Tax RElief for Srartup: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एंजेल टॅक्सच्या नियमांमध्ये थोडे बदल केले आहेत. या बदलानुसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांसहित जवळपास 21 देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स न लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे स्टार्टअप कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये झालेल्या बजेटमध्ये परदेशातून भारतातील काही स्टार्टअप कंपन्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स लावण्याबाबतचे नियोजन केले होते. पण सरकारने स्टार्टअप आणि व्हेंचर कॅपिटलमधील भारतातील गुंतवणूकदारांशी चर्चा केल्यानंतर जवळपास 21 देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स न लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबत सरकारने दोन दिवसांपूर्वी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेनशननुसार, सरकारने 21 देशातून येणाऱ्या गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स (Angel Tax) न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, न्यूझिलंड, रशिया, अमेरिका, इंग्लंड, इटली या प्रमुख देशांसह ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलॅण्ड, इस्त्रायल, कोरिया, नॉर्वे, स्वीडन या देशांचा समावेश आहे. पण यामध्ये सिंगापूर, नेदरलॅण्ड आणि मॉरिशससारख्या देशांचा समावेश करण्यात आलेला नाही. जे की, या देशांमधून सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट भारतात येते. तरीही त्यांचा या यादीत समावेश केलेला नाही.
फेब्रुवारीमधील बजेटनंतर स्टार्टअप आणि व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्रीमधील काही लोकांनी सरकारशी संपर्क साधून विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीवर टॅक्स लावू नये, अशी मागणी केली होती. त्यानुसार संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर सीबीडीटीने (Central Board of Direct Taxes-CBDT) 21 देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. या देशांतून येणाऱ्या गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे.