आर्थिक संकटात सापडलेल्या गो फर्स्ट एअरलाईन्सने विमान सेवा पुन्हा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. गो फर्स्टने सोमवारी 5 जून 2023 रोजी नागरी हवाई वाहतूक महासंचनालयाकडे (DGCA) विमान सेवा सुरु करण्याची परवानगी मागितली आहे.
गो फर्स्टने डीजीसीएकडे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने विमान सेवा सुरु करण्याचा आराखडा सादर केला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 22 विमानांसह सेवा सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कंपनीने केली आहे.
सध्या गो फर्स्टकडे 340 वैमानिक, 680 केबिन क्रू, 530 इंजिनीअर्सचा ताफा असून या मनुष्यबळासह 22 विमानांची सेवा देणे शक्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दैनंदिन सेवेसाठी किमान 12 कोटींचा खर्च असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याबाबत इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तसंस्थेने वृत्त प्रकाशित केले आहे.
एप्रिल महिन्यात गो फर्स्टचे प्रवर्तक वाडिया कुटुंबियांनी कंपनीमध्ये 250 कोटींची गुंतवणूक केली होती.या निधीने कंपनीची सेवा सुरु करणे शक्य असल्याचे कंपनीने डीजीसीएला कळवले आहे.कंपनीला आणखी 200 कोटींची आवश्यकता आहे.
गो फर्स्टने तातडीने 400 कोटींचा निधी उभारण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 200 कोटी एप्रिल आणि मे महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी खर्च केले जातील. काही पुरवठादारांची देणी चुकती केली जातील, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आठवडाभरात डीजीसीएकडून पुन्हा सेवा सुरु करण्याची परवानगी मिळेल, असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला गो फर्स्टने दिवाळखोरीची याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादापुढे नुकताच याबाबत सुनावणी झाली. कंपनीने प्रॅट अॅंड व्हिटनी या कंपनीवर दोषी ठरवले आहे. प्रॅट अॅंड व्हीटनीने वेळेवर इंजिनांचा पुरवठा न केल्याने कंपनीला आर्थिक फटका बसला असल्याचा आरोप गो फर्स्टने केला आहे.गो फर्स्टवर 11400 कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी 6520 कोटींचे कर्ज आहे.
एअर इंजिन्स निर्माती अमेरिकन कंपनी प्रॅट अॅंड व्हीटनी या कंपनीने दिलेली इंजिन्स नादुरस्त असल्याने 1 मे 2023 रोजी 'गो फर्स्ट एअर'ला 25 विमाने वापरता आला नाहीत. याचा दैनंदिन सेवेला फटका बसला.'गो फर्स्ट एअर'ला रोजचे शेड्युल हाताळणे कठिण बनले.इंजिन्स शॉर्टेज हे काही आताचे कारण नाही तर मागील कित्येक महिने कंपनी या समस्येशी झगडत आहे.
डिसेंबर 2022 या महिन्यात नादुरुस्त इंजिन्समुळे कंपनीच्या ताफ्यातील निम्मी विमाने पार्किंगमध्ये उभी करावी लागली होती. प्रॅट अॅंड व्हीटनी विरोधात'गो फर्स्ट एअर'ने अमेरिकेतील कोर्टात दाद मागितली होती. प्रॅट अॅंड व्हीटनीने इंजिन्स पुरवली तर कंपनी विमानांचा पूर्ण क्षमतेने वापर करेल, असा आग्रह 'गो फर्स्ट एअर'ने धरला होता. मात्र कोर्टात वेगळीच माहिती समोर आली. 'गो फर्स्ट एअर'ने पैसे अदा करण्याचा दिलेला शब्द पाळला नसल्याचा दावा प्रॅट अॅंड व्हीटनी कंपनीने केला.पैसे वेळेवेर अदा न कल्याने नवीन इंजिन्स देण्यास नकार दिल्याचे प्रॅट अॅंड व्हीटनी कंपनीने म्हटले आहे.