एक तर डार्क अथवा फेंट. ग्रे नाहीच. शेअर प्राईस आणि त्याच्या व्यवहाराबाबत तर हा सक्तीचा तंत्रनियमच. पण याच व्यवहारासाठी महत्त्वाचं असं ग्रे मार्केट (Grey Market) तेवढंच महत्त्वाचं आणि लोकप्रिय आहे. एलआयसीच्या सध्याच्या आयपीओ दरम्यान तुम्ही हा शब्द कितीतरी वेळा ऐकला असेल.
तर कोणत्याही कंपनीच्या सूचिबद्ध शेअर्सचे व्यवहार हे प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये होत असतात. अर्थात ते आयपीओनंतर (IPO). म्हणजे त्या कंपनीने काही शेअर, काही हिस्सा उत्सुक गुंतवणूकदारांना खुल्या बाजारात (Open Market) उपलब्ध करून दिल्यानंतर सेबीच्या (SEBI) मार्गदर्शनानुसार त्याबाबतची प्रक्रिया पार पडल्यानंतर मग शेअर लिस्ट होतो. मात्र, अशा प्रत्यक्ष शेअर बाजारात येण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या शेअरचे व्यवहार हे या अशा ग्रे मार्केटमध्ये होत असतात.
ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच आयपीओ जीएमपी (IPO GMP) हे आयपीओ घेऊन येत असलेल्या कंपनीच्या मागणीच्या आधारे मोजलं जातं. आयपीओची तारीख आणि किंमतपट्टा (Price Band किंवा Issue Price) जाहीर झाल्यानंतर अनियंत्रित बाजारात ग्रे मार्केट अनधिकृतपणे सुरू होतं. आयपीओ गुंतवणूकदार हे नेहमी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे प्रीमियम तपासतात. परंतु ते बाजारातील परिस्थिती, मागणी आणि सदस्यता संख्यांनुसार बदलू शकतात.
प्रीमियम (Premium) जोडल्यानंतर अंदाजे सूची किंमतीची गणना कशी करायची ते आता पाहू. जर ग्रे मार्केटनं आयपीओचा दर 100 रूपये दर्शविला आणि आयपीओची किंमत 200 रूपयांच्या आसपास असेल तर अंदाजे सूचीबद्ध किंमत 300 रूपये असेल. गणनेच्या आधारावर आयपीओ किमतीच्या तुलनेत लिस्टिंग (Listing) नफा 50 टक्के असेल.
बुल/बेअर मार्केटमुळे किंवा कंपनी शेअरच्या मागणीमुळे ग्रे मार्केटने सुचवलेल्या अंदाजित किमतीच्या तुलनेत आयपीओची किंमत बदलू शकते. काही आयपीओची किंमत ग्रे मार्केटमध्ये कमी होते. पण अधिक नफ्यासह ते सूचीबद्ध होतात. तर काही आयपीओ ग्रे मार्केटमध्ये वरच्या टप्प्यावर लिस्ट होतात. परंतु त्यांची किंमत मात्र किमान स्तरावर असते. ग्रे मार्केट हे नेहमीच आयपीओ लिस्टिंग लाभ (Profit) मोजण्यासाठी एक मजबूत घटक मानलं जातं.
ग्रे मार्केट काय आहे?
ग्रे मार्केट हे शेअरचे अनधिकृत (Illegal) व्यवहार आहेत. त्यात आयपीओचे गुंतवणूकदार आणि शेअर ब्रोकर यांचा सहभाग असतो. या बाजारातील शेअरची किंमत ही बाजार संशोधन किंवा तज्ज्ञांकडून मोजली जाते. ग्रे मार्केटमध्ये व्यवहार करण्याची शिफारस ते बेकायदेशीर असल्याने केली जात नाही. ग्रे मार्केटमध्ये कोस्टाक रेट गृहित धरला जातो. तो प्रिमियम असतो. एखाद्या व्यक्तीला त्याचा/तिचा आयपीओ अर्ज हा (ऑफ-मार्केट ट्रान्झॅक्शनमध्ये) इतर कोणाला तरी वाटप किंवा इश्यूची सूची करण्यापूर्वी विकून मिळतो, तो हा दर असतो.
ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय?
"ग्रे मार्केट प्रिमियम" म्हणजेच "आयपीओ जीएमपी" ही एक संज्ञा (Definition) आहे. आयपीओ मार्केटमध्ये कंपनी आयपीओच्या लिस्टिंगसाठी केलेली अंदाजे किंमत किती आहे, हे तपासण्यासाठी ती वापरतात. ग्रे मार्केट हे आयपीओ सूचीच्या आधी आणि आयपीओ सुरू होण्याच्या तारखेपासून वाटप तारखेपर्यंतच्या दिवसांमध्ये कार्य करतं.
आता हे कसं ते समजून घेऊया. जर एखादी कंपनी 100 रूपयांचा आयपीओ घेऊन आली आणि ग्रे मार्केटमध्ये त्याचा प्रीमियम 20 रूपये असेल तर असे गृहीत धरता येईल की, आयपीओ हा त्याच्या सूचीच्या दिवशी 120 रूपयावर सूचीबद्ध होऊ शकतो. मात्र, त्यात विश्वासार्हता नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक प्रकरणांमध्ये आयपीओ जीएमपी कार्य करतं. परंतु काही प्रकरणांमध्ये तसे होत नाही. जर आयपीओला मागणी असेल आणि अंदाजे बडे गुंतवणूकदार जे मोठी रक्कम मोजून शेअर खरेदी करू शकतात. ते संख्येने अधिक असतील तर आयपीओचे मूल्य अंदाजे आयपीओ जीएमपीसह दिलेल्या किमतीच्या आसपास असतं.
कोस्टाक दर (Kostak Rate) म्हणजे काय?
कोस्टाक दर (Kostak Rate) ही या प्रक्रियेतील एक रक्कम मानली जाते. ती एखादा गुंतवणूकदार आयपीओ सूचीच्या आधी आयपीओ अर्जाच्या विक्रेत्याला देतो. ग्रे मार्केट याबाबत प्रतिक्रिया देत असल्याने कोस्टाकचे दरदेखील त्याप्रमाणे बदलतात. कोणीही त्यांचे संपूर्ण आयपीओ अर्ज हे कोस्टाकच्या बाजाराबाहेरील दरांवर खरेदी आणि विक्री करू शकतो आणि त्यांचा नफा निश्चित करू शकतो. गुंतवणूकदाराला आयपीओ मिळो किंवा न मिळो कोस्टाकचे दर लागू होत असतात.
खरेदीदाराने आयपीओसाठी कोस्टाकचे दर अर्जात नमूद करावे. जर एखाद्याने एका आयपीओसाठी 5 अर्ज (Application) केले आणि ते अर्ज प्रति 1 हजार रूपयाप्रमाणे विकले तर त्याचा अर्थ त्याला आयपीओ नफा 5 हजार रूपये मिळाला. त्याला 2 अर्जांमध्ये वाटप मिळाले तरीही त्याचा नफा 5 हजार रूपये असेल. आता जर त्याने स्टॉक विकला आणि त्याला 10 हजार रूपयांचा नफा मिळाला तर त्याने 5 हजार रूपयांचा उर्वरित नफा अर्ज विकत घेतलेल्या गुंतवणूकदाराला देणं आवश्यक आहे. आयपीओ ग्रे मार्केटमध्ये अर्ज विकण्याचा हा सुरक्षित मार्ग मानला जातो.
कोस्टाक दरानुसार शेअर्सचे वाटप
कोस्टाक दरानुसार, गुंतवणूकदारांना त्यांच्या आयपीओ अर्जावर शेअरचे वाटप केल्यावर ठरलेली रक्कम ही अर्जावरील सौद्याच्या (trading) अधीन आहे. जर एखाद्याने सौद्याच्या विषयावर आयपीओ अर्ज विकत घेतला किंवा विकला तर एखाद्याला वाटप मिळाल्यास ती रक्कम मिळू शकते. यामध्ये त्यांचा नफा निश्चित करता येत नाही. कारण तो प्रत्यक्षात शेअरच्या वाटपावर अवलंबून असतो. पुन्हा एखाद्याला त्याचं वाटप झालं आणि त्याने अर्ज 10 हजार रूपयांना विकला आणि प्रत्यक्ष लिस्टिंगच्या दिवशी 15 हजार रूपयांचा नफा जास्त झाला तर ज्याने अर्ज विकत घेतला त्याला 5 हजार रूपये द्यावे लागतील.
ग्रे मार्केट प्रीमियमचं मोजमाप कसं ठरतं?
आयपीओ जीएमपी उर्फ ग्रे मार्केट प्रीमियम ही एक किंमत आहे. ती आयपीओ प्रक्रियेपूर्वी ग्रे मार्केटमध्ये खरेदी केली जाते. कंपनीची कामगिरी, ग्रे मार्केटमधील मागणी आणि सदस्यत्वाची संभाव्यता यावर आधारित त्याची गणना केली जाते.
समजा एखाद्या आयपीओची किंमत 200 रूपये निश्चित केली असेल आणि ग्रे मार्केटमध्ये त्याचा दर 100 रूपये दर्शवला जात असेल तर त्याचा अर्थ हा आयपीओ 300 रूपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो (म्हणजेच : ₹ 200 + ₹ 100). हे एक गृहितक आहे. मात्र वास्तविकरित्या संबंधित कंपनीचा ग्रे मार्केटपेक्षा भिन्न व्यवहार दर्शवू शकतो.
ग्रे मार्केट स्टॉक सुरक्षित असतात का?
अर्थात हे सारं ब्रोकर किंवा शेअरचे व्यवहार (Trading) करणाऱ्यावर अवलंबून असतं. आधी म्हटल्याप्रमाणे ते सुरक्षित तर नाहीच. तुम्ही ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ते तुमच्या स्वतःच्या जोखमीवर असेल. शेअरच्या मूल्यात चढ-उतार असू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सूचीच्या लाभासाठी केवळ आयपीओ जीएमपीचा संदर्भ घ्यावा. आणि प्रत्यक्ष व्यवहार मात्र संबंधित कंपनीचा आयपीओ लिस्टिंग झाल्यावरच करावे.
ग्रे मार्केटमध्ये आयपीओसाठी अर्ज करता येतो का?
ग्रे मार्केटशी संबंधित कोणतेही अधिकृत लोक किंवा व्यवसाय नाही. काही ब्रोकर आयपीओ अॅप्लिकेशन्सची खरेदी आणि विक्री कोस्टाक दरांवर करतात किंवा आयपीओ जीएममपीवर आधारित सौदा दरांच्या अधीन असतात. ग्रे मार्केटवर नजर ठेवून संबंधित कंपनीच्या शेअर दराबद्दल जागरूक राहून गुंतवणूकदारांनी नंतर प्रत्यक्ष शेअर बाजारात त्या शेअरच्या आयपीओ प्रक्रियेनंतर खरेदी करावी.
नुकत्याच जाहीर झालेल्या एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) चर्चा ग्रे मार्केटमध्येही झाली. एलआयसीची इश्यू प्राईस आणि निधी उभारणी कमी होत असल्याची टिका होत असतानाच ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचा प्रवास काहीसा नकारात्मकच राहिला.