Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Tips: कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सेव्हिंग टिप्स आणि कॉलेजलाईफ बनवा मस्त बिनधास्त!

Saving Tips

अनेक विद्यार्थ्यांना खर्चासाठी 'पॉकेट मनी' म्हणून आई-वडील पैसे देत असतात. या पैशाचे नियोजन जर तुम्ही उत्तमरीत्या करू शकला तर तुम्हांला कुठलीही अडचण येणार नाही. तसेच आर्थिक शिस्त लागेल ती वेगळी. चला तर जाणून घेऊयात काही महत्वाच्या टिप्स!

तुम्ही जर कॉलेजवयीन विद्यार्थी असाल तर तुम्ही कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तुमच्या पॉकेट मनीचे नियोजन करायला हवे. कारण कॉलेजमध्ये असताना तुम्ही मित्रांसोबत आऊटिंगला जाल, कॅन्टीनमध्ये वेळ घालवाल, सिनेमाला जाल. कॉलेज वयात या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच पाहिजे. कॉलेजमधील दिवस हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरत असतात. याच वयात आपले करियर काय असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येत असतो.

अनेक विद्यार्थ्यांना खर्चासाठी आई-वडील पैसे देत असतात. या पैशाचे नियोजन जर तुम्ही उत्तमरीत्या करू शकला तर तुम्हांला कुठलीही अडचण येणार नाही. तसेच आर्थिक शिस्त लागेल ती वेगळी. चला तर जाणून घेऊयात काही महत्वाच्या टिप्स!

बजेट तयार करा, खर्चाचा हिशोब ठेवा

 घर ते कॉलेज येण्या-जाण्यासाठी तुम्हांला किती खर्च लागतो याचे गणित करा. आई-वडील किती पैसे देऊ शकतात याचा देखील विचार करा. कारण घरच्यांनी आपल्यासाठी आधीच कष्ट करून कॉलेजमधील प्रवेश फी भरलेली असते. त्यामुळे घरच्यांवर कुठलाही अधिक भार पडणार नाही याची काळजी घ्या. त्यानुसार तुमचे महिन्याचे बजेट बनवा.

घरच्यांनी दिलेला पॉकेट मनी फक्त खर्च करायचा नसतो, तर त्यातून किती पैसे आपल्याला वाचवता येऊ शकतील याचा देखील विचार आपण करायला हवा. पैसे आहेत म्हणून खर्च करू नका. गरज असेल तिथेच पैसे खर्च करा. कॉलेज पिकनिकला जाणे कुणाला आवडणार नाही? मात्र ऐनवेळी मोठा खर्च टाळायचा असेल तर तुमच्या पॉकेट मनीमधील रकमेची बचत करण्याचा जरूर प्रयत्न करा.

बाहेरचे खाणे टाळा

कॉलेजला गेलो म्हणजे आपण हॉटेल किंवा कॅन्टीनचेच खाद्यपदार्थ खाल्ले पाहिजेत असे नाही. हे अनेकदा खर्चिक ठरत असते. त्यामुळे घरून आईने बनवलेली पोळी-भाजी घेऊन जा. त्यामुळे आरोग्य तर उत्तम राहीलच परंतु अनावश्यक खर्च देखील टाळता येईल. कधीतरी मित्रांसोबत बाहेर गेलात, कुणाच्या वाढदिवसाला गेलात तर त्यावेळी तुम्ही बचत केलेले पैसे कामी येऊ शकतात.

विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सवलती वापरा

तुम्ही कधी कुठे शॉपिंगला गेलात, कुठे फिरायला गेलात तर त्याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खास सवलत आहे का हे जरूर तपासा. अनेक म्युजियम, पार्कमध्ये विद्यार्थ्यांना 50% सवलत दिली जाते. तशीच सवलत इलेक्ट्रोनिक्स सामानाच्या खरेदीवर देखील असते. तुम्ही ‘विद्यार्थी’ असल्याचा फायदा तुम्ही अशा ठिकाणी जरूर उचलू शकता. ऑनलाइन खरेदी टाळायचा प्रयत्न करा. गरज नसताना कुठलीही खरेदी करू नकाच!

सार्वजनिक वाहतूकीचा वापर करा

शक्य असल्यास, प्रवासात पैसे वाचवण्यासाठी टॅक्सी किंवा खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करा. कॉलेज जीवनात तुमचे अनुभवविश्व अधिक खुलत असते, त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर बघा, समाज बघा. हे सगळं तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत म्हणजेच एस.टी. प्रवास, लोकल प्रवास, बेस्ट बसचा प्रवास यात अनुभवायला मिळेल. पैसे तर वाचतीलच पण तुमच्या गाठी रोज नवा अनुभव असेल. तुमच्या वापराच्या पद्धतींना अनुरूप अशा किफायतशीर मोबाइल आणि इंटरनेट योजनांची निवड करा. विद्यार्थ्यांसाठी काही नेटवर्क कंपन्या खास ऑफर्स देतात त्या देखील जाणून घ्या.

बचत खाते सुरू करा

तुम्ही आईवडिलांनी दिलेल्या पैशांमधून ji बचत करणार आहात ती बँकेत जमा करण्याचा विचार करा. यामुळे तुम्हांला बँक सिस्टीम समजून घेता येईल आणि पैसे योग्य ठिकाणी सुरक्षित राहतील. यासाठी कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन बचत खाते सुरु करा. विद्यार्थ्यांना ‘झिरो बॅलन्स’ खाते प्रदान केले जाते, त्याचा फायदा घ्या. बँकेतील पैसे एक आपत्कालीन निधी म्हणून तुम्हांला वापरता येऊ शकेल.

पार्ट टाईम जॉब शोधा

 तुम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय करत असताना फ्रीलान्स किंवा पार्ट टाईम जॉब देखील करू शकता. पाश्चिमात्य देशात ही एक प्रचलित पद्धत आहे. आता भारतात देखील कॉलेजवयीन विद्यार्थ्यांसाठी पार्ट टाईम किंवा फ्रीलान्स जॉब उपलब्ध आहेत. तुम्ही राहता त्या परिसरातच असे जॉब्स आहेत का याची चाचपणी करा. मात्र कामामुळे तुमचा अभ्यास बुडणार नाही याची खात्री असेल तरच हा पर्याय निवडा. आधी महत्व शिक्षणाला द्यायला शिका.