Table of contents [Show]
आजचा सोने-चांदीचा दर काय?
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच ग्राहक सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. गेल्या 9 महिन्यांपासून सोन्याचे दर वाढतच चालले होते मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत या आठड्याच्या सुरवातीलाच भारतीय सराफा(MCX) बाजारात सोन्याचा दर 135 रुपयांनी घसरला असून आज(12 डिसेंबर) रोजी प्रति 10 ग्रॅम सोने 54,160 रुपयांवर आले आहे , याउलट चांदीचे दर मात्र 139 रुपयांनी वाढले आहेत. प्रति किलो 68,193 रुपयांवर चांदी पोहचली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सोन्याच्या दराने 9 महिन्यांचा उच्चांक गाठला होता.
सोने-चांदीसाठी नेमका अडथळा काय?
आयआयएफएल (IIFL) सिक्युरिटीजचे कमोडीटी तज्ज्ञ अनुज गुप्त यांनी सांगितले की , गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. सध्या अमेरिकेतील महागाई कमी झाली आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदराबाबत मवाळ भूमिका घेऊ शकते. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती स्थिरावण्यास मदत होईल. चीनने केलेल्या मागणीतील सुधारणेमुळे या किंमतीमध्ये अपेक्षित सुधार होऊ शकतो असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. सराफा बाजारात सोन्याला 53,700 रुपये या पातळीवर सपोर्ट मिळत असून चांदीसाठी 66,500 रुपयांचे सहमत मिळत आहे.
अमेरिकेतील महागाईचा डेटा लवकरच मिळेल
कोटक सिक्युरिटीजचे कमोडीटी तज्ज्ञ रवींद्र राव यांनी सांगितले आहे की, गेल्या आठवड्यात आंतराष्ट्रीय बाजारात सोने 1800 डॉलरच्या पातळीवर स्थिर राहिले होते. या आठवड्यातील अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी जाहीर होणार आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी ती प्रसिद्ध करण्यात येईल जी अत्यंत महत्त्वाची आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत कोणता निर्णय घेईल याकरिता हा डेटा अतिशय महत्त्वाचा आहे.
जागतिक स्तरावरील 3 बँकांची महत्त्वपूर्ण बैठक
14 डिसेंबर रोजी फेडरल रिझर्व्ह व्याजदरावर निर्णय घेईल. 15 डिसेंबर रोजी बँक ऑफ इंग्लंड आणि युरोपियन सेंट्रल बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाणार आहे. तिन्ही बँका व्याजदरात 50-50 बेसिस पाँईटने वाढ करतील असा विश्वास आहे.