शेअर बाजारात रूची ठेवणार्या लोकांनी तसेच नव्याने गुंतवणूक करणार्या मंडळींनी प्रायमरी आणि सेंकेंडरी मार्केटबाबत काही तथ्य जाणून घेतले पाहिजे. जेव्हा एखादी कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रथमच बाजारातून भांडवल उभारण्याची योजना आखते तेव्हा ती IPO लाँच करते. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदार जेव्हा पैसे टाकतात, तेव्हा त्यास प्रायमरी बाजारातील गुंतवणूक म्हटले जाते. त्यानंतर ती कंपनी शेअर बाजारात लिस्टेड होते, तेव्हा त्याच्या शेअरची खरेदी विक्री केली जाते. यावरून कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढते किंवा कमी होते. शेअर मूल्य वाढणे किंवा कमी होणे यावर गुंतवणूकदारांना नफा मिळतो किंवा तोटा सहन करावा लागतो.
शेअर बाजारात हजारो लिस्टेड कंपन्या आहेत. एखादा गुंतवणूकदार शेअर बाजारात अगोदरपासूनच लिस्टेड कंपनीत म्हणजेच नोंदणीकृत कंपनीच्या समभागांत गुंतवणूक करतो तेव्हा त्यास सेकेंडरी मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याचे समजले जाते. सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचे शेअर अगोदरपासूनच ट्रेड करत असतात. त्यामुळे त्याचा दर हा दररोजच्या स्थितीनुसार कमी जास्त होत राहतो. तसेच त्याची कधीही खरेदी आणि विक्री करता येणे शक्य आहे.
गुंतवणूक कशी करावी?
प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे राहिल की सेकंडरी मार्केटमध्ये, याबाबत निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टी स्वत:ला देखील ठावूक असणे गरजेचे आहे. प्रायमरी मार्केटमध्ये बहुतांश कंपन्या नवीन असतात आणि त्या प्रथमच बाजारात शेअर असतात. त्यांचे कोणतेही जुने रेकॉर्ड नसते. परिणामी त्यांच्या कामगिरीबाबत आकलन करणे कठिण जाते. भविष्यातील संबंधित कंपनीची स्थिती कशी राहिल, हे सांगता येत नाही.
अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार आयपीओ आणणार्या अनेक कंपन्यांचे शेअर आता फेस व्हॅल्यूपेक्षा कमी किंमतीवर व्यवहार करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आयपीओची खरेदी करताना त्याबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सेकंडरी मार्केटचा विचार केल्यास कंपन्यांचे शेअर अगोदरपासूनच सक्रिय असतात आणि त्यांच्याविषयी अंदाज बांधणे तुलनेने सोपे असते. प्रायमरी मार्केटमध्ये जर एखादी कंपनी आयपीओ आणत असेल आणि शेअर कमी किंमतीत मिळत असतील तर त्याची जोखीम अधिक असते. अर्थात एखादी प्रस्थापित कपंनी आपला आयपीओ आणत असेल तर त्याचे शेअर महाग असू शकतात. परंतु या कंपन्या अगोदरपासूनच बाजारात नोंदणीकृत असल्याने त्यांची जुनी कामगिरी पाहून त्यांच्या भविष्याविषयी तर्क लावणे अधिक सोईचे जावू शकतो. सेकेंडरी मार्केटमध्ये शेअरची किंमत अधिक असते, परंतु जोखीम देखील नवीन कंपन्यांच्या तुलनेत कमीच असते.
सध्या जगभरातील विश्लेषकांकडून एक इशारावजा सल्ला दिला जात आहे. त्यानुसार अमेरिकेसह जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केल्याने आणि कोविड बूस्टर पॅकेजेसच्या माध्यमातून देण्यात येणारी मदत बंद केली जाण्याचे संकेत दिल्याने आगामी काळात बाजारातील तरलता कमी होत जाणार आहे. परिणामी, गेल्या दोन-तीन वर्षांत ज्याप्रमाणे कामगिरी चांगली नसतानाही ज्या छोट्या कंपन्यांच्या समभागांत उसळ्या दिसून आल्या, तशी स्थिती आगामी काळात दिसण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळे ज्या कंपन्यांची कामगिरी खरोखरीच दमदार आहे, अशा कंपन्यांच्या समभागांतच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.