मोटारसायकल रेसिंगचा अनुभव घेणाऱ्या किंवा मोबाईलमधील रेसिंग गेमिंगमध्ये रमणाऱ्या चाहत्यांना आता या स्पर्धेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.फॉर्म्युला वननंतर भारतात पहिल्यांदाच मोटारसायकल रेसिंगची वर्ल्ड चॅम्पियनशीप आयोजित करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात ग्रेटर नोएडामधील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे 'मोटोजीपी भारत' या इंडियन ग्रॅंडप्रिक्सचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतात मोटोजीपी वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन फेअरस्ट्रीट स्पोर्ट्सकडून करण्यात आले आहे. 22 ते 24 सप्टेंबर 2023 असे तीन दिवस ही स्पर्धा होणार आहे. मोटारसायकल रेसिंग पहिल्यांदाच भारतात होत असल्याने या स्पोर्ट्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
'मोटोजीपी भारत' या इंडियन ग्रॅंडप्रिक्सच्या तिकिट विक्रीसाठी बुकमायशोसोबत करार करण्यात आल्याचे फेअरस्ट्रीट स्पोर्ट्सचे सीओओ अनिल मखिजा यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मोटोजीपीच्या चाहत्यांना 360 डिग्रीमध्ये या स्पर्धेचा अनुभव घेता येईल, असा विश्वास मखिजा यांनी व्यक्त केला.
मोटोजीपी वर्ल्ड चॅम्पियनशीपचा भारतात 14 वा राउंड असेल. हा रेसिंगचा थरार याची देही याची डोळा अनुभवता यावा यासाठी तिकिटांची विक्री आणि नोंदणी सुरु झाली आहे. बुकमायशोवर चाहत्यांना नोंदणी करता येणार आहे. या महिन्यानंतर तिकिटे खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
तिकिटांचा दर काय असेल?
मोटारसायकल रेसिंगसाठी जगभरात प्रसिद्ध असलेली मोटोजीपीची चॅम्पियनशीप भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच या स्पर्धेच्या तिकिट दरांबाबत उत्सुकता वाढली आहे.ग्रेटर नोएडमधील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट या ट्रॅकवर 22 ते 24 सप्टेंबर 2023 अशी तीन दिवस रेसिंग असेल. तीन दिवसांचा तिकिट दर हा 2000 रुपये ते 40000 रुपये या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तिकिट दरांबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. मोटोजीपी चाहत्यांना यात अनेक पर्याय उपलब्ध केले जातील.
जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स 18 वर लाईव्ह
मोटोजीपी भारत जीपी स्पर्धा प्रत्यक्ष पाहता येण्याची संधी मिळाली नाही तरी या मेगा स्पोर्ट्स इव्हेंटला लाईव्ह पाहता येणार आहे. वायकॉम 18 ने मोटोजीपी सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स 18 यावर मोटोजीपी भारतचे थेट प्रक्षेपण होणार आहे.