Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदर वाढवले; तुमच्यावर काय होणार परिणाम, खरंच महागाईचा भडका उडणार का?

'फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदर वाढवले; तुमच्यावर काय होणार परिणाम, खरंच महागाईचा भडका उडणार का?

Federal Reserve Bank Hike Rate : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने नुकतेच व्याजदरात पाऊण टक्क्याची (0.75%) वाढ केली. याचा फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रूपयाच्या मूल्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे तेथील केंद्रीय बँकेने (Federal Reserve) एकामागून एक व्याजदर वाढण्याचा सपाटा लावला आहे. नुकतेच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाऊण टक्क्याची (0.75%) वाढ केली. सलग दुसऱ्या महिन्यात सेंट्रल बँकेने व्याजदर वाढीचा झटका दिला. अमेरिकेत यामुळे बॉंड यिल्ड वाढली आहे. ज्याचा फटका मात्र भारताला बसण्याची शक्यता आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेतील. आणखी काही काळ रुपयावर घसरणीचा धोका राहील, ज्यामुळे भारतीयांनाही महगाईची झळ बसेल.

फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ आणि अमेरिकेतील महागाईबाबतचे भाकीत केवळ भारतासाठीच नव्हे तर इतर देशांसाठी देखील महत्वाचे आहे. अमेरिकेत महागाईने मागील 40 वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्हला नाईलाजाने बाजारातील पैसा आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलावी लागली. बँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात मोठी वाढ केली. त्याशिवाय बाजारातील पैशांचा ओघ कमी करण्यासाठी भविष्यात अशाच प्रकारे कठोर धोरण राबवण्याचे स्पष्ट संकेत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी दिले आहेत.

फेडरल रिझर्व्ह 0.75% व्याजदरात वाढ करुन तो 2.25% ते 2.50% या पातळीवर नेला आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत विकास दर घसरल्याने अमेरिकेत मंदी आल्याचे बोलले जात आहे. मात्र अमेरिकन प्रेसिडेंट जो बायडन यांनी मात्र मंदीची शक्यता नाकारली आहे. एकीकडे जागतिक पातळीवरील आव्हानांना सामोरं जात असताना अमेरिकेत रोजगार निर्मितीचा वेग मजबूत आहे. दर महिन्याकाठी किमान चार लाख नागरिकांच्या हाताला काम मिळत आहे. ही खरोखरच समाधानाची बाब असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलं आहे. बायडन यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकारी देखील मंदीची शक्यता धुडकावत आहेत.  

अमेरिकन अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती

  • जून महिन्यातील महागाई दर (Inflation Rate in US) 9.1%
  • विकास दर (GDP) 0.9 % , सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी घसरला
  • पहिल्या तिमाहीत जीडीपी 1.6 % होता
  • बेरोजगारीचा दर 3.6%  

भारतावर कसा होईल परिणाम?

  • अमेरिकेत व्याजदर वाढल्याने साहजिकच भारतातील गुंतवणुकीचा ओघ कमी होण्याची शक्यता आहे.
  • विशेषत: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेतील.
  • यामुळे रुपयाचे मूल्य आणखी घसरण्याची शक्यता आहे.
  • रुपयाने नुकताच डॉलरच्या तुलनेत 80 ची पातळी गाठली होती.
  • रुपयाचे अवमूल्यन किंवा घसरण केंद्र सरकारसाठी डोकेदुखी आहे.
  • इम्पोर्टेड वस्तूंसाठी भारतीयांना जादा पैसे मोजावे लागतील.
  • डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत अधिक मजबूत होईल.
  • तूर्त फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचा भारतीय शेअर मार्केटवर मर्यादित परिणाम दिसून आला.
  • जगातील इतर शेअर मार्केटच्या तुलनेत निफ्टी आणि बीएसई सेन्सक्स यापूर्वीच 6% कोसळले आहेत.
  • त्यानंतर मात्र शेअर बाजार सावरले. सलग तीन सत्रात मार्केटमध्ये तेजी दिसून आली.
  •  डॉलरमध्ये व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठी ही गोष्ट सकारात्मक असली तरी आर्थिक ताळमेळ बसवणे तितकेच आव्हानात्मक आहे. 

भारतात कर्जे आणखी महागणार!

पुढील आठवड्यात म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठड्यात रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर केले जाणार आहे. भारतात देखील महागाई रिझर्व्ह बँकेच्या प्रत्यक्ष उद्दिष्टापेक्षा खूपच जास्त आहे. मे महिन्यापासून 'आरबीआय'ने दोन वेळा व्याजदर वाढवले. (Repo Rate Hike) आतापर्यंत रेपो दर एकूण 0.90% वाढवला होता. रेपो दर 4.90% आहे. महागाई आणि जागतिक पातळीवरील ट्रेंड पाहता पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक रेपो दरात किमान 0.75% वाढ करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 5 ऑगस्ट 2022 रोजी आरबीआय पॉलिसी जाहीर करेल. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवला तर बँकांकडून गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे तसेच व्यावसायिक कर्जे यांचे व्याजदर वाढतील.