समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोग व्यक्तींच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य विकसित करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना समाजात समान संधी मिळावी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने सरकारद्वारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांग व्यक्तींना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट आणि प्राधान्य देण्यात आले आहे. विविध सोयीसुविधा पुरवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार योजना राबवत आहे. त्यातील खास योजनांची माहिती आपण घेणार आहोत.
केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय ट्रस्ट कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजना (Government Schemes for Disabled Persons)
दिशा (DISHA)
अर्ली इंटरव्हेंशन अण्ड स्कूल रेडिनेस स्कीम, म्हणजेच अपंगत्व असलेल्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लवकर प्रयत्न सरू करून त्यांची शाळेची तयारी करून घेणारी ही योजना आहे.
विकास (VIKAAS)
डे केअर - ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद आणि एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी ही डे केअर योजना आहे. या योजनेतून 10 वर्षांवरील मुलांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
समर्थ (SAMARTH)
रेस्पीट केअर – या योजनेद्वारे अनाथ, संकटात सापडलेली कुटुंबे, बीपीएल कुटुंबातील अपंग व्यक्ती, लोअर इन्कम ग्रुप कुटुंबांतील एखादी व्यक्ती अपंग असेल तर त्यांना नॅशनल ट्रस्ट कायद्यांतर्गत रिस्पाईट होम (निवारा) दिले जाते.
घरौंदा (GHARAUNDA)
ग्रुप होम फॉर अडल्ट्स – या योजनेद्वारे ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद आणि अनेक प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना निवारा आणि सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
निरामय (NIRAMAYA)
हेल्थ इन्श्युरन्स – या योजनेद्वारे ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदता आणि एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना अत्यंत कमी पैशांमध्ये आरोग्य विमा दिला जातो.
सहयोगी (SAHYOGI)
केअरगिव्हर ट्रेनिंग स्कीम - अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) आणि त्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल आरोग्य सेवक तयार करण्यासाठी केअरगिव्हर सेलची स्थापना केली जाते.
ज्ञान प्रभा (GYAN PRABHA)
एज्युकेशनल सपोर्ट – या योजनेद्वारे ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद आणि एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहन दिले जाते.
प्रेरणा (PRERNA)
मार्केटिंग असिस्टंट - ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद आणि एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींनी तयार केलेली उत्पादने आणि त्यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यासाठी मार्केटिंग योजना राबवली जाते.
संभव (SAMBHAV)
एड्स अण्ड असिस्टिव्ह डिव्हायसेस – या योजने अंतर्गत प्रत्येक शहरात रिसोर्स सेंटर सुरू करण्यासाठी तसेच आवश्यक उपकरणे म्हणजे दिव्यांगांना वापरण्यास योग्य, शास्त्रशुद्ध, आधुनिक उपकरणे मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करून दिली जातात.
राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना
दिव्यांगजन स्वावलंबन योजना
दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून दिले जाते. यासाठी लाभार्थ्यांना 3.75 लाख रुपये अनुदान म्हणून दिले जाते.
सुक्ष्म पत पुरवठा योजना
या योजने अंतर्गत नोंदणीकृत अशासकीय संस्थामार्फत अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने 1 लाख रूपयांपर्यंतचे स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
शैक्षणिक कर्ज योजना
बारावीनंतर पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला या योजने अंतर्गत कमीतकमी व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख तर देशाबाहेरील शिक्षणासाठी 20 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
दिव्यांग व्यक्तींच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती जिल्हा परिषद मुख्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयातील अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र येथे मिळू शकते. या केंद्रामधून अपंगांसाठीच्या विविध योजनांचे अर्ज दिले जातात. तसेच आवश्यकतेप्रमाणे मार्गदर्शनही करण्यात येते. वर दिलेल्या योजनांची सविस्तर माहिती व अर्ज सादर करणाऱ्या कार्यालयाची माहिती महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.