Free Look Period: सध्या बाजारात विविध प्रकारच्या विमा पॉलिसी विकण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. विमा एजंट, ग्राहक प्रतिनिधींचे सेल्स कॉल दिवसातून एकदा तरी नागरिकांना येतातच. ग्राहकांची गरज नसतानाही अनेकवेळा पॉलिसी माथी मारली जाते. मग, पॉलिसी घेतल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, अशा वेळी फ्री लूक पिरियड मदतीला धावून येईल. या कालावधीत तुम्ही चुकलेला निर्णय सुधारू शकता. ते कसे या लेखात पाहूया.
फ्री लूक पिरियड म्हणजे काय?
कोणतीही पॉलिसी खरेदी केल्यानंतर विमा कंपनी एक ठराविक कालावधी ग्राहकाला देते. या कालावधीत ग्राहक पॉलिसी रद्द करू शकतो. अर्थात त्याचे पैसे रिफंड मिळतील. तसेच पॉलिसीमध्ये बदल करू शकतो. म्हणजेच जे काही फायदे आहेत त्यातील अनावश्यक रद्द करून गरजेचे तेवढेच ठेवू शकतो. बऱ्याच वेळा पॉलिसी घेताना सर्व गोष्टी लक्षात येत नाहीत. मात्र, नंतर तुमच्या जर लक्षात आले तर फ्री लूक पिरियडमध्ये नक्की पॉलिसीत बदल करून घ्या.
फ्री लूक पिरियडचे ग्राहकाला कोणते फायदे मिळतात?
काही ग्राहक अपुऱ्या माहितीमुळे किंवा घाई घाईत विमा पॉलिसी खरेदी करतात. अशी पॉलिसी बंद करता येऊ शकते. पॉलिसीतून तुमची आर्थिक उद्दिष्ट, गरजा पूर्ण होत आहेत की नाही हे तुम्ही पडताळून पाहू शकता. जर तुम्ही पॉलिसीच्या फायद्यांपासून समाधानी नसाल तर बदल करू शकता किंवा रद्द करू शकता. पॉलिसीमधील माहितीत काही चूक असेल तर दुरूस्त करू शकता. (Free Look Period) पॉलिसी घेताना ग्राहक प्रतिनिधीने जे काही फायदे सांगितले होते आणि विमा कागदपत्रांमध्ये जे काही नमूद केले आहेत, ते तुम्ही पडताळून पाहू शकता.
फ्री लूक पिरियडमध्ये पॉलिसीत बदल कसा कराल
बऱ्याच विमा कंपन्या ऑनलाइन पॉलिसी खरेदी करत असाल तर 30 दिवसांचा फ्री लूक पिरियड देतात. ऑफलाइन म्हणजेच कार्यालयात किंवा एजंटकडून पॉलिसी खरेदी केली तरही फ्री लूक पिरियड मिळतो. विमा नियामक संस्था इर्डाने कमीत कमी 15 दिवस फ्री लूक पिरियड असावा असे बंधन घातले आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही मोडने पॉलिसी घेतली असेल तरी कंपनीला मेल लिहून पॉलिसी रद्द किंवा त्यात बदल करता येईल.
विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन लेखी पत्र लिहून देऊ शकता. विमा कंपनी तुमची मागणी तपासून घेईल. तुमच्याशी संपर्क साधेल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करेल. मेलमध्ये किंवा पत्रात पॉलिसी नंबर नमूद करावा लागेल. सोबत इतर माहिती कंपनीने मागितली तर तीही द्यावी लागेल.
रिफंड मिळवण्याचे नियम
फ्री लूक पिरियडमध्ये विमा पॉलिसी रद्द केली तर शुल्क वजा करून रक्कम माघारी दिली जाते. वैद्यकीय चाचणीचा खर्च, स्टँप ड्युटी, व्यवस्थापन शुल्क वजा करून पैसे माघारी मिळतात. जर फ्री लूक पिरियडमध्ये तुम्ही विम्याचा दावा केला असेल तर रिफंड मिळणार नाही.
पॉलिसी जेवढा काळ सुरू होती त्या प्रमाणातही विमा कंपनी काही रक्कम कापून घेते. उदाहरणार्थ, जर 20 दिवसानंतर तुम्ही पॉलिसी रद्द करत असाल तर या 20 दिवसांसाठी विमा कंपनी काही शुल्क आकारते.