भारतात गेल्याकाही वर्षांमध्ये गुंतवणुकीच्याबाबतीत क्रांती घडली आहे. प्रामुख्याने शेअर बाजाराशी संबंधित गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढला आहे. यामध्ये ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचा सर्वात मोठा हातभार आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून स्टॉक्स, म्युच्युअल फंड, फ्यूचर अँड ऑप्शन्स, ईटीएफ, रिअल इस्टेट अशा विविध गोष्टीत गुंतवणूक केली जाते. मात्र, नक्की कशात गुंतवणूक केल्यास फायदा होईल व पैसे सुरक्षित राहतील याबाबत जास्त माहिती नसल्याने आर्थिक सल्लागाराची मदत घेतली जाते.
अनेकजण सोशल मीडियावरून सल्ला देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सवर (सोशल मीडियाद्वारे आर्थिक सल्ला देणारे) विश्वास ठेवून गुंतवणूक करतात. परंतु, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. फिनफ्लुएंसर्सच्या नादात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा फिनफ्लुएंसर्सवर आता सेबीकडून कारवाई केली जात आहे. तसेच, त्यांच्यासाठी कठोर नियमावली देखील जारी करण्यात आली आहे.
हे फिनफ्लुएंसर्स (Financial Influencers) नक्की कोण असतात? त्यांचा सल्ला ऐकून खरचं फायदा होतो का? त्यांचा सल्ला ऐकण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यायला हवी, याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.
फिनफ्लुएंसर्स म्हणजे नक्की कोण?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, इंस्टाग्राम व युट्यूबच्या माध्यमातून आर्थिकबाबींविषयी सल्ला देणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सचा आकडा मोठा आहे. या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक सल्ला, स्टॉक्सची माहिती, पैशांचे व्यवस्थापन, आर्थिक ट्रेंड, कंपन्यांविषयी माहिती देणाऱ्यांना फिनफ्लुएंसर्स (Financial Influencers) म्हटले जाते. हे फिनफ्लुएंसर्स महिन्याला सरासरी 15 ते 30 लाख रुपयांपर्यंतची कमाई करतात.
अनेकदा अशा फिनफ्लुएंसर्सकडून ते त्या क्षेत्रातील तज्ञ असल्याचा दावाही केला जातो. प्रामुख्याने सीए, उद्योगपती, बँकर्सचा यामध्ये समावेश असतो. मात्र, नेहमीच हा दावा खरा असेल असे नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण कोणताही अनुभव व पात्रता नसतानाही आर्थिक गुंतवणुकीचे सल्ला देत असल्याचे दिसून आले असून, यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते.
या फिनफ्लुएंसर्सला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात व त्यांच्या सल्ल्याचा सर्वसामान्यांवर प्रभाव पडतानाही दिसून येतो. हे फिनफ्लुएंसर्स कंपन्यांच्या एका प्रमोशन पोस्टसाठी 5 ते 10 लाख रुपये घेतात. मात्र, त्यांचा सल्ला ऐकल्याने फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. लोकांची फसवणूक करणाऱ्या काही फिनफ्लुएंसर्सवर सेबीकडून कारवाईही देखील करण्यात आली आहे.
फिनफ्लुएंसर्स कोणता सल्ला देतात?
- फिनफ्लुएंसर्सकडून देण्यात येणाऱ्या सल्ल्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक बाबींचा समावेश असतो. गुंतवणुकीपासून ते पैशांच्या व्यवस्थानापर्यंत अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या ऑनलाइन कोर्सची देखील त्यांच्याकडून विक्री केली जाते.
- फिनफ्लुएंसर्सकडून ठराविक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
- क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती दिली जाते.
- ते पैशांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती देतात.
- बचत, गुंतवणूक, खर्च, निवृत्तीनंतरचे नियोजन याबाबत सल्ला देतात.
- आर्थिक नियोजन, कर्ज व्यवस्थापन, रिअल इस्टेट गुंतवणुकीबाबत सल्ला दिला जातो.
- ठराविक कंपन्यांची जाहिरात करून गुंतवणूक करण्यास सांगतात.
किरकोळ गुंतवणूकदारांवर पडतोय फिनफ्लुएंसर्सचा प्रभाव
भारतातील डिजिटल क्रांतीचा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ होण्यामागे मोठा वाटा आहे. एनएसईच्या (National Stock Exchange) आकडेवारीनुसार, भारतात 2019 ते 2023 या 5 वर्षांच्या कालावधीत जवळपास 12 कोटी नवीन किरकोळ गुंतवणूकदार शेअर मार्केटशी जोडले गेले आहेत. या किरकोळ गुंतवणूकदारांना बाजाराविषयी पुरेशी माहिती नसते व कमी कालावधीत जास्त पैसे कमवण्याच्या नादात फिनफ्लुएंसर्सच्या प्रभावाखाली येतात.
भारतातील सर्वात लोकप्रिय फिनफ्लुएंसर्सच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे असे लाखो गुंतवणूकदार फिनफ्लुएंसर्सचा सल्ला ऐकून गुंतवणूक करत असल्याचे दिसून आले आहे. अनेक फिनफ्लुएंसर्स स्वतः तोट्यात असतानाही इतराना गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अशा फिनफ्लुएंसर्सचा सल्ला ऐकण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये तोटा
फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करण्याची क्रेझ गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढली आहे. अनेक फिनफ्लुएंसर्सकडून यात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले जाते. किरकोळ गुंतवणूकदारांकडून कमी गुंतवणुकीत झटपट पैसा कमविण्याचा शॉर्ट कट मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु, खरी वस्तूस्थिती उलट आहे.
फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा अनेक पटींनी वाढला आहे. मात्र, सेबीच्या आकडेवारीनुसार या गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक 10 पैकी 9 जणांचे नुकसान होत आहे. प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदाराला यात वर्षाला सरासरी 1 लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे
फिनइफ्लुएंसर्सकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, युट्यूबच्या माध्यमातून लोकांना यात पैसा लावण्यास सांगितला जातो. यातून दररोज लाखो रुपयांची कमाई होत असल्याचे बनावट स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरवले जातात. तसेच, लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून गुंतवणुकीचा सल्लाही दिला जातो. परंतु, बहुतांशवेळा हा सल्ला ऐकून गेलेल्या गुंतवणुकीत नुकसानच झाल्याचे समोर आले आहे.
फिनफ्लुएंसर्सचा सल्ला ऐकण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात
चुकीची माहिती | सोशल मीडियावर प्रत्येक विषयावर भरमसाठ माहिती उपलब्ध असते. मात्र, सर्वच माहितीची सत्यता पडताळणे शक्य होत नाही. फिनफ्लुएंसर्सकडून देखील आपल्या फॉलोअर्सला आकर्षित करण्यासाठी व कोर्सची विक्री करण्यासाठी अशाच भ्रामक व चुकीच्या माहितीचा वापर केला जातो. या चुकीच्या माहितीमुळे तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. |
अपुरे ज्ञान | प्रत्येक फिनफ्लुएंसर्स आर्थिक सल्ला देण्यासाठी पात्र असेलच असे नाही. अनेकांनी आर्थिकविषयी संबंधित क्षेत्राचे शिक्षणही पूर्ण केलेले नसते. मात्र, सोशल मीडियावर स्वतःला त्याविषयात तज्ञ असल्याचे भासवले जाते. जाहिरातबाजीमुळे अशा फिनफ्लुएंसर्सवर लोक विश्वासही ठेवतात. मात्र, असे अपुरे ज्ञान असलेले इन्फुएंसर्स चुकीचा सल्ला देऊ शकतात. |
कंपन्यांशी लागेबांधे | फिनफ्लुएंसर्सच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंमध्य़े असते. त्यामुळे त्यांनी सल्ला दिल्यास किरकोळ गुंतवणूकदारांकडून विशिष्ट कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली जाते. अशा फिनफ्लुएंसर्सचे कंपन्यांशी लागेबांधे असतात. ठराविक स्टॉक्स व क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देऊन किंमती फुगवल्या जातात. मात्र, त्यात गुंतवणूक केल्यानंतर अशा स्टॉक्सच्या किंमती पडतात व गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. |
जोखीम स्विकारण्याचा सल्ला | बहुतांश फिनफ्लुएंसर्सकडून दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीऐवजी त्वरित नफा मिळविण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. याशिवाय, जोखीम स्विकारल्यास जास्तीत जास्त फायदा होईल, असा सल्लाही दिला जातो. अवघ्या काही दिवसांमध्ये 100, 200 पट नफा मिळेल, असे दाखवले जाते. मात्र, अशा गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याने गुंतवणूकदारांचा पैसा बुडतो. |
फसव्या योजना | फिनफ्लुएंसर्सला एखाद्या कंपनीचे प्रमोशन करण्यासाठी लाखो रुपये मिळतात. त्यामुळे विशिष्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी, अशी जाहिरातबाजी त्यांच्याकडून केली जाते. कोर्सच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जातात. गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीवर प्रभाव पाडला जातो. |
फायदेशीर सल्ला की फसवेगिरी?
फिनफ्लुएंसर्सचे काम हे दुधारी तलवारीसारखे असते. यात लोकप्रियतेसोबतच नुकसान होण्याचा देखील धोका असतो. जोपर्यंत फिनफ्लुएंसर्स बचत, पैशांचे व्यवस्थापन अशा गोष्टींविषयी माहिती देतात, त्यावेळी त्यांचा सल्ला नक्कीच फायदेशीर ठरतो. मात्र, गुंतवणुकीचा सल्ला ऐकणे धोकादायक ठरू शकते.
बहुतांश प्रकरणांमध्ये फिनफ्लुएंसर्सचे कंपन्यांशी लागेबांधे असल्याचे समोर आले आहे. फिनफ्लुएंसर्स ठराविक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला सांगतात. मात्र, अशा धोकादायक कंपनीत गुंतवणूक करणे हे नुकसानीचे ठरू शकते. बनावट ट्रेडिंग स्क्रीनशॉट, लग्झरी लाइफस्टाइलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लुभावण्याचे काम फिनफ्लुएंसर्स करतात.
सेबीने याआधीही अशा फिनफ्लुएंसर्सवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बाप ऑफ चार्ट (एमडी नासिर) आणि रविंद्र भारती सारख्या लोकप्रिय फिनफ्लुएंसर्सवर सेबीने कारवाई केली आहे. यांच्यासारखेच अनेक फिनफ्लुएंसर्स धोकादायक सल्ला देतात. त्यामुळे सल्ला व संभाव्य फसवणूक यातील फरक ओळखून योग्य निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे.
बनावट फिनफ्लुएंसर्स स्वतःला कसे ठेवाल सुरक्षित?
वर्षानुवर्ष मेहनतीच्या कमाईतून केलेली बचत एका निर्णयामुळे वाया जाऊ शकते. असे आर्थिक नुकसान टाळायचे असल्यास बनावट फिनफ्लुएंसर्सपासून सावध राहायला हवे. सध्याच्या काळात आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व वाढले आहे. अपुऱ्या माहितीमुळे सोशल मीडियाची मदत घेतली जाते. परंतु, कोणाचाही सल्ला ऐकून निर्णय घेतल्यास नुकसानच सहन करावे लागू शकते. तुम्ही ज्या व्यक्तीचे ऐकून गुंतवणूक करत आहात का ती व्यक्ती खरचं सल्ला देण्यास पात्र आहे का जाणून घ्यायला हवे.
- ज्या फिनफ्लुएंसर्सचा सल्ला तुम्ही ऐकत आहात त्याचे शिक्षण, त्या क्षेत्रातील अनुभव जाणून घ्या. खरे फिनफ्लुएंसर्स उघडपणे स्वतःच्या शिक्षणाबाबत माहिती देतात. फिनफ्लुएंसर्स सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहे का? हे तपासा. जर कोणी अशी माहिती लपवत असल्यास त्याच्यापासून सावध रहा.
- कमी कालावधीत जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आर्थिक सल्लागारापासून कधीही लांब राहणेच योग्य ठरते.
- कोर्सच्या विक्रीसाठी कोणतीही अनावश्यक माहिती देत असल्यास अशा फिनफ्लुएंसर्स सावध राहावे. स्वतःच्या गुंतवणुकीऐवजी केवळ कोर्स, सेमिनार व उत्पादनाच्या विक्रीतून पैसा कमवणाऱ्यांपासून सावध रहा.
- तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून योग्यता तपासून शकता. ते कोणत्या विषयावर माहिती देत आहेत, पोस्टवरील कॉमेंट्स, रिव्ह्यू यातून बरीच माहिती मिळते.
- काही फिनफ्लुएंसर्स प्रमोशनच्या नावाखाली कोणत्याही कंपनीची जाहिरात करतात. खरे फिनफ्लुएंसर्स हे बाजारात नावलौकिक असलेल्या वित्तीय संस्था, तज्ञ, कंपन्याचे प्रमाेशन करतात.
- तुम्ही पैशांचे व्यवस्थापन, बचत व खर्च पद्धत याबाबत फिनफ्लुएंसर्सचा सल्ला ऐकू शकता. मात्र, एखाद्या विशिष्ट स्टॉक्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सपासून सावध राहायला हवे.
फिनफ्लुएंसर्ससाठी सेबीचे नियम काय आहेत?
सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणुकीसंदर्भात आर्थिक सल्ला देणाऱ्या नोंदणी नसलेल्या फिनफ्लुएंसर्सची संख्या वाढली आहे. सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बुच यांनी देखील वेळोवेळी याबाबत चिंता व्यक्त करत अशा फिनफ्लुएंसर्ससाठी नियमावली आणण्याची अवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. सेबीने आर्थिक सल्ला देणाऱ्यांसाठी कठोर नियमावली देखील तयार केली आहे.
सेबीच्या नवीन नियमानुसार प्रत्येक फिनफ्लुएंसर्सला नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, ब्रोकर आणि म्युच्युअल फंड्सला मार्केटिंग आणि जाहिरातांसाठी अशा नोंदणी नसलेल्या फिनफ्लुएंसर्ससोबत काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सेबीच्या या नियमांमुळे नोंदणी नसलेले फिनफ्लुएंसर्स गुंतवणूक व आर्थिकबाबींविषयी सल्ला देऊ शकणार नाहीत. फिनफ्लुएंसर्स कोणताही परतावा देण्याचा अथवा कामगिरीचा दावा करू शकत नाही. मात्र, गुंतवणुकदारांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचे काम करण्यास फिनफ्लुएंसर्स सूट देण्यात आलेली आहे. चुकीच्या वित्तीय माहितीद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान टाळणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे.
गुंतवणुकीसाठी घ्या योग्य आर्थिक सल्लागाराची मदत
गुंतवणूक ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा आर्थिक सल्ला घेणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे अनेकजण सोशल मीडियाची मदत घेतात व यामुळे त्यांची फसवणूक होते.
स्टॉक्सपासून ते रिअल इस्टेटपर्यंत कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना फिनफ्लुएंसर्सऐवजी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेणे फायद्याचे ठरते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सद्वारे (NISM) गुंतवणूक सल्लागारांची (Investment Adviser) परिक्षा घेतली जाते. या परिक्षेमध्ये पास झाल्यानंतरच कोणतीही व्यक्ती अधिकृतपणे गुंतवणुकीचा सल्ला देण्यास पात्र ठरते.
अनेक फिनफ्लुएंसर्स कोणती शैक्षणिक पात्रता, अनुभव नसताना गुंतवणुकीचा सल्ला देत असतात. अशा फिनफ्लुएंसर्सचा सल्ला घेणे कधीही टाळावे. केवळ फॉलोअर्स/सबस्क्राइबर्सची संख्या जास्त असल्यामुळे आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळायला हवे. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीशी संंबंधित कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याबाबतची संपूर्ण पडताळणी करूनच निर्णय घ्यावा.