Health Insurance Top-up: आरोग्य विमा ही अत्यंत गरजेची बाब आहे. तुमच्या स्वत : वर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली तर बचत केलेले पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. आरोग्य विम्याच्या संरक्षणामुळे तुम्ही बिनधास्त राहू शकता. अनेक वेळा विमा संरक्षण म्हणून घेतलेला कव्हर पुरेसा नसतो. विमा कव्हरपेक्षा रुग्णालयाचे बिल जास्त झाल्यास तुम्हाला खिशातून पैसे भरावे लागतील.
जर तुम्ही घेतलेले विमा संरक्षण पुरेसे वाटत नसेल तर तुम्ही पॉलिसी टॉप-अप करू शकता. तुमची मूळ विमा कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीकडूनही टॉप-अप करू शकता. हेल्थ इन्शुरन्स टॉप-अप हा काय प्रकार आहे. त्याची गरज केव्हा पडते. ते आपण या लेखात पाहू.
समजा, तुम्ही कुटुंबात चार सदस्य आहात. आणि सर्वांसाठी तुम्ही 3 लाखांची फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतली आहे. फॅमिली फ्लोटर पॉलिसी म्हणजे एकाच पॉलिसीमध्ये सर्व सदस्यांना विमा संरक्षण मिळते. 3 लाखांची पॉलिसी कदाचित अपुरी पडू शकते , असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टॉप-अप करू शकता. टॉप-अप आणि सुपर टॉप-अप असे दोन पर्याय तुमच्यापुढे आहेत. यातील कोणताही तुम्ही निवडू शकता.
पॉलिसी काळात एकापेक्षा जास्त विम्याचे दावे आल्यास तुमचे विम्याचे संरक्षण अपुरे पडू शकते. त्यामुळे सावधगिरी म्हणून तुम्ही आधीपासून पॉलिसी टॉप-अप करू शकता. समजा , तुमची मूळ पॉलिसी 3 लाखांची आहे. तर तुम्ही आणखी 3 लाखांचा टॉप-अप करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रिमियम भरावा लागेल. मूळ विम्याची रक्कम संपूर्ण खर्च झाल्यानंतर टॉप-अपची रक्कम वापरता येते.
तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि कंपनीतर्फे विमा (कॉर्पोरेट पॉलिसी) संरक्षण मिळत असेल तर अशाही पॉलिसीला तुम्ही टॉप-अप करू शकता. टॉप-अप प्लॅनद्वारे तुम्ही कमी प्रिमियममध्ये जास्त विमा संरक्षण मिळवू शकता. मात्र , टॉप अप आणि सुपर टॉप अप मधील फरक आधी समजून घ्या. या दोन्हींमधील अटी वेगळेवगळ्या आहेत. नीट माहिती घेऊन तुम्ही टॉप-अप घेतला नाही तर ऐनवेळी अडचणीत याल. दोन्हींमधील फरक खाली दिला आहे. तो उदाहरणाच्या सहाय्याने समजून घ्या.
डिडक्टेबल म्हणजे काय? (What is deductible in Top Up)
सर्वप्रथम " डिडक्टेबल " हा काय प्रकार आहे ते समजून घेऊया. डिडक्टेबल म्हणजे रुग्णालयाच्या बिलाची ठराविक मर्यादा ओलांडल्याशिवाय टॉप-अप अॅक्टिव्हेट होत नाही. मूळ पॉलिसी 5 लाख रुपयांची आणि तुम्ही 5 लाख रुपयांचा टॉप-अप घेतला असे समजा. या टॉपअपसाठी 5 लाख रुपयांचे डिडक्टेबल लिमिट असेल. म्हणजेच 5 लाखांची मर्यादा ओलांडल्याशिवाय टॉप-अप अॅक्टिव्हेट होणार नाही. पाच लाख रुपये खर्च झाल्यानंतरच टॉप-अप अॅक्टिव्हेट होईल. त्याशिवाय टॉपअप वापरता येणार नाही. दोन्ही पॉलिसींसाठी डिडक्टेबलचे नियम वेगवेगळे आहेत. ते आपण समजून घेऊया.
टॉप अप आणि सुपर टॉप अपमधील फरक काय ? (Difference between Top Up and Super Top Up)
समजा , तुमची आरोग्य विमा पॉलिसी 5 लाखांची आहे आणि तुमच्याकडे 5 लाख रुपयांचा अतिरिक्त टॉप अप आहे. एकूण विमा कव्हर झाला 10 लाख रुपये. या टॉप-अपसाठी 5 लाख रुपयांचे डिडक्टेबल लिमिट आहे , असे समजू. म्हणजे 5 लाख रुपये खर्च होईपर्यंत टॉपअप अॅक्टिवेट होणार नाही. मग ते तुम्ही तुमच्या बेस कव्हरमधून खर्च करा किंवा खिशातून.
अशा परिस्थितीत , 5 लाख रुपयांच्या आतमध्ये जर रुग्णालयाचे बिल झाले तर ते मूळ विम्याच्या रकमेतून भरले जाईल. टॉप-अपची गरजच पडणार नाही. मात्र , जर रुग्णालयाचे बिल 7 लाख रुपये झाले तर 5 लाख रुपये मूळ पॉलिसीतून आणि राहिलेले 2 लाख रुपये टॉप अप मधून वापरले जातील. विम्याची मूळ 5 लाखांची रक्कम एकाच दाव्यात पूर्णपणे संपून टॉपअप मधील 3 लाख रुपये शिल्लक राहतील.
मात्र , त्याच वर्षात कुटुंबातील कोणी आजारी पडले आणि विम्याचा दुसरा दावा 2 लाखांचा आला तर टॉप-अप काम करणार नाही आणि तुम्हाला खिशातून 2 लाख भरावे लागतील. कारण , टॉप-अप साठी 5 लाखांचे डिडक्टेबल लिमिट आहे. बिलाचे हे लिमिट पूर्ण केल्यानंतरच टॉप-अप अॅक्टिव्हेट होईल. पहिल्या वेळेसच टॉप-अप कामाला येईल. दुसऱ्या वेळेस खिशातून पैसे भरावे लागतील. हे टाळण्यासाठी तुम्ही सुपर टॉप-अप घेऊ शकता.
सुपर टॉपअप म्हणजे काय ?
मूळ विमा पॉलिसी 5 लाख रुपये आणि सुपर टॉप-अप 5 लाख रुपयांचा तुमच्याकडे आहे असे गृहित धरू. टॉप-अपसाठी डिडक्टेबल लिमिट 5 लाख रुपये आहे. मात्र , डिडक्टेबलची ही मर्यादा एकदाच ओलांडावी लागेल. समजा , कुटुंबातील कोणी व्यक्ती आजारी पडली आणि या विम्याचा दावा (क्लेम) 7 लाख रुपये आला. तर अशा परिस्थितीत 5 लाख रुपये तुमच्या मूळ पॉलिसीमधून वापरले जातील. आणि उर्वरित 2 लाख रुपये सुपर टॉपअप मधून वापरले जातील. दुर्दैवाने त्याच वर्षी कुटुंबातील दुसरी व्यक्ती आजारी पडली आणि रुग्णालयाचे बिल 2 लाख रुपये झाले.
अशा परिस्थितीत सुपर टॉपअपमधील जे 3 लाख रुपये शिल्लक आहेत , त्यातून 2 लाख रुपयांचा क्लेम पास होईल आणि तुम्हाला खिशातून पैसे भरण्याची वेळ येणार नाही. म्हणजे दुसऱ्या क्लेम वेळी 5 लाख रुपयांचे डिडक्टेबल ओलांडण्याची गरज पडली नाही. तुम्ही फक्त “टॉप-अप” घेतला असता तर 5 लाखांची बिलाची मर्यादा प्रत्येक वेळी ओलांडावी लागली असती. सुपर टॉपसाठी ही मर्यादा फक्त एकदाच ओलांडावी लागते. त्यामुळे सुपर टॉप अप कधीही फायद्याचा ठरतो. टॉप-अप फक्त पहिल्याच क्लेमसाठी कामाला येईल.