सोनं खरेदी हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. लग्नसमारंभ असो किंवा एखादे धार्मिक कार्य किंवा गुंतवणूक करायची असो, सोन्याला यासाठी सर्वाधिक मागणी असते. सोन्याचा भाव हा चढाच राहणार, ही जणू काही काळ्या दगडावरची पांढरी रेष मानून अनेक जण यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच पाहिले तर सोन्यामधील गुंतवणूक कधीच वाया जात नाही. 1991 मध्ये या सोन्यानेच भारतीय अर्थव्यवस्था वाचवली होती. 2022मध्ये सोन्याच्या किमतीत बऱ्यापैकी घसरण झाली. पण तरीही महागाईच्या काळात सोन्याची झळाळी कायम होती. त्याचे मूल्य तितकेच मौल्यवान ठरले.
Table of contents [Show]
डॉलर आणि फेडरल रिझर्व्हच्या चलनवाढीचा फटका
2022 मध्ये अमेरिकेचा डॉलर रुपयाच्या मुल्याच्या तुलनेत मजबूत होत होता. पण त्याचवेळी अमेरिकेची अर्थव्यवस्था महागाईने ग्रासली होती. काही केल्या महागाई कमी होण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सातत्याने व्याजदरात वाढ केली. यामुळे सोन्याच्या किमतीला दोन पातळीवर संघर्ष करावा लागला. एक अमेरिकन डॉलरचे वाढत चाललेले मूल्य आणि रुपयाच्या मूल्याची घसरण तर दुसरीकडे फेडरल रिझर्व्हने वाढवलेले व्याजदर. यामुळे सोन्याच्या किमतीत खूपच चढ-उतार होत होते. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलासह, अन्नधान्य आणि सोन्याच्या किमतीतही वाढ झाली.
800 ते 1 हजार टन सोन्याची आयात
सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण मानला जातो. भारतात घराघरांत दागिन्यांच्या स्वरुपात सुमारे 25 ते 30 हजार टन सोनं आहे. सोने खरेदीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारत हा सोने खरेदीतील दुसरा मोठा ग्राहक आहे. भारतीयांच्या या सोने खरेदीची हौस पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सरासरी 800 ते 1 हजार टन सोने आयात केले जाते. सध्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 56,300 रुपये (30 डिसेंबर,2022 नुसार) झाला आहे. हाच भाव वर्षभरापूर्वी म्हणजे 31 डिसेंबर, 2021 ला 51,310 रुपये होता. वर्षभरात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 5 हजारांनी वाढला
मागील 3 वर्षात सुवर्ण रोख्यांतील गुंतवणुकीत वाढ
बाजारभावापेक्षा सवलतीच्या दरात सोने खरेदीच्या संधीला ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी सुमारे 40 हजार कोटीहून अधिक रुपये गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवले आहेत. गोल्ड बॉन्डने कोरोना काळात गुंतवणूकदारांना मोठा आधार दिला होता. नोटबंदीनंतरही सोन्यामधील गुंतवणुकीसा सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दिसून आले होते.
वर्ष | गोल्ड बॉण्ड गुंतवणूक |
2021-22 | 12,991 कोटी रुपये |
2020-21 | 16,049 कोटी रुपये |
2019-20 | 9,652.78 कोटी रुपये |
सोने खरेदी करण्यामागचा उद्देश काय?
वाढती महागाई आणि आर्थिक मंदीची चाहूल या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 महिन्यांपासून जगभरातील केंद्रीय बॅंकांनी सोन्याच्या खरेदीवर भर दिला. आरबीआयनेही यावेळी बऱ्यापैकी सोने खरेदी केले. महागाई वाढली की चलनाचे मूल्य कमी होऊ लागते. यासाठी पर्याय आणि भविष्यातील सुरक्षितता म्हणून सोन्याची खरेदी केली जाते. आरबीआयने एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत एकूण 225.03 टन सोने खरेदी केले होते.
सोन्याच्या दरात चढ-उतार होण्याची बरीच कारणे आहेत. यातील सर्वांत पहिले कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यामुळे बहुतांशवेळा सोन्याच्या दरात वाढ होते. त्यानंतर आरबीआयकडून जाहीर होणारे व्याजदर, देशातील महागाई दर, सरकारचा राखीव साठा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि सोन्याच्या आयातीवर आकारले जाणारे शुल्क हे घटक सोन्याच्या किमतीवर परिणाम करत असतात.