सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाने गेले तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत पाचशे कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. चौथ्या आठवड्यातच भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'गदर 2 ' हा बाहुबली 2 (हिंदी भाषा) आणि पठाणनंतरचा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.
'गदर 2' चा आज बॉक्स ऑफिसवरचा 25 वा दिवस आहे. रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांतच 'गदर 2' ने 50 कोटींचा गल्ला जमवला होता. 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर , एक प्रेम कथा' व 'गदर 2' चित्रपटाच्या भागानेही चौथ्या आठवड्यात 8.13 कोटी इतकी कमाई केली होती, जी 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटानंतरची सर्वाधिक कमाई होती.
कमाईत मात्र घसरण
अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला 'गदर 2' हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर , एक प्रेम कथा' या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. आपल्या मुलाला पाकिस्तानी सैन्याच्या तावडीतून सुटका करणाऱ्या वडिलांची भूमिका सनी देओलने या चित्रपटात साकारली आहे. भारत - पाकिस्तानसारखा संवेदनशील विषय, सनी देओलचे पुनरागमन आणि ॲक्शन सीन्स यांमुळे हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही गर्दी खेचत आहे.
परंतु दुसरीकडे पहिल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत चित्रपटाच्या एकूण कमाईत कमालीची घसरणही झालेली दिसते आहे. जिथे पहिल्या दोन आठवड्यात चित्रपटाने 284.63 कोटी आणि 134.47 कोटी अशी कमाई केली होती तिथे आता चौथ्या आठवड्यात मात्र चित्रपटाने 2.50 कोटींचा गल्ला जमवला असल्याचा अंदाज Sacnilk.com ने वर्तवला आहे.
भारतात गदर 2 ने गर्दी खेचली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 650 कोटींहून अधिक कमाई केली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दहावा भारतीय चित्रपट ठरला आहे. यामुळे सनी देओल आणि अमिषा पटेलच्या दमदार अभिनयाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.