नुकताच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जी-20 देशांच्या परिषदेसाठी केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव खर्चावरुन सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. जी-20 परिषदेसाठी सरकारने प्रमाणापेक्षा अफाट खर्च केल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. जी-20 परिषदांसाठी केंद्र सरकारने तब्बल 4100 कोटींचा खर्च केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.#"Government of India" असा ट्रेंड सध्या X वर सुरु आहे.
वर्ष 2023 करिता जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. मागील सहा महिन्यांपासून देशभरातील विविध शहरांमध्ये जी-20 समूहाच्या विविध मंत्रीगटाच्या परिषदा पार पडल्या. नुकताच नवी दिल्लीत जी-20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
या परिषदेच्या व्यवस्थेसाठी राजधानी दिल्लीत प्रचंड खर्च करण्यात आला. यावरुन कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मीडिया रिपोर्टनुसार सरकारने जी-20 देशांचे यजमानपद आणि त्यासाठी वर्षभर होणाऱ्या परिषदांकरिता 990 कोटींचे बजेट ठरवले होते. मात्र प्रत्यक्षात हा खर्च 300% वाढला आहे. सरकारने जी 20 परिषदांसाठी तब्बल 4 हजार 110 कोटी 75 लाख खर्च केल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे.  
तृणमूल कॉंग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी केंद्र सरकारने जी 20 परिषदांसाठी राखीव ठेवलेल्या खर्चाच्या तुलनेत 300% जास्त खर्च केल्याचा आरोप केला आहे. बजेटमध्ये या करिता 990 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सरकारने 4100 कोटी खर्च केल्याचा आरोप गोखले यांनी X हॅंडलवर केला आहे.
साकेत गोखले यांच्या आरोपांचे समर्थन करत कॉंग्रेस पक्षाने देखील केंद्र सरकारच्या उधळपट्टीवर टीका केली आहे. जनतेच्या मेहनतीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिमा उजळण्यासाठी वापरला असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.
भारत मंडपम साकारण्यासाठी 3600 कोटी खर्च
दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. दिल्लीत जी 20 आयोजनासाठी आम आदमी पक्षाने केंद्राकडे 927 कोटींची मागणी केली होती, मात्र सरकारने एक रुपया नाही दिला, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याउलट भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सादर केलेल्या तपशीलावर आम आदमी पार्टीने बोट ठेवले आहे. लेखी यांच्या ट्विटनुसार प्रगती मैदानावर भारत मंडपम साकारण्यासाठी सरकारने 3600 कोटी खर्च केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. 2017 पासून भारत मंडपम उभारणीचे काम सुरु होते.
उपस्थितांना दिली महागडी गिफ्ट
जी 20 देशांच्या समूहाचे यजमानपद असलेल्या भारताने बैठका आणि परिषदांसाठी आलेल्या जी-20 देशांच्या प्रतिनिधींना महागडी गिफ्ट वाटल्याचा ट्रेंड आज मंगळवारी 12 सप्टेंबर 2023 रोजी X वर दिसून आला. यात दुर्मिळ कलाकुसरीच्या वस्तू, दार्जिलिंग आणि निलगिरीमधील चहा, कॉफी, झिंगराना अत्तर, बनारसी साडी, कांजीवरम साडी, काश्मिरी वस्त्रे भेट स्वरुपात देण्यात आली. या गिफ्ट्सचे फोटो आज व्हायरल झाले.
खर्चाबाबत केंद्र सरकारचे मौन
जी 20 यजमानपद आणि आयोजनासाठी 4100 कोटींचा खर्च केल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. जी 20 परिषदेचे शेर्पा निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत आहेत. मात्र त्यांनी नेमका किती खर्च झाला यावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आरोपांना धार आली आहे. मात्र लवकरच सरकारकडून यावर निवेदन जारी केले जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            