Money Management for new economic year : नववर्षाच्या निमित्ताने आपण अनेक संकल्प करुन ते पुर्ण करण्याचा दृढनिश्चय करत असतो. यामध्ये आपल्याला यश मिळतेच असे नाही पण आपण त्यासाठी प्रयत्न जरूर करत असतो. असाच नववर्षाप्रमाणे नव्या आर्थिक वर्षासाठी आपण काही संकल्प केला तर. ज्याप्रमाणे, आपले सरकार राज्याचे वा संपूर्ण देशाचे आर्थिक वर्षाचे नियोजन, आराखडा आपल्यासमोर मांडत असतात त्याप्रमाणे आपणही आपला अर्थसंकल्प तयार करण्याची गरज आहे.
आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पै न पै चा हिशोब ठेवायचा नाहीये. तर या नव्या आर्थिक वर्षात अर्थनिर्भर, आर्थिक बाबी संबंधी स्वावलंब होण्यासाठी आपण काय करायला हवे याचे नियोजन करणे.
आर्थिक शिस्त (Financial Discipline) लागण्यासाठी व आर्थिक आपत्तीपासून (Financial Emergency) जर आपल्याला दूर राहायचे असेल तर या नव्या आर्थिक वर्षात आपल्याला जमतील असे संकल्प (Resolutions) करुन ते पाळण्याचे प्रयत्न करु.
Table of contents [Show]
बचत (Saving)
बचत का करावी या प्रश्नाचे साधेसोपे उत्तर आपल्याकडे असते. ते म्हणजे काही एक वस्तू घ्यायची असेल, कुठे सहलीला जायचे असेल तर आपण बचत करतो. थोडक्यात आपल्या एखाद्या उद्देशाच्या पूर्तीसाठी बचत करणे हा चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतो. मात्र, काहीच उद्देश नसेल तर महिन्या अखेरला आलेला आपला पगार पूर्ण खर्च करायचा का? तर नाही. “बचतीसाठी बचत” ही सवय आपण अंगीकारणे गरजेचे आहे. कारण आज आपल्या हातात पैसा आहे उद्या नसणार तेव्हा काय याचा विचार आपण केला पाहिजे.
आज आपल्याकडे पैशांच्या बचतीचे अनेक सरकारी वा अन्य योजना उपलब्ध आहेत. त्यामध्ये जर आपण आपले पैसे योग्य पद्धतीने गुंतवले तर भविष्यात आपल्याला चांगली मिळकत मिळू शकते. आपले भविष्य अंधारात असणार याची आपण स्वत:लाच खात्री देऊ शकतो.
गुंतवणूक (Investment)
पैशाने पैसा वाढत असतो. याचा अर्थ आपण आपला पैसा योग्य पद्धतीने आणि योग्य त्या ठिकाणी गुंतवणे आवश्यक असते. केवळ धनसंचय करुन आपण श्रीमंत बनत नाही. तर तो पैसा विविध योजना, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, रियल इस्टेट, एखाद्या उद्योगामध्ये गुंतवल्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या मदतीने आपला पैसा वर्षागणिक वाढत असतो.
आपल्या पगारातील खर्च वगळता 10 ते 20 टक्के रक्कम गुंतवणे गरजेचे असते. मात्र, वर्षागणिक पगार किंवा उत्पन्न वाढु लागल्यावर आपल्या मासिक खर्चाचे प्रमाण न वाढवता, मासिक खर्च कायम ठेवून गुंतवणूकीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा. तेव्हा गुंतवणूकीचे पर्याय, गुंतवणूक कशा पद्धतीने, कुठे करावी या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या महामनीवर अवश्य मिळेल.
आर्थिक आपत्तीनिधी
आर्थिक मंदी, कोरोना महामारी अशा परिस्थितीमध्ये आपल्या हाताशी पैसा असणे गरजेचे आहे. आर्थिक मंदीमुळे गेल्यावर्षापासून सगळ्याच क्षेत्रामध्ये नोकरकपात सुरू आहे. तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर निदान सहा महिन्याच्या मासिक खर्चासाठी आपल्याकडे तरतुद असणे अत्यावश्यक आहे.
उधारी चुकती करणे
व्यक्तिमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याचे एक कारण असते ते म्हणजे उधारी. आपण कोणाचे देणे लागत असू मग ते व्यक्तिचे असो अथवा बँकेचे, आपल्या मनावर नेहमीच एक ओझे असते. मनाला चिंता लागलेली असते की ही उधारी कशी आणि कधी फेडणार. या चिंतेमुळे आपल्या प्रगतीमध्ये ही अडथळा येत असतो. तेव्हा सर्वप्रथम आपली उधारी फेडण्यावर भर द्या. मोठ्या रकमेचे देणे असे एकाच दिवसात देता येत नाही. पण मग त्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम चुकती केली जाईल या पद्धतीने नियोजन करा.
उधारी फेडण्यासोबतच नवीन उधारी किंवा कर्ज न काढण्याचा ही ध्यास करा. बहुतेक वेळी केवळ चैनीच्या वस्तु घेण्यासाठी बँकेमधून कर्ज घेतले जाते. तेव्हा आपल्याला एखाद्या वस्तुची आवश्यकता नक्की किती आहे, यानुसार बँकेमधून कर्ज काढावे कि थोडा काळ थांबून रोखीने ती वस्तु घ्यावी याचा निर्णय घ्यावा.
विमा पॉलिसीला महत्त्व द्या
आजच्या आधुनिक दगदगीच्या काळात कोणिच आपल्या आयुष्याची खात्री देऊ शकत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयात कोणताही आजार जडू शकतो. कोणताही संसर्गजन्य आजाराचा धोका आपल्याला उद्भवू शकतो. कोरोना सारख्या आजाराचे आपल्या समोर उदाहरण आहे. तेव्हा अशा आजाराच्या वेळी आपल्याकडे पुरेसा पैसा, तशी व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे मेडीक्लेम, आरोग्य विमा, जीवन विम्याच्या तरतूदीला महत्त्व देणे गरजेचे आहे.