Sanitary pads: काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये सॅनेटरी पॅड वापरण्याचे प्रमाण फार कमी होते. महिलांबरोबर मुली सुद्धा वापरत नव्हत्या. त्यानंतर गावामध्ये जनजागृती करण्यात आली. महिलांना आणि मुलींना मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता न ठेवल्यास होणारे आजार, स्वच्छतेचे फायदे समजून सांगितले. अनेकांना त्या गोष्टी पटत होत्या तर अनेक महिला तेथून उठून जात होत्या. हळूहळू यात बदल घडून आले. सर्व महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आता सॅनेटरी पॅडचे अनेक ब्रॅंड आहेत. प्रत्येक महिला वेगवेगळा ब्रॅंड वापरतात. त्याचबरोबर महिला बचत गट, आरोग्य सेविकासुद्धा कमी किमतीमध्ये सॅनेटरी पॅड पुरवतात. जाणून घेऊया, याबाबत सविस्तर माहिती.
महिला बचत गटांकडून सॅनेटरी पॅड
ग्रामीण भागामध्ये महिला बचत गट अनेक व्यवसाय राबवितात. त्यांच्याकडे अनेक समाजहिताचे कार्य दिलेले असते. महिलांविषयक समस्यांवर त्यांना उपाय शोधावा लागतो. त्यासाठी अनेक महिला बचत गट महिला व मुलींना सॅनेटरी पॅड कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतात. एखाद्या नवीन कंपनीकडून सॅनेटरी पॅड खरेदी करायचे आणि मुलींना ते विकायचे असा तो व्यवसाय चालू असतो.
बचत गटांमार्फत एक सॅनेटरी पॅडचे पॉकीट 12 ते 15 रुपयाला विकले जाते. त्यांना परवडेल अशा किमतीमध्ये त्या ते सॅनेटरी पॅड विकतात. त्याचबरोबर अस्मिता योजनेच्या माध्यमातून Asmita Yojana App वरून सुद्धा नोंदणी करून त्या सॅनेटरी पॅड मागवू शकतात. त्यातील सॅनेटरी पॅड हे मुलींना 5 रुपयांमध्ये दिले जाते.
आरोग्यसेविकांकडून सॅनेटरी पॅड
प्रत्येक गावांमध्ये आशा वर्कर असतात. आशा वर्कर राज्यातील ग्रामीण विभागातील महिला व ग्रामीण विभागातील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी पॅड संदर्भात जागृती करतात. माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देतात. यासाठी राज्यात अस्मिता योजना सुरू केली. या योजनेमध्ये गावातील आशा वर्करची निवड करून त्यांच्याकडून त्या गावातील मागणीची नोंद घेतली जाते.
ही सर्व प्रोसेस Asmita Yojana App वर करण्यात येते. ऍपवर मागणी केल्यानंतर सॅनिटरी पॅड तालुकास्तरावरील वितरकाकडे उपलब्ध करून दिले जाते. गावातील आशा वर्कर महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स या पॅकेटवर छापल्या दराप्रमाणे विक्री करते. जिल्हा परिषद शाळेतील मुलींना 5 रुपयांना सॅनेटरी पॅडचे एक पॉकीट दिले जाते त्यात 8 सॅनेटरी पॅड असतात. महिलांना तेच पॉकीट 24 ते 29 रुपयांना दिले जाते.
अस्मिता योजना कार्ड
या योजनेमध्ये लाभार्थ्यांना अस्मिता योजना कार्ड दिले जाते. या कार्डमुळे सॅनेटरी पॅड माफक दरात दिले जाते. या कार्डच्या मदतीने नोंदणी करावी लागते. अस्मिता कार्ड धारक किशोरवयीन मुलींना 5 रुपयेप्रमाणे विक्री केलेल्या पाकिटच्या संख्येच्या प्रमाणात एका पाकीट मागे 15.20 रुपयांप्रमाणे अनुदान शासनाकडून बचत गटांना दिले जाते.