Gold Smuggling Rise in India: भारतात खासकरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या 11 महिन्यात 604 किलो सोन्याची तस्करी पकडण्यात आली. या सोन्याची किंमत सुमारे 360 कोटी रुपये इतकी असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दिल्ली विमानतळावरून 374 कोटी तर चेन्नई एअरपोर्टवरून 306 किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पण प्रश्न असा आहे की, सोन्याच्या तस्करीचे प्रमाण का वाढत आहे. अर्थात काही जण चुकीच्या मार्गाने किंवा पद्धतीने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा छुप्या पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाण का वाढत आहे? हे आपण समजून घेणार आहोत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने इथे अनेक गोष्टींची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. पण सध्या मुंबई सोन्याच्या तस्करीमुळेही चर्चेत आली आहे. मुंबई एअरपोर्ट तर गोल्ड स्मगलर्सचा अड्डा बनत असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर, 2022 पासून 20 हून अधिक परदेशी नागरिकांना सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले. भारतीय नागरिकांबरोबरच नायजेरिअन, सुदान, संयुक्त अरब अमिराती या देशांमधून सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
आयात शुल्क वाढल्याने सोन्याच्या तस्करीत वाढ?
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल (world Gold Council-WGC)च्या मते सोन्याच्या तस्करीमध्ये गेल्या काही दिवसांत 33 टक्क्यांनी वाढ झाली. कोविडच्या काळातील तुलनेत 2022 मध्ये 160 टन सोन्याची तस्करी झाली. सोन्याची तस्करी वाढण्यामागे सोन्यावरील आयात शुल्क 12.5 करण्यात आल्याचे सांगितले जाते. पूर्वी सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्के आकारले जात होते. वाढत्या आयात शुल्काबरोबरच खरेदी केलेल्या सोन्यावर 3 टक्के जीएसटी लावला जातो. त्यामुळे योग्य मार्गाने सोन्याची खरेदी केली असता त्यावर भरमसाठ टॅक्स लावला जात आहे. त्यामुळेच सोन्याच्या तस्करीत वाढ होत आहे.
सध्या ओपन मार्केटमध्ये एखाद्या सर्वसामान्य ग्राहकाला शुद्ध सोनं खरेदी करायचे असेल तर त्याला इम्पोर्ट ड्युटी, जीएसटी पकडून सोन्याच्या एकूण किमतीवर जवळपास 18.45 टॅक्स भरावा लागत आहे. यामुळे खरेदी केलेल्या वस्तूची किंमत आणखी वाढत आहे. त्याऐवजी परदेशातील काही देशांमध्ये सोन्याच्या खरेदीवर तितका टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळे त्या देशातून सोने लपवून भारतात आणले जात आहे.
जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व देशांची अर्थव्यवस्था एका संक्रमणातून जात आहे. त्यात महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. परिणामी वाढत्या मागणीमुळे सोन्याचा दर देखील वाढत आहे. पण वाढत्या किमतीबरोबर त्यावर योग्य मार्गाने टॅक्स भरून सोने विकत घेणे आणखी महाग होत आहे. त्यामुळे इतर देशांतून सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढत आहे.