क्रिप्टोकरन्सी हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले एक आभासी चलन आहे. या चलनाचे भौतिक रूप नाही. पण, आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरता येऊ शकते. क्रिप्टोकरन्सींचा व्यवहार करण्यासाठी उच्च-शक्तीच्या (High Power) संगणकाची आणि पॉवर (इलेक्ट्रीसीटी) अल्गोरिदमसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. बिटकॉइनच्या (BTC) उत्पादनातून एका वर्षात अंदाजे 22 ते 23 दशलक्ष मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. केंब्रिज बिटकॉइन इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इंडेक्सनुसार (Cambridge Bitcoin Electricity Consumption Index - CBECI) असे दिसून आले आहे की, बिटकॉईन (BTC) एका वर्षाला सुमारे 131.5 टेरावॉट-तास (TWh) वीज वापरते. हा आकडा नॉर्वे देश एका वर्षासाठी जेवढी वीज (124.3 TWh) वापरतो, त्यापेक्षा ही अधिक आहे.
Green Cryptocurrency: पर्यावरणवाद्यांचा ग्रीन क्रिप्टोकरन्सीसाठी पुढाकार
पर्यावरण रक्षण म्हणजे केवळ वनसंपत्तीचे रक्षण नसून हा त्याचा एक भाग आहे. यामध्ये झाडे लावणे आणि त्यांच्या संवर्धनासोबत निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी कार्बन फूटप्रिंट कमी करणे गरजेचे आहे. यासाठी विघटन न होणाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे गरजेचे आहे. यापार्श्वभूमीवर जगभरातील पर्यावरणवादी संस्था आता ग्रीन क्रिप्टोकरन्सीच्या वापरासाठी पुढाकार घेत आहेत. यातून विजेची बचत आणि कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे अपेक्षित आहे.
कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? What is Carbon Footprint?
कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखादी व्यक्ती, घटना, संस्था किंवा वस्तू यामुळे उत्सर्जित होणाऱ्या हरितवायुचं कार्बन डायऑक्साइड समतुल्य प्रमाण. जागतिक सरासरी तापमानवाढ आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन याचा थेट संबंध आहे. गेल्या दीडशे वर्षात जे सरासरी तापमान 0.8 अंश सेल्सिअसने वाढलं होतं; ते आता 10 वर्षांनी 0.2 अंश सेल्सिअसने वाढत आहे. ही वाढ नियंत्रित करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणं हाच पर्याय आहे.
जगभरातील पर्यावरणवादी लोक कार्बन डायऑक्साइड कमी करणाऱ्या उपायांसाठी आवाहन करत आहेत. मात्र त्याचवेळी बाजारातील भांडवलीमूल्याने जगातील सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन आणि इथेरियम या सर्वाधिक ऊर्जा वापरणारी प्रूफ-ऑफ-वर्क (PoW) यंत्रणा वापरतात. यावर ब्लॉकचेन मॉडेलमधील प्रूफ-ऑफ-स्टेकची (PoS) निवड करणे हा एक पर्यावरणवादी पर्याय ठरू शकतो.
कोणती क्रिप्टोकरन्सी ग्रीन आहे?
ग्रीन क्रिप्टोकरन्सीमध्ये फॅंटम फाउंडेशन (FTM), आयओटीए (IOTA), रिपलनेट एक्सआरपी (RippleNet (XRP)), चिआ एक्ससीएच (Chia (XCH)) आणि कारडॅनो एडीए (Cardano (ADA)) यांचा समावेश आहे.
कोणती क्रिप्टोकरन्सी सर्वाधिक ऊर्जा बचत करते?
फॅंटम फाउंडेशनच्या (FTM) ब्लॉकचेनवरील प्रत्येक व्यवहारात 0.000024-0.000028 kWh ऊर्जेचा वापर होतो. ज्यामुळे सर्वाधिक ऊर्जा बचत करणारी क्रिप्टोकरन्सी फॅंटम फाउंडेशन आहे.