Ghar Banduk Biryani: सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या आशयाचे आणि धाटणीचे विषय पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशाच एका चित्रपटाची चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. तो चित्रपट आहे, ‘घर बंदूक बिरयानी’. झी स्टुडिओ (Zee Studio) आणि नागराज मंजुळे यांचे आटपाट प्रोडक्शन (Aatpat Production) निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट शुक्रवार 7 एप्रिल 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
सैराट चित्रपटापासून झी स्टुडिओने नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) यांच्या नाळ, झुंड या चित्रपटांना पाठबळ दिले होते. त्यानंतर नागराज मंजुळे आणि झी स्टुडीओ हे एक सुपरहिट कॉम्बिनेशन तयार झाले आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांचा सुपरहिट फिल्म फॉर्म्युला आणि त्यांच्या चित्रपटांनी केलेल्या कमाईबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
'सैराट' एक रेकॉर्ड ब्रेक फिल्म
2016 साली झी स्टुडिओ निर्मित आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (Sairat) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने मराठी फिल्म इंडस्ट्रीला पुन्हा सोन्याचे दिवस दाखवले. केवळ 4 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई करत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नवा रेकॉर्ड रचला.
या चित्रपटातील गाणी प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल (Ajay-Atul) यांनी संगीतबद्ध केली आहेत. मराठीत पहिल्यांदा संगीताचा नवा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. यातील झिंगाट, सैराट झालं जी या गाण्यांनी फक्त मराठीच नाही तर नॉन मराठी लोकांनाही ठेका धरला भाग पाडलं. कोणताही कोरिओग्राफर नसताना डान्स स्टेपही फेमस करून दाखवण्याचं धाडस सैराटने करून दाखवलं.
स्थानिक कलाकार, सोलापूर स्थानिक ठिकाण आणि कमी बजेट चित्रपटाला नागराज मंजुळेच्या क्रिएटिव्हिटीने आणि झी स्टुडिओच्या आर्थिक पाठबळामुळे मोठं यश मिळालं. यानंतर झी स्टुडिओ आणि नागराज (Zee Studio & Nagaraj Manjule) यांचे संबंध अधिक घट्ट झाले. नागराजच्या नाळ, झुंड आणि आत्ताच आलेला घर बंदूक बिरयानी या चित्रपटांना झी स्टुडिओने आर्थिक पाठबळ पुरविले.
इतर चित्रपटांची कमाई
झी स्टुडिओच्या आर्थिक पाठबळामुळे 2018 साली नागराज यांनी आई-मुलाची एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडली. या चित्रपटाचे बजेट 3 करोड रुपयांचे होते. यातील 'आई मला जावदे नवं' या गाण्याने सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सेट केला. ज्याचा फायदा चित्रपटाला झाला. या चित्रपटाने जवळपास 40 करोड रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. मराठी भाषेतील चित्रपटाचे यश पाहून झी स्टुडिओने नागराज यांच्या झुंड (Jhund) या हिंदी भाषेतील चित्रपटासाठी 22 करोड रुपयांचे बजेट दिले. या चित्रपटात बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या चित्रपटालाही प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं आणि त्यातून त्याने जवळपास 30 कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे.
यानंतर आता प्रेक्षकांसाठी नागराज झी स्टुडिओच्या मदतीने घर बंदूक बिरयानी (Ghar Banduk Biryani) हा नवा कोरा ऍक्शन मुव्ही घेऊन आले आहेत. या चित्रपटाची चर्चा पाहता हा चित्रपट देखील चांगली कमाई करेल, असे बोलले जात आहे.
सिने अभ्यासक काय सांगतात?
नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओच्या कॉम्बिनेशनबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या चित्रपटाच्या यशाबद्दल महामनीने सिने अभ्यासक अमोल उदगीरकर (Amol Udagirkar) यांच्याशी महामनीने संवाद साधला असता, ते म्हणाले की, झी स्टुडिओ हे एक मोठे आणि नामांकित प्रोडक्शन हाऊस आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये नागराज यांची क्रिएव्हीटी आणि झी स्टुडिओ यांचे आर्थिक पाठबळ हे दोन्ही घटक घर बंदूक बिरयानी या सिनेमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतील.
चित्रपट यशस्वी होण्यामागे आणखी एक गोष्ट असते, ती म्हणजे त्या चित्रपटाला उपलब्ध झालेली चित्रपटगृहे. जितक्या जास्त स्क्रीन चित्रपटाला मिळतील तितकी जास्त कमाई होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे झी स्टुडिओची निर्मिती असल्यामुळे या चित्रपटांना जास्त चित्रपटगृह किंवा स्क्रीन उपलब्ध होण्यासाठी मदत होते. याचाच थेट फायदा चित्रपटाच्या कमाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे (Ashok Rane) यांनी महामनीशी बोलताना सांगितले की, झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे हे एकमेकांना पूरक असे चित्रपट कर्मी आहे असे म्हणायला हरकत नाही. याशिवाय नागराज यांची कथानके ही साधी आणि लोकांना अपील होणारी असतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चित्रपटाचे लोकेशन हे स्थानिक असते, कलाकार हे नवखे असतात आणि नवनवीन गोष्टी करण्यावर त्यांचा भर असतो.
पुढे ते म्हणाले की, झी स्टुडिओ चित्रपटाच्या प्रमोशनवर देखील मोठा खर्च करते. झी चे स्वतःचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म असल्याने त्यावर या चित्रपटाचे प्रमोशन केले जाते. यासोबत लोकल स्टोरी असल्याने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक दौरे देखील केले जातात. ज्याचा फायदा बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतो. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला घर बंदूक बिरयानी चांगलीच कमाई बॉक्स ऑफिसवर करेल याबद्दल काहीच शंका नाही.
या चित्रपटगृहांत 'घर बंदूक बिरयानी' पाहता येईल?
'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल, तर तुम्ही 'Bookmyshow' या अँपवर जाऊन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. त्याच ठिकाणी तिकिटाचे बुकिंगही करू शकता. Bookmyshow या वेबसाईटवर तुम्हाला या चित्रपटाचे तिकीट 150 ते 200 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. टॅक्स ऍड करून ही किंमत वाढू शकते. चित्रपटगृह देत असलेल्या सुविधेनुसार सुद्धा तिकिटाचे दर बदलू शकतात. अनेक थिएटर्समध्ये या सिनेमाला प्राईम शो मिळाले आहेत.