Filing ITR: इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे ज्या नागरिकांचे उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल, त्या सर्वांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे आहे. जर तुम्ही या उत्पन्नाच्या वरील कक्षेत येत असाल तर, इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंबंधित अधिक माहिती मिळवू शकता. आता ई-फायलिंग आयटीआरची प्रक्रिया जलद आणि सुलभ झाली आहे आणि ती घरबसल्या पूर्ण करता येते. परंतु प्रथमच ITR Filing करणाऱ्यांसाठी आयटीआर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया आव्हानात्मक असू शकते. कारण आयकर विभागाने अनेक नियम बदलले आहेत; त्या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे.
नवीन करदात्यांना नवा टॅक्स स्लॅब निवडायचा की जुना टॅक्स स्लॅब शोधायचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल. नवीन कर प्रणाली कमी कर दर ऑफर करते. जुन्या कर प्रणालीत काही वजावट आणि कर लाभ आहेत; जे करदात्याला कर वाचविण्यास मदत करतात.
तुम्हाला कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये कमी कर भरावा लागेल आणि कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये जास्त कर लागेल हे शोधण्यासाठी ऑनलाईन टॅक्स कॅल्क्युलेटर उपयोगी ठरू शकते. समजा तुम्ही नवीन कर प्रणालीची निवड केली, तरीही तुम्ही गुंतवणुकीचे साधन म्हणून EPF, PPF आणि जीवन विमा पॉलिसी यासारख्या काही पर्यायांचा विचार केला पाहिजे. जेणे करून तुम्हाला काही कर सवलतीचा लाभ घेता येईल.
Table of contents [Show]
करपात्र उत्पन्न शोधा
तुमचे करपात्र उत्पन्न हे तुमचे एकूण उत्पन्न (तुमच्या पगारातून आणि इतर स्रोतांमधून मिळालेले) होय. वजावट कमी करून तुमची कर बचत होवू शकते.
Form 16 मिळवा
फॉर्म 16 हे कंपनीने पगारदार कर्मचाऱ्यांना दिलेले टीडीएस प्रमाणपत्र आहे. या फॉर्ममध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरताना भरावे लागणारे सर्व पगाराचे तपशील असतात. यामध्ये तुम्ही दावा केलेल्या वजावटीची माहिती, मिळवलेले वेतन आणि मिळालेल्या सवलतींचा समावेश असते.
Form 26AS समजून घ्या
फॉर्म 26AS हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यावर टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अवलंबून राहावे लागते. ज्यावर TDS लावला गेला आहे त्या सर्व उत्पन्नाचे तपशील त्यात नोंदवले जातात. तुम्ही तुमचा फॉर्म 26AS ऑनलाईन पाहू आणि डाऊनलोड करू शकता. या फॉर्ममधील तपशील प्रत्येक TDS रिटर्न स्टेटमेंटसह अपडेट केले जातात.
वार्षिक माहिती तपशील
वार्षिक माहिती तपशील (AIS) मधील नवीन माहितीमध्ये व्याज, लाभांश, सिक्युरिटीज व्यवहार, म्युच्युअल फंड व्यवहार, इत्यादींचा समावेश आहे. जेव्हा करदाता 'प्रीफिल' पर्याय वापरतो, तेव्हा AIS ( Annual Information Statement ) कडील माहिती ITR फॉर्ममध्ये भरली जाते.
ITR-1 फॉर्म
ITR-1 हा फॉर्म पगार, एक घर मालमत्ता, इतर स्त्रोत (व्याज) आणि एकूण 50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या निवासी व्यक्तींनी भरावा लागतो.
ITR-2 फॉर्म
ITR-2 हा फॉर्म अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (Hindu Undivided Family - HUF) साठी आहे. जे कोणत्याही मालकीखाली व्यवसाय किंवा नोकरी करत नाहीत.
ITR-3 फॉर्म
ITR-3 हा फॉर्म स्वत:च्या मालकीच्या व्यवसाय किंवा एखाद्या कार्यामधून उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि HUF साठी आहे.
ITR-4 फॉर्म
ITR-4 हा फॉर्म व्यवसाय किंवा मालकीच्या पेशामधून अपेक्षित उत्पन्नासाठी आहे.
ITR पडताळणी कशी करावी
आयटीआर दाखल केल्यानंतर, शेवटच्या टप्प्यात करदात्यांना त्यांच्या रिटर्नची पडताळणी करावी लागते. तुम्ही तुमच्या रिटर्नची ऑनलाईन किंवा ऑफलाईन पडताळणी करू शकता. ऑनलाईन पर्यायासाठी, तुम्ही आधार OTP द्वारे माहिती मिळवू शकता. ऑनलाईन भरलेल्या रिटर्नचा पोचपावती म्हणून इन्कम टॅक्स विभागाकडून मेल येते.
ऑफलाईनसाठी, तुम्हाला भरलेल्या ITR च्या कॉपीवर सही करून ते इन्कम टॅक्स विभागाच्या बंगळुरू येथील सीपीसी (CPC) ऑफिसला पाठवावे लागते. इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांच्या वतीने रिटर्न भरल्यानंतर 1 ऑगस्ट 2022 पासून ई-व्हेरिफिकेशन किंवा ITR-V ची हार्ड कॉपी सबमिट करण्याची अंतिम मुदत 30 दिवसांपर्यंत कमी केली आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.
आवश्यक कागदपत्रे
- बँक खाते तपशील
- पॅन कार्ड
- आधारकार्ड तपशील
- पगारदार व्यक्तींसाठी फॉर्म 16
- गुंतवणूक प्रमाणपत्र
- गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्र
- विमा प्रीमियम भरण्याची पावती