देशात टोमॅटोच्या वाढत्या किंमतींनी ग्राहकांना बेजार केले आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने अनुदानित दरात टोमॅटोची ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या वेबपोर्टलवरुन 70 रुपये किलोने ऑनलाईन विक्री करण्यात येत आहे. मात्र सध्या प्रत्येक खरेदीदाराला 2 किलो खरेदीची मर्यादा आहे.
केंद्र सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झुमर फेडरेशन ऑफ इंडिया आणि नाफेड या दोन संस्थांच्या माध्यमातून टोमॅटोची खरेदी वाढवली आहे. हा टोमॅटो सरकारकडून निवडक बाजारात सवलतीच्या दरात विक्री करण्यात येतो.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरात टोमॅटोच्या किंमतींमध्ये दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु यासह प्रमुख मंडईंमध्ये टोमॅटोचा भाव 150 रुपये ते 200 रुपये प्रति किलो इतका वाढला आहे. टोमॅटोने निर्माण झालेली तात्पुरती महागाई कमी करण्यासाठी सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोमॅटोची थेट खरेदी करण्यास सुरुवात केली. दोन आठवड्यात सरकारने शेकडो टन टोमॅटोची खरेदी केली असून त्याची सवलतीच्या दरात विक्री करण्यात येत आहे.
सरकारने आता इतर ई-कॉमर्स विक्रेत्यांप्रमाणेच टोमॅटोची थेट ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. ग्राहकांना आता ओएनडीसीच्या वेबपोर्टलवरुन 70 रुपये किलो दराने टोमॅटो खरेदी करता येतील, अशी माहिती एनसीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक ए.जे चंद्रा यांनी दिली. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या वेबपोर्टलवर नोंद असलेल्या पेटीएम, मॅजिकपिन, मायस्टोअर आणि पिनकोड अशा संलग्न अॅपमधून देखील सवलतीच्या दरात टोमॅटोची खरेदी करता येणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.
ऑनलाईन टोमॅटो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घरपोच माल देण्याची सुविधा आहे. दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या वेळेत टोमॅटो खरेदी करणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय घरपोच टोमॅटो पाठवले जाणार आहेत. मात्र खरेदीसाठी 2 किलोची मर्यादा घालण्यात आली आहे.
सरकारने महिनाभरात टोमॅटोच्या किंमतीत दोन वेळा कपात केली आहे. सुरुवातीला सरकारकडून 90 रुपये किलोने टोमॅटोची विक्री करण्यात येत होती. त्यानंतर तो 80 रुपये इतका कमी करण्यात आला. 16 जुलै 2023 पासून सरकारकडून 70 रुपये किलोने टोमॅटोची विक्री करण्यात येत आहे.
इतर कंपन्यांच्या तुलनेत टोमॅटोचा भाव निम्मा
इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या तुलनेत ओएनडीसीवरील टोमॅटोचा भाव निम्म्याहून कमी आहे. भाजीपाला विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या वेबपोर्टलवर सध्या टोमॅटोचा भाव सरासरी 170 ते 180 रुपये इतका आहे. आज मंगळवारी 25 जुलै 2023 रोजी मुंबईत टोमॅटोचा भाव 200 रुपये किलोपर्यंत वाढल्याचे बोलले जाते.