देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) योनो अॅप (YONO App) च्या माध्यमातून 35 लाखांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा दिली आहे. योनो अॅपचा (YONO App) वापर करून रिअल-टाईम एक्सप्रेस क्रेडिट (RTXC) सुविधेचा लाभ घेता येता येणार आहे. या कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. संबंधित ग्राहकाच्या घराजवळ बँकेची शाखा नसली तरीही त्यांना कर्ज दिले जाणार आहे.
पण, ही सुविधा फक्त पगारदार व्यक्तींसाठी उपलब्ध असून, यासाठी त्या व्यक्तीचे पगार खाते (Salary Account) एसबीआय बॅंकेत असणे आवश्यक आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, रिअल-टाईम एक्सप्रेस क्रेडिट अंतर्गत, कर्ज घेण्यासाठी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही.
एसबीआय रिअल-टाईम एक्सप्रेस क्रेडिटसाठी कोण पात्र आहे
ज्यांचे एसबीआय बॅंकेत पगार खाते (Salary Account) आहे
संबंधित खातेदाराचे किमान मासिक उत्पन्न 15 हजार रूपये असावे
केंद्र/राज्य/अर्ध-सरकारी आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमधील कर्मचारी
राज्य सार्वजनिक क्षेत्रातील संस्थामधील कर्मचारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी
बॅंकिंग सुविधांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, बँक तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग सुविधांचा सातत्याने प्रचार करत आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांच्या बँकिंग गरजा सुलभ करण्यासाठी रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिट कर्ज सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासोबतच बँक सर्वात कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देत असल्याचा दावाही एसबीआयने केला आहे. या अॅपद्वारे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही सुरक्षा किंवा गॅरेंटरची गरज भासणार नाही.