केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना (Government Scheme) आणत असते. विद्यार्थी, महिला, गरीब इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा हा या योजनांचा उद्देश असतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी अनेक राज्य सरकारांनी मोफत लॅपटॉप वितरण योजना आणल्या. अलीकडे सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्रातील मोदी सरकारने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2023 मध्ये मोफत लॅपटॉप वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल.
पीआयबीची ट्विटरवरुन माहिती
हा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत असल्याचा दावा केला जात आहे. या मेसेजसोबत एक फॉर्म देखील पाठवला जात आहे, जो भरण्याची विनंती केली जात आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता तपासणी पीआयबीने केली आहे. भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB - Press Information Bureau)ने या प्रकरणावर ट्विट करून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. यासोबतच पीआयबीने लोकांना या लिंकद्वारे वैयक्तिक माहिती देऊ नये, अशी विनंती केली आहे.
चुकूनही पर्सनल डिटेल्स शेअर करू नका
पीआयबीने सांगितले की मोफत लॅपटॉप योजना पूर्णपणे बनावट आहे आणि हा मेसेज सायबर गुन्हेगारांद्वारे व्हायरल केला जात आहे. अशा मेसेजवर विश्वास ठेवून, आपली वैयक्तिक माहिती अजिबात शेअर करू नका. अशा मेसेजमध्ये जोडलेल्या फॉर्मवर तुमचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, मोबाइल नंबर, बँक तपशील शेअर करून तुम्ही सायबर गुन्ह्यांचे बळी होऊ शकता. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नेहमी सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
व्हायरल मेसेजचे फॅक्ट चेक करा
असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही पीआयबीद्वारे तथ्य तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेलवर व्हिडिओ पाठवू शकता.