भारताला जगाच्या पर्यटन नकाशावर (International Tourist Destination) आणण्यासाठी गंगा विलास (Ganga Vilas Cruise) ही जगातली सगळ्यात मोठी नदीवरची क्रूझ (River Cruise) आखण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानेही (Ministry of Jal Shakti) तसंच सांगितलं आहे. आज (13 जानेवारी) या क्रूझचा लोकार्पण सोहळा पार पडला. या क्रूझची 10 ठळक वैशिष्ट्यं समजून घेऊया.
Table of contents [Show]
- गंगा नदीवर क्रूझ सफारी
- भारतात तयार झालेली MV गंगा विलास
- क्रूझवर किती प्रवाशांची सोय?
- कसा असेल क्रूझचा मार्ग?
- क्रूझवर कोणत्या सुविधा?
- परदेशी पर्यटकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न
- बोटीवरचा आधुनिक मलनि:सारण प्रकल्प
- गंगा विलास क्रूझवर होणारी टीका
- लोकार्पणावेळी पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
- वाराणसी नदी काठावर ‘टेंट सिटी’
गंगा नदीवर क्रूझ सफारी
‘गंगा विलास क्रूझमुळे जगाच्या पर्यटन नकाशावर पूर्व भारत पोहोचला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यातल्या लोकांना आता पर्यटनामुळे रोजगार मिळेल, बाहेरच्या राज्यांत स्थलांतरित व्हावं लागणार नाही,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले. गंगाविलास क्रूझ बरोबरच वाराणसीच्या काठावर तंबू उभारण्यात आले आहेत. या दोन प्रकल्पांमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगार वाढेल असं केंद्रसरकारला वाटतंय.
भारतात तयार झालेली MV गंगा विलास
क्रूझसाठी बनवलेली MV गंगा विलास ही बोटही भारतातच बनली आहे. आणि अशा प्रकारची भारतात बनलेली ही पहिली आलिशान क्रूझ बोट आहे. ही बोट 51 दिवसांत 3,200 किलोमीटर नदीवर पार करणार आहे. पहिलं बुकिंग स्वीत्झर्लंडच्या एका गटाने केलं. त्यांचं स्वागत वाराणसीच्या डेकवर शेहनाईचे सूर वाजवून करण्यात आलं. हार घालून भारतीय पाहुणचाराचा आनंद त्यांना देण्यात आला. हे पर्यटक आधी वाराणसीतल्या विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत.
क्रूझवर किती प्रवाशांची सोय?
या क्रूझचे संचालक राजसिंग यांनी या विषयीची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या बोटीवर 18 आलिशान खोल्या आहेत. आणि त्यामधून 36 पर्यटक राहू शकतात. याशिवाय बोटीवर 40 कर्मचारी असतील. त्यांच्या राहण्याची सोयही करण्यात आली आहे. या बोटीची लांबी 62 मीटर तर रुंदी 12 मीटर इतकी आहे.
कसा असेल क्रूझचा मार्ग?
आधी सांगितल्या प्रमाणे क्रूझ 51 दिवसांची आहे. आणि या दरम्यान बोट 27 नदी प्रवाहांमधून प्रवास करेल. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतातल्या पुरातन वारसा लाभलेली पर्यटन स्थळं, राष्ट्रीय उद्यानं, नदीचे घाट तसंच पाटणा, शाहीगंज, कोलकाता आणि ढाका (बांगलादेश) आणि गुवाहाटी यासारखी ऐतिहासिक गावं या सफरीत पाहता येणार आहेत. बोटीचा मुक्काम 50 ठिकाणी असेल.
क्रूझवर कोणत्या सुविधा?
या आलिशान क्रूझवर स्पा, सलोन आणि जिम सारख्या सुविधा उपलब्ध असतील. बोटीचं भाडंही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल. ते आहे संपूर्ण क्रूझसाठी 20 लाख रुपये. तर एका दिवसासाठी 25,000 ते 50,000 रुपये. या बोटीवर प्रदूषणाचा किंवा आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी खास यंत्रणा बसवण्यात आली आहे.
परदेशी पर्यटकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न
क्रूझचे दर पाहता ही बोट खासकरून परदेशी पर्यटकांसाठी आहे हे तुम्हाला कळलं असेलच. केंद्रीय बंदर वाहतूक आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही हे लपवलेलं नाही. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सोनोवाल यांनी ‘पर्यटकांना भारतीय तीर्थस्थळं, कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांची ओळख या क्रूझमधून होईल. आणि त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येईल. या क्रूझच्या माध्यमातून ते भारताशी जोडले जातील,’ अशा भावना व्यक्त केल्या.
बोटीवरचा आधुनिक मलनि:सारण प्रकल्प
या बोटीवर बसवलेली आधुनिक मल नि:सारण यंत्रणा हे बोटीचं आणखी एक वैशिष्ट्यं आहे. यामुळे बोटीवर तयार होणारा कचरा आणि इतर घाण ही गंगा नदीत मिसळणार नाही. तर त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा बोटीत बसवण्यात आली आहे. शिवाय प्रवाशांची आंघोळ आणि इतर विधींसाठी गंगा नदीचं पाणी स्वच्छ करून ते वापरण्यात येणार आहे. त्यासाठी बोटीवर जल शुद्धीकरण प्रकल्पही बसवण्यात आला आहे.
गंगा विलास क्रूझवर होणारी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर टीकाही होतेय. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याविषयी एक ट्विट केलंय. ‘आता BJP नावाड्यांच्या नोकऱ्याही खाणार का?’ असा प्रश्न त्यांनी ट्विटमधून केला आहे. भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा उपयोग पैसे कमावण्यासाठी करण्याची सरकारची वृत्ती निंदनीय आहे असंही ते म्हणालेत. ‘देशातले महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून असा मुद्यांकडे नजर वळवण्याचा भाजपचा प्रयत्न फलद्रुप होणार नाही,’ असं त्यांनी सरकारला सुनावलं आहे.
लोकार्पणावेळी पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी परदेशी पर्यटकांशीही बोलले. ‘भारत तुमच्या कल्पेनेपलीकडे तुम्हाला देऊ शकतो. भारत देशाची साधी-सोपी व्याख्या शक्त नाही. भारत समजण्यासाठी ह्रदयाची मदत घ्यावी लागेल. आणि तो अनुभवावा लागतो,’ असं मोदी परदेशी पर्यटकांना उद्देशून म्हणाले.
वाराणसी नदी काठावर ‘टेंट सिटी’
याचवेळी पंतप्रधान मोदींनी वाराणसीच्या काठावर तंबूच्या घरांचं उद्घाटनही केलं. याला ‘टेंट सिटी’ असं म्हटलं जातंय. गुजरातच्या कच्छ आणि राजस्थानमध्ये उभारलेल्या टेंट सिटीच्या धरतीवर हा प्रकल्प असणारए. नदीच्या काठाचा पॅनोरमिक नजारा दाखवणारं हे तंबूंचं शहर आता लोकांसाठी खुलं झालं आहे. इथं नदीकाठी वेळ घालवण्या बरोबरच तुम्ही भारतीय शास्त्रीय संगीत, आरती आणि योगा यांचा आस्वाद घेऊ शकता. या प्रकल्पाची किंमत जवळ जवळ 1000 कोटी इतकी आहे.