लाभांश जाहीर केल्याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना (Investors) होत असतो. कारण निकालानंतर लाभांश तर मिळतोच, पण स्टॉक (Stock) ऑक्शनमुळे नफा कमावण्याचीही संधीही असते. अशीच एक सरकारी कंपनी संरक्षण क्षेत्रातली आहे, जिनं निकालांसह मोठा लाभांशला मंजुरी दिलीय. भारत इलेक्ट्रॉनिक (BEL) असं या स्टॉकचं नाव आहे. या समभागानं एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 40 टक्के सकारात्मक असा परतावा दिलाय. झी बिझनेसनं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
एजीएममध्ये होणार निर्णय
आर्थिक वर्ष 2023साठी 1 रुपये दर्शनी मूल्यावर 60 पैशांचा अंतिम लाभांश मंजूर केल्याचं बीईएलनं एका एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलंय. 60 पैशांचा अंतिम लाभांश म्हणजेच प्रत्येक शेअरवर 60 टक्के लाभांश मंजूर करण्यात आलाय. लाभांशाचा अंतिम निर्णय भागधारकांच्या माध्यमातून एजीएममध्ये म्हणजेच वार्षिक बैठकीत घेतला जाणार आहे. वार्षिक बैठकीच्या 30 दिवसांच्या आत लाभांशाची रक्कम ही तवणूकदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र अद्याप वार्षिक बैठकीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, अशी माहिती बीईएलनं एका एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलंय.
नफा वाढला
एक्स्चेंज फाइलिंगनुसार, बीईएलनं जानेवारी ते मार्च या कालावधीत 1365.4 कोटी रुपयांचा स्वतंत्र नफा कमावलाय. मागील वर्षीच्या कालावधीत तो 1141.8 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर विचार केल्यास नफा सुमारे 20 टक्क्यांनी वाढलाय. या सरकारी कंपनीनं चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले निकाल जाहीर केले आहेत. चौथ्या तिमाहीत बीईएलचं उत्पन्न 6324.9 कोटी रुपयांच्या तुलनेत 6456.6 कोटी रुपये होतं.
एकाच वर्षात सकारात्मक परतावा
चौथ्या तिमाहीत कामकाजाचा नफा 1824.8 कोटी होता. तर मागच्या वर्षीच्या याच कालावधीत तो 1567.8 कोटी रुपये इतका होता. मार्जिनदेखील 24.79 टक्क्यांवरून 28.26 टक्क्यांपर्यंत वाढलंय. हा अंदाज 24.72 टक्के होता. कंपनीचा शेअर 19 मे रोजी बीएसईवर 107.05 रुपयांवर बंद झाला होता. मागच्या एकाच वर्षात कंपनीनं सकारात्मक परतावा दिलाय. या समभागानं गुंतवणूकदारांना सुमारे 40 टक्के इतका सकारात्मक असा परतावा दिलाय.
भारत इलेक्ट्रॉनिक्सविषयी...
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारची एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. प्रगत अशी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन यामार्फत तयार केली जातात. बीईएल ही देशाच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नऊ पीएसयूपैकी (Power Supply Units) एक आहे. सरकारनं यांना नवरत्न दर्जा दिलाय. बीईएलची स्थापना 1954मध्ये कर्नाटकातल्या बंगलोर (आताचं बंगळुरू) याठिकाणी झाली. सुरुवातीला दळणवळणाची उपकरणं कंपनीत निर्माण झाली. त्यानंतर रिसीव्हिंग व्हॉल्व्ह, जर्मेनियम सेमीकंटक्टर्स तसंच आकाशवाणी रेडिओ ट्रान्समीटर तयार करण्यात आली.
बीईएलचा विस्तार
बीईएलचा विस्तार हळूहळू वाढत गेला. कंपनीचं दुसरं युनिट 1974मध्ये गाझियाबाद याठिकाणी स्थापन करण्यात आलं. भारतीय हवाई दलासाठी रडार आणि ट्रोपो दळणवळण उपकरणं तयार करण्यासाठी प्रामुख्यानं याची स्थापना करण्यात आली. तर तिसरं युनिट 1979साली पुण्यात स्थापन झालं. इमेज कन्व्हर्टर आणि इमेज इंटेन्सिफायर ट्यूब याठिकाणी तयार करण्यात येत होत्या.