्योगातला प्राथमिक विकास आहे. त्यामुळेच या क्षेत्रातला बाजाराचा हिस्सा 2021साठी 29.5 टक्के होता. तो 2023मध्ये 35 टक्क्यांपर्यंत वाढला. या विभागाची वाढ आर्थिक वर्ष 2023साठी 23.2 टक्के झाली. आर्थिक वर्ष 2022मध्ये 25.4 टक्क्यांच्या वाढीपेक्षा कमी आहे.
कोविड ठरला गेमचेंजर
मागच्या काही वाढत्या प्रिमियमचं महत्त्वाचं कारण 2020मध्ये कोविडचा झालेला उद्रेक. या काळात आणि यानंतर आरोग्य विम्यात लक्षणीय वाढ झाली. हा काळ आरोग्या विम्यासाठी गेम चेंजर ठरला. कोविडच्या आधी वाहनांचा विमा अधिक प्रमाणात काढला जात होता. मात्र आता परिस्थिती बदललीय. आपल्या आरोग्याच्या बाबत नागरिक अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विमा हा जीवन विमा क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहील, असं श्रीराम जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनिल कुमार अग्रवाल यांनी सांगितलं.
प्रीमियम्समध्ये सवलती
आरोग्य विम्याच्या प्रीमियम्समध्ये सवलती आहेत. त्या तर्कसंगत असल्यामुळे या प्रकारातल्या प्रिमियममध्ये वाढ झालीय. स्टँडअलोन आरोग्य विमा कंपन्यांचं लक्ष्य किरकोळ विक्रीवर असतं. दुसरीकडे सामान्य विमा कंपन्यांचा ग्रुपचा प्रमुख वाटा असतो. सहीची (SAHI) आर्थिक वर्ष 2023सालची प्रीमियममधली वाढ उद्योगाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. यामुळे आरोग्य विम्याच्या बाजारात सहीची 28.9 टक्के हिस्सेदारी आहे. आर्थिक वर्ष 2021मध्ये त्यांचा हिस्सा 26.8 टक्क्यांवरून 28.9वर गेलाय. म्हणजे जवळपास 2 टक्क्यांनी तो वाढलाय. विशेष म्हणजे खासगी कंपन्या आणि सही यांचा आर्थिक वर्ष 23मधला वाटा सारखाच आहे. दुसरीकडे सार्वजनिक प्रतिस्पर्ध्यांची वाढ ही कमी गतीनं झाली, असं केअरएजचा अहवाल सांगतो.
वाहन आणि आरोग्य विम्याची वाढीची आकडेवारी
नॉन लाइफ इन्शुरन्स मार्केट मध्यम कालावधीत अंदाजे 13-15 टक्के वाढणार असल्याचा केअरएजचा अंदाज आहे. आरोग्य विमा विभाग 1 ट्रिलीयनचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर वाहन विमा प्रीमियम्स आर्थिक वर्ष 2024मध्ये 85,000 कोटी रुपये ओलांडण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी आधीच अनुक्रमे 90,000 कोटी आणि 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय, असं एकूण केअरएजमधल्या अहवालात म्हटलंय.