चीन आणि रशियाच्या हरकतींनी हैराण झालेल्या अमेरिकेने भारतासोबत द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दोन्ही देशांमधील महत्वाच्या निर्णयांना येत्या सप्टेंबर महिन्यात अंतिम स्वरुप मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी-20 लिडरशीप समिटसाठी उपस्थित राहणार आहेत. (US President Joe Biden Travelling to Indian in September 2023) या दौऱ्यात बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारताकडे वर्ष 2023 चे जी-20 देशांच्या समूहाचे अध्यक्षपद आहे. त्यानुसार जानेवारीपासून देशातील विविध शहरांमध्ये जी-20 गटांच्या परिषदांचे आयोजन केले जात आहे. जी-20 देशांच्या सर्वोच्च नेत्यांची परिषद (G-20 Leadership Summit in September 2023) सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. या परिषदेला बायडेन यांच्यासह जी-20 देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही परिषद भारतासाठी प्रचंड महत्वाची असल्याचे बोलले जाते.
यंदाचे वर्ष भारत, अमेरिका आणि जी-20 देशांसाठी विशेष महत्वाचे आहे. भारत जी-20 देशांचे यजमानपद भूषवत आहे. अमेरिका APEC परिषदेचे आयोजन करणार आहे. जपानमध्ये जी-7 देशांची परिषद होणार आहे. त्यामुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने हे वर्ष प्रचंड घडामोडींचे असेल, असे मत अमेरिकेचे असिस्टंट सेक्रेटरी डोनाल्ड लू यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की भारतात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी-20 लिडरशीप समिटसाठी प्रेसिडेंट जो बायडेन उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारत आणि अमेरिकेतील संबधांना आणखी बळकटी मिळेल, असा विश्वास लू यांनी व्यक्त केला.
भारतात आतापर्यंत झालेल्या जी-20 बैठकांचे लू यांनी कौतुक केले आहे. गेल्या महिन्यात जी-20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक पार पडली होती. येत्या काही महिन्यात जी-20 समूहाच्या आणखी काही मिटींग होणार आहे. त्यामध्ये भारताकडून चोख व्यवस्था असेल असे डोनाल्ड लू यांनी यावेळी सांगितले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह सेक्रटरी ऑफ स्टेट टोनी ब्लिंकेन, ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन आणि कॉमर्स सेक्रेटरी गिना रायमॅंडो हे भारत दौऱ्यावर येणार आहेत.
निवडणुकांच्या दृष्टीने बायडेन यांचा दौरा महत्वाचा
जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. जो बायडेन हे पुढल्या प्रेसिडेंट इलेक्शनसाठी पुन्हा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. त्याशिवाय वर्ष 2024 मध्ये भारतात देखील सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांच्यादृष्टीने भारत-अमेरिका देशांमधील संबध दृढ करणे फायदेशीर ठरणार आहे.
(News Source : Economics Times)