आधार कार्ड हे असे ओळखपत्र आहे ज्याशिवाय कोणतेही सरकारी काम अशक्य आहे. तुमची ओळख पटवण्यासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. Aadhaar म्हणजेच Unique Identification Authority of India (UIDAI) ही भारतातील सर्व नागरिकांची माहिती सांभाळून ठेवते. मात्र, या माहितीला काही समाजकंटकांपासून धोका निर्माण झाला आहे. मुख्यत: आर्थिक गुन्हेगारांची नजर नागरिकांच्या आधार डेटावर आहे. नुकतेच दिल्लीमध्ये आधार संबंधित घोटाळ्याची माहिती समोर आली आहे.
एकाच व्यक्तीच्या फोटोद्वारे दहा ते बारा बँक खाती उघडण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अधिकृत आधार एजंटला हाताशी धरून ही बनवाबनवी सुरू आहे. आधार सुरक्षेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत, त्याचा फायदा घेतला जात आहे. एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड तयार करत असताना फेशिअल बायोमेट्रिक आधार सिस्टिमकडून आधीच्या डेटाबेसशी पडताळून पाहिले जात नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे, याबाबतचे वृत्त Times Of India ने दिले आहे.
आधारची माहिती कशी चोरी होते? (Aadhaar Information Theft)
आधार संबंधित कामे करण्यासाठी अधिकृत एजंटचे एक वेगळे खाते असते. मात्र, हे खाते काही एजंटकडून आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना वापरण्यास दिल्याचे समोर आले आहे. सिलिकॉनपासून बनवलेल्या बोटांचे बनावट ठसे, डोळ्यांचे कलर प्रिंटआऊट्स आणि अधिकृत लॅपटॉप या घोटाळेबाजांकडून वापरण्यात येत आहे. आधार एजंटला फक्त सरकारी कार्यालय किंवा नेमून दिलेल्या स्थळावर बसूनच काम करण्याची मुभा आहे. मात्र, कार्यालयात न जाता कार्यालयात असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली आहे.
प्रत्येक अधिकृत एजंटचे जीपीएस लोकेशन ट्रॅक केले जाते. त्यावरून तो नक्की कार्यालयात आहे की इतर कोणत्या ठिकाणी हे समजते. हे एजंट एक दिवस लॅपटॉप सरकारी कार्यालयात घेऊन येतात. मात्र, त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस ते कार्यालयात आले नाही तरी त्यांचे लोकेशन सरकारी कार्यालयाचेच दिसते. सिस्टिममधील या त्रुटीचा फायदा घोटाळेबाजांकडून घेण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी बसून बनावट आधार कार्ड तयार करणे, कोणाच्याही खात्यात जाऊन माहिती अपडेट करणे असे प्रकार चालल्याचे समोर आले आहे.
आधार सिस्टिममधील तांत्रिक त्रुटी कोणत्या? (Loopholes in Aadhar system)
- बोटांचे खरे ठसे आणि बनावट सिलिकॉनपासून बनवलेले ठसे यातील फरक सिस्टिमला कळत नाही.
- डोळ्यांच्या स्कॅन ऐवजी डोळ्यांचे कलर प्रिंटआऊट सिस्टिमसमोर धरले तरीही ते स्कॅन केले जातात.
- म्हणजेच एखादा व्यक्ती उपस्थित नसतानाही त्याच्या फक्त डोळ्यांच्या कलर फोटोद्वारे सिस्टिमचा अॅक्ससेस मिळवता येऊ शकतो.
- फोटो एकाच व्यक्तीचा मात्र, नावे वेगवेगळी असली तरीही बनावट आधार कार्ड बनवता येते. फेशिअल रिकग्निशनमधील त्रुटी.
- एक व्यक्तीच्या नावाने कितीही आधार कार्ड काढता येऊ शकतात. बोटांचे ठसे कोणाचे असले तरीही हा घोटाळा करता येत आहे.
- अधिकृत एजंटला दिलेला आधार प्रणालीचा अॅक्सेस सुरक्षित नाही. GPS सिस्टिममध्ये अचूकता नाही.
आर्थिक घोटाळे करण्यासाठी या बनावट खात्यांचा वापर करण्यात येत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या लक्षात आले आहे. बनावट आधारकार्डद्वारे बँक अकाउंट सुरू करणे, एखाद्या व्यक्तीच्या खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवणे, आधार कार्डवरील माहिती चुकीच्या पद्धतीने अपडेट करणे असे प्रकार समोर आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस कारवाई करत आहेत. आधार प्रणालीला खिंडार पडल्याचे या सर्व घडामोडींतून दिसून येत आहे.