देशातल्या सरकारी बँका (Public Sector Bank) आणि त्यांनी उद्योगपतींना दिलेली कर्जं हा भारतात वादाचा विषय ठरला आहे. खास करून किंगफिशरचे (Kingfisher) मालक विजय माल्या (Vijay Malya) यांनी कर्जाची परतफेड करता येत नाही म्हटल्यावर देश सोडून जाणं, नीरव मोदी (Nirav Modi) आणि मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांनी भारतीय बँकांना फसवून देशाबाहेर पलायन करणं या प्रकरणांनंतर ही गोष्ट आणखी चवीने चर्चिली जाऊ लागली. अलीकडच्या काळात जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या बाबतीतही समुहावर (Adani Group) असलेल्या कर्जामुळे उलट सुलट चर्चा रंगल्या.
गौतम अदानींना पंतप्रधान मोदींशी (Narendra Modi) असलेल्या जवळीकीमुळे करोडो रुपयांची कर्जं मिळतात. आणि भारतीय बँका त्यांना मर्जीप्रमाणे कर्जं देतात अशी ओरड अगदी मीडियातही रंगली होती. अलीकडेच एका मुलाखतीत गौतम अदानी यांनी या प्रश्नाला आकडेवारीतून उत्तर दिलं आहे.
इंडिया टुडे वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अदानी म्हणतात, ‘समुहावर असलेल्या कर्जापैकी 50% कर्जं आणि आंतरराष्ट्रीय बाँड्सच्या रुपाने उचललं आहे. आणि भारतीय बँकांकडून घेतलेलं कर्जं एकूण कर्जाच्या 32% इतकं आहे.’
मग तुमच्या बाबतीत उलट सुलट चर्चा का रंगतात याला उत्तर देताना अदानी म्हणतात, ‘लोक आणि मीडिया माहिती न घेता आणि नीट शाहनिशा न करता बोलतात.’ त्याचवेळी अदानी हे ही मान्य करतात की, आठ वर्षांपूर्वी अदानी समुहावरचं कर्ज छोटं होतं. आणि त्यातलं 80% कर्जं हे भारतीय बँकांमधून घेतलेलं होतं.
‘आंतरराष्ट्रीय संस्था किती काटेकोरपणे कागदपत्रं तपासतात तुम्हाला माहीत आहे. तरीही त्यांनी अदानी समुहाला कर्जं देऊ केली आहे. यात समुहाची विश्वासार्हता दडलेली आहे,’ असं अदानी इंडिया टुडेचे व्यवस्थापकीय संपादक राज चेंगप्पा यांच्याशी बोलताना म्हणाले.
कर्जावरचा एकही हप्ता न चुकल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. 60 वर्षीय गौतम अदानी यांनी मागच्या चार ते पाच वर्षांत आपल्या उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. बंदर व्यवस्थापन, ऊर्जा आणि निर्यात उद्योगाला त्यांनी विमानतळ देखभाल, डेटा सेंटर, सिमेंट, अॅल्युमिनिअम, इंधन अशा क्षेत्रांमध्ये विस्तार केला आहे. त्यासाठी जगातल्या मोठ्या कंपन्या विकत घेतल्या आहेत. पण, हे करताना अर्थातच त्यांनी मोठी कर्जंही घेतली आहेत.
मार्च 2022 मध्ये अदानी समुहावर 1.88 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. यातलं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून घेतलेलं कर्जं 21%, खाजगी बँकांकडून घेतलेलं कर्ज 11% इतकं आहे. तसा अहवाल अदानी समुहाने मार्च 2022 ला सादर केला होता.