Safe Investment Options: मागील दोन वर्षांपासून बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्थांनी (NBFC) मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले होते. मात्र, आता पुन्हा व्याजदर खाली येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाब नॅशनल बँक आणि अॅक्सिस बँकेने काही महिन्यांपूर्वी मुदत ठेवींचे व्याजदर कमी केले. मुदत ठेवी सुरक्षित समजल्या जातात. मुदत ठेवींप्रमाणेच सुरक्षित मात्र, चांगला परतावा देणारे हे 4 पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?
5 वर्ष पोस्ट ऑफिस मुदत ठेवी (Post Office Term Deposit)
कमी जोखीम आणि निश्चित परतावा हवाय. मात्र, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करायची नाही. अशा गुंतवणुकदारांसाठी पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट हा चांगला पर्याय आहे. (Safe Investment Options with low risk) पोस्टातील गुंतवणूक मुदत ठेवींपेक्षा जास्त सुरक्षित असते. पोस्टातील ठेवींना सरकारची हमी असते. म्हणजे या योजनेतील पैसे कधीही बुडणार नाहीत. याउलट फक्त 5 लाखांपर्यंतच्या मुदत ठेवींना सरकारची हमी असते.
पोस्ट टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीचे 1,2,3 आणि 5 वर्ष असे एकूण चार कालावधीचे पर्याय आहेत. एका खात्यात एकदाच रक्कम ठेवता येते. मात्र, एकापेक्षा जास्त खाती सुरू करता येतील. कमीतकमी 200 रुपये आणि 200 रुपयांच्या पटीत रक्कम गुंतवता येईल. जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत 5 वर्षांच्या टर्म डिपॉझिटवर 7.5% व्याजदर मिळत आहे. अनेक आघाडीच्या बँकांच्या मुदत ठेवीच्या दरापेक्षा हा दर जास्त आहे.
पाच वर्षांचे राष्ट्रीय बचत पत्र (NSC-VIII इश्यू)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिटेकमधील गुंतवणुकीला 5 वर्षांचा लॉक-इन पिरियड आहे. म्हणजेच 5 वर्ष योजनेतून पैसे काढता येणार नाहीत. (Safe Investment Options) वैयक्तिक, संयुक्त खाते किंवा अल्पवयीन बालकाच्या नावे गुंतवणूक करता येईल. आयकर कायद्यातील 80C नुसार करवजावट देखील मिळवता येते.
या योजनेत गुंतवणुकदाराला व्याज मिळत नाही तर ते पुन्हा योजनेत गुंतवले जाते. पुन्हा गुंतवलेल्या व्याजावर देखील करवजावट मिळते.(अपवाद 5 वे वर्ष). जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत पत्रावर 7.7% व्याजदर मिळत आहे. अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा हा दर चांगला आहे.
आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड (RBI Floating Rate Savings Bond)
आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड हे राष्ट्रीय बचत पत्रशी जोडलेले असतात. राष्ट्रीय बचत पत्रावर जो व्याजदर मिळतो त्यापेक्षा 0.35% जास्त व्याजदर या बाँडमधील गुंतवणुकीवर मिळतो. राष्ट्रीय बचत पत्रातील व्याजदरात बदल झाल्यास या बाँडचा व्याजदरही बदलतो. सध्याच्या व्याजदरानुसार NSC वर 7.7% व्याज मिळत आहे. + .35% म्हणजेच 8.05% व्याज या बाँडवर मिळत आहे. दर सहा महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेतला जातो.
या सेव्हिंग बाँडमध्ये कमीत कमी 1 हजार रुपये गुंतवणूक करता येते. (Low risk fix rate Invesment options) जास्तीत जास्त रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. हे बाँड 7 वर्षांपर्यंतचे असतात. या गुंतवणुकीवरील व्याज प्रत्येक वर्षी दर सहा महिन्यांतून एकदा (1 जानेवारी आणि 1 जुलै) दिले जाते.
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS)
सिनियर सिटिझन सेव्हिंग योजनेत 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक किंवा 55 वर्षांपुढील निवृत्त नागरिक खाते सुरू करू शकतात. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत हे खाते सुरू करता येईल.
या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. हा कालावधी आणखी 3 वर्षांनी वाढवता येतो. व्याज दर तीन महिन्यांनी खात्यात जमा होते. तसेच व्याजावर कर आकारला जाईल. दर 3 महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेतला जातो. व्याजदर कमी जास्त होऊ शकतात. कमीत कमी 1 हजार आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये योजनेत गुंतवता येतील.
जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत सिनियर सिटिझन सेव्हिंग योजनेवर 8.2% व्याजदर मिळत आहे. दरम्यान, अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्था मुदत ठेवींवर यापेक्षा किंचित अधिक व्याजदर देत आहेत. मात्र, जर तुम्ही आधीच मुदत ठेवीत गुंतवणूक केली असेल तर SCSS योजना सुरू करून गुंतवणुकीत विविधता आणू शकता.