खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेकडून 1.5 कोटी रुपयांचे एज्युकेशन लोन दिले जाते. यात विनातारण 50 लाखांचे कर्ज दिले जाते. बँकेकडून पूर्ण वेळ आणि पार्ट टाईम अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज दिले जाते. यात काही निवडक प्रसिद्ध कॉलेजेस आणि विद्यापीठांसाठी सवलतीच्या दरात शैक्षणिक कर्ज दिले जाते.
एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी शैक्षणिक कर्ज दिले जाते. यात कर्ज फेडीसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी आणि त्यावर अतिरिक्त 1 वर्ष किंवा 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो.
ज्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतो, त्या संस्थेला थेट मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम पाठवली जाते. किमान कागदपत्रांसह आणि कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय कर्ज मंजुरीची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केली जाते, असा दावा एचडीएफसी बँकेने केला आहे. या शैक्षणिक कर्जासाठी विमा संरक्षण देखील बँकेकडून उपलब्ध आहे.
एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 9.55% पासून 13.25% या दरम्यान आहे. बँकेकडून 1 वर्षापासून 15 वर्षांपर्यंत कर्ज दिले जाते. विद्यार्थ्यांना बँकेच्या वेबसाईटवरुन शैक्षणिक कर्जासाठी थेट अर्ज करता येईल, असे बँकेने म्हटले आहे.
ज्यांना तारण ठेवून शैक्षणिक कर्ज घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बँकेने तारण ठेवण्याबाबत अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. यात राहते घर, एचडीएफसी बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट, निवडक डेब्ट म्युच्युअल फंड्स, विमा पॉलिसीज, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि किसान विकास पत्र यांचा समावेश आहे. या गोष्टी तारण ठेवून शैक्षणिक कर्ज घेता येईल, असे बँकेने म्हटले आहे.
शैक्षणिक कर्ज कोणाला दिले जाते?
18 ते 35 वयोगटातील विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज दिले जाते. भारतातील किंवा परदेशातील नोंदणीकृत विद्यापीठे आणि UGC शी संलग्न शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज मिळू शकते. बँकेच्या वेबसाईटनुसार 2 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचे एज्युकेशन लोन कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 15 दिवसांत मंजूर केले जाते. यावर नियमानुसार प्रक्रिया शुल्क, सरकारी फी लागू होईल, असे बँकेने म्हटले आहे.
शैक्षणिक कर्जासाठी ही कागदपत्रे सोबत ठेवा
एचडीएफसी बँकेतून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी अर्जदारांनी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहे त्याचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहेत. याशिवाय विद्यार्थ्याचे यापूर्वीची शालेय प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, राहण्याचा पुरावा, स्वाक्षरीचा पुरावा अर्जासोबत जोडावा लागतो. शैक्षणिक अर्जासाठी जर विद्यार्थ्याच्या पालकाने अर्ज केला असल्यास पालकांचे उत्पन्नाचे पुरावे जसे की सहा महिन्यांची सॅलरी स्लीप, मागील दोन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न आणि इतर आवश्यक ओळखपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
शैक्षणिक कर्जावर मिळते कर सवलत
पाल्यासाठी शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या पालकांना आयकर विभागाकडून कर सवलत दिली जाते. आयकर कलम 80 E नुसार शैक्षणिक कर्जावर भरल्या जाणारे व्याज कर वजावटीसाठी पात्र ठरते. त्यामुळे शैक्षणिक कर्ज करदात्यांच्या दृष्टीने कर बचत करणारे आहे. एचडीएफसी बँकेचे एज्युकेशन लोन कर सवलतीसाठी पात्र आहे.