भारत हा अमेरिकेपेक्षा कितीतरी वर्षे मागे आहे; असे पूर्वी म्हटले जात होते. पण आता ही दुरी बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून येते. अर्थात याचे सर्व श्रेय डिजिटायझेशनला जाते. पण हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील Generation Z (जेन झी) पिढी ही कामातून लवकर निवृत्त होण्याचा विचार करत आहे. म्हणजे त्यांना मागील पिढीसारखे वयाच्या 55 किंवा 60 वर्षापर्यंत काम करायचे नाही. लवकरात लवकर कामाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पुढील आयुष्य मजेत आणि आनंदाने घालवायचे आहे.
असाच विचार आपल्याकडील आताची पिढी म्हणजेच GenZ करत असेल का? करत असेल तर त्यांनी काही गोष्टींची नक्कीच पूर्वतयारी केली पाहिजे. कारण अमेरिकेतील तरुण पिढीने कामातून लवकर फ्री होण्याचा निर्णय घेताना, त्यादृष्टीने प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. कारण कामातून लवकर रिटायर्ड व्हायचे असेल तर त्यासाठी पुढील काही वर्षांची आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. ज्याचा अमेरिकेतील या पिढीने विचार केलेला नाही, असे एका सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.
रिटायर्ड व्हायचंय पण त्याचे नियोजन नाही...
अमेरिकेतील क्रेडिट कर्मा या पर्सनल फायनान्स कंपनीने (Credit Karma,Personal Finance Company) GenZ आणि त्याच्या अलिकडच्या पिढीतील तरुणांचा सर्व्हे केला असून, त्यातील आकडेवारीवरून ही गोष्टी कळली आहे. यामध्ये जे अगोदरच्या पिढीचे आहेत; म्हणजेच जे GenZ पिढीच्या अगोदरच्या पिढीतील आहेत. त्यातील 53 टक्के लोकांनी आपल्या रिटायर्डमेंटचा विचार करून त्यादृष्टीने फायनान्शिअल प्लॅनिंग केले आहे. पण GenZ पिढीकडे असे काही नियोजनच नाही. त्यांना अगोदरच्या पिढीपेक्षा भरपूर पैसा कमवायचा आहे. तो त्यांना पाहिजे तसा खर्चदेखील करायचा आहे. पण भविष्यात तो कसा उपयोगी पडेल याचे नियोजन त्यांच्याकडे नसल्याचे या सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.
रिटायर्डमेंट प्लॅनिंग कसे असायला हवे?
निवृत्तीचे नियोजन करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन सुरू कराल तेवढा जास्त निवृत्तीचा फंड जमा होईल. निवृत्तीसाठी पैसे बाजुला काढून ठेवणे किंवा फक्त बचत करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही. कारण फक्त बचत करून पैसे वाढणार नाहीत. ते योग्य आणि सुरक्षित योजनांमध्ये गुंतवले तर त्या पैशांचे मूल्य वाढू शकते. कारण महागाई ज्या पटीने वाढत आहे. त्या पटीने आपण गुंतवणूक किंवा बचत करत नाही. त्यामुळे भविष्यातील महागाईचा विचार करून त्यादृष्टीने निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे.
क्रेडिट कर्मा या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात असेही दिसून आले आहे की, GenZ पिढीने लवकर निवृत्त होण्याचा विचार करताना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी लागणारा पैसा कोठून आणि कसा मिळेल याचा पुरेसा विचारच केलेला नाही. जवळपास 32 टक्के तरुणांनी रिटायर्डमेंट प्लॅनिंगसाठी बचतच केलेली नाही.
सकारात्मक दृष्टिकोन आणि सर्वांगिण विचार महत्त्वाचा
कामातून लवकर निवृ्त्त होणे हा एक सकारात्मक विचार झाला. पण त्यादृष्टीने त्याचे नियोजन देखील त्याच विचाराने होणे गरजेचे आहे. कारण नुसते कामातून लवकर निवृत्त होऊन पुढील आयुष्य कसे जगणार याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेसा निधी आता साठवला जात आहे का? म्हणजे ज्या गतीने महागाई वाढत आहे; त्या गतीने साठवलेल्या पैशांमध्ये वाढ होणार आहे का? आणि तो भविष्यात पुरेल का? याचा सर्वांगिण विचार होणे गरजेचे आहे.
अमेरिका असो किंवा भारत. दोन पिढ्यांमध्ये नेहमीच विचारांची तफावत राहिली आहे. ती नियोजन आणि सातत्य यासारख्या गोष्टींमध्ये तर प्रकर्षाने दिसून येते. म्हणून निवृत्तीचा विचार होत असेल तर आपल्या अगोदरच्या पिढीने जे केले तेच करण्याचा अट्टहास नसावा पण ते का केले आणि त्याचा परिणाम लक्षात घेऊन त्यादृष्टीने आर्थिक नवविचार करण्यास काहीस हरकत नाही.