लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव घसरला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 57100 रुपये इतका आहे. मागील सहा महिन्यातील हा नीचांकी स्तर आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोने दर 58530 रुपये असून त्यात 330 रुपयांची घसरण झाली. पितृपक्ष सुरु झाल्यामुळे पुढील 15 दिवस सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच आहे. अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने वर्षअखेर व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. सेंट्रल बँकेचे महागाई रोखण्यासाठी दरवाढीचा कठोर उपाय कायम ठेवला आहे. यामुळे बॉंड यिल्ड वाढण्याची शक्यता आहे.
बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यूएस. ट्रेझरी आणि बॉंडकडे पैसा वळवला आहे. परिणामी सोन्यातील तेजी फिकी पडली. स्पॉट गोल्डचा भाव 1880 डॉलर प्रति औंसवरुन 1848 डॉलर इतका खाली आला आहे. याचे पडसाद भारतीय कमॉडिटी बाजारात उमटले. एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव 57096 रुपयांपर्यंत खाली आला. मार्च 2023 नंतरची सोन्याची सर्वात कमी किंमत आहे.
पितृपक्ष सुरु झाल्याने सोने आणि चांदीची मागणी कमी होईल. यामुळे येत्या आठवडाभरात सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कमॉडिटी विश्लेषकांच्या मते एमसीएक्सवर सोन्याचा भाव 57000 रुपयांच्या खाली घसरला तर तो 56100 रुपयांच्या पातळीपर्यंत येऊ शकतो. असे झाल्यास दसरा दिवाळीमध्ये ग्राहकांना सोने खरेदीची संधी मिळण्याची शक्यता आहे.
Goodreturns.in या वेबसाईटनुसार आज 30 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 53650 रुपये इतका आहे. सोन्याच्या किंमतीत आज 300 रुपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 58200 रुपये असून त्यात 330 रुपयांची घसरण झालाी आहे. सोने आणखी किती स्वस्त होईल, याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्राहकांनी कमॉडिटी मार्केट आणि जगभरातील आर्थिक घडामोडींकडे लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत कमॉडिटी विश्लेषक सुगंधा सचदेव यांनी व्यक्त केले.
सोने स्वस्त होत आहे कारण...
- सोन्याचा भाव कमी होण्यामागे जागतिक पातळीवरील उलथापालथ कारणीभूत आहे.
- प्रमुख देशांना महागाईने घेरले आहे. महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढीचे उपाय करावे लागत आहेत.
- वाढत्या महागाईमुळे अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका सहन करावा लागत आहे.
- ऑगस्टमध्ये अमेरिकेतील महागाई 3.9% इतकी होती. फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षेपेक्षा महागाई दर खूपच जास्त आहे.
- चीनमधील स्थावर मालमत्ता क्षेत्रात प्रचंड मंदी सुरु आहे.
- डॉलर इंडेक्स 10 महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर वधारत आहे.
- गुंतवणूक कमी झाली असून शेअर मार्केटमधील अनिश्चितता वाढली आहे.
- सुरक्षित आणि भरवशाचा पर्याय असलेल्या सोन्याकडे बघण्याचा गुंतवणूकदारांचा दृष्टीकोन बदलला आहे.