सहा महिन्यापूर्वी कॉर्पोरेट जगतात खळबळ उडवून देणारा हिंडेनबर्ग संस्थेचा अहवाल हा अदानी समूहाची बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्याचा डाव असल्याचे उद्योजक गौतम अदानी यांनी म्हटले आहे. अदानी एंटरप्राईसेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग अहवालाबाबत समभागधारकांसमोर भूमिका स्पष्ट केली.
अदानी समूहाने हिंडेनबर्ग अहवालाचे वेळोवेळी खंडन केले मात्र तरिही या समूहाची बदनामी करणे, विश्वासार्हता व पत खराब करण्यासाठी तसेच छुप्या फायद्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आल्याचा आरोप अदानी यांनी या सभेत केला. हिंडेनबर्ग अहवालातील माहिती आणि आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या अहवालामागे अदानी ग्रुपचे शेअर्समध्ये मोठी घसरण करुन त्यातून नफा कमावण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप गौतम अदानी यांनी भाषणात केला. 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा अहवाल जाहीर झाला होता. त्यानंतर अदानी ग्रुपमधील सर्वच शेअर्सची धुळदाण उडाली होती. अदानी समूहाचे बाजार भांडवल तब्बल 145 बिलियन डॉलर्सने घटले होते.
अदानी ग्रुपच्या फॉलोऑन पब्लिक ऑफरला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. पूर्ण सबस्क्राईब होऊन देखील हा एफपीओ रद्द करुन गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे गौतम अदानी यांनी सांगितले.
समभागधारकांचे मानले आभार
गौतम अदानी यांनी यावेळी अदानी समूहात गुंतवणूक कऱणाऱ्या समभागधारकांचे आभार मानले. अदानी ग्रुपची आजवरची कामगिरी सर्वकाही सांगते. संकटकाळात पाठीशी उभे राहिलेल्या शेअर होल्डर्सला अदानी यांनी धन्यवाद दिले. ते म्हणाले की या संकटातून बाहेर पडत अदानी ग्रुपने आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदारांकडून निधी उभारला. तसेच या काळात पतमानांकन संस्थांनी अदानी ग्रुपची मानांकन कपात केली नाही, असे गौतम अदानी यांनी स्पष्ट केले.