गेल्या काही दिवसांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाचे मूल्य कमकुवत होत चालले आहे. वर्षभरापूर्वी डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाची किंमत 73.21 रूपये होती. ती घसरून आता 77.62 रूपये झाली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात भारतीय रूपयाच्या मूल्यात सुमारे 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर डॉलरचा भाव 6 टक्क्यांनी वाढला आहे. जानेवारीपासून, भारतीय रूपया (INR) डॉलरच्या तुलनेत 4 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे आणि त्यात यूएस फेडने (US FED) 2022 मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर वाढवला तर रूपयाच्या मूल्यामध्ये आणखी घसरण होऊ शकते.
5 वर्षात डॉलरचा भाव 64 वरून 77 रूपयांवर
2017 मध्ये एक डॉलर खरेदी (Dollar Purchased) करण्यासाठी 64 रुपये लागत होते; पण आता तोच डॉलर विकत घेण्यासाठी 77 रुपये लागत आहेत. यावरून डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपया किती कमकुवत झाला आहे, हे दिसून येते. डॉलरच्या तुलनेत रूपयाचे जवळपास 3.75 टक्क्यांनी अवमूल्यन झाल्याचे यावरून दिसून येते.
भारतीय रूपयाच्या घसरणीचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम आपल्या वैयक्तिक आर्थिक जीवनावर होतो. तर अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्हीप्रकारे परिणाम होतो. जेव्हा रूपयाची किंमत घसरते तेव्हा निर्यातदारांना फायदा होतो. पण भारत देश हा प्रामुख्याने वस्तुंची आयात करणारा देश आहे. त्यामुळे भारताला रूपयाच्या घसरणीचा फटकाच अधिक बसतो.
आयात मालाची किंमत वाढते
जेव्हा भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत घसरतो, तेव्हा आयात केलेल्या वस्तू महाग होतात. अशाप्रकारे वस्तू महाग होत असल्याने महागाई वाढू लागते. भारत एक प्रमुख तेल आयातदार देश आहे. तेलाच्या किंवा इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वच वस्तुंची किंमत वाढते. भारतीय रूपया घसरल्याने महागाई वाढते.
कर्जाचा ईएमआय वाढतो
भारतीय रूपया कमकुवत झाला की, त्याचा अप्रत्यक्ष प्रभाव सर्वसामान्यांच्या कर्जावरील ईएमआयवर (EMI) होतो. महागाई वाढली की, रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवून महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असते. पण, रेपो दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचा व्याजदर वाढतो. परिणामी कर्जदारांना पूर्वीपेक्षा जास्त EMI द्यावा लागतो.
परदेशी शिक्षण महाग होते
परदेशात शिक्षण घेण्यासाठी डॉलरमध्ये पैसे खर्च करावे लागतात आणि डॉलर विकत घेण्यासाठी जास्तीच्या दराने भारतीय रूपये भरावे लागतात. परिणामी नकळत परदेशातील शिक्षणासाठी डॉलरमध्ये पैसे पाठवणे महाग होते. अशाप्रकारे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी परदेशी बँक खात्यात डॉलर्स सेव्ह करून ठेवावेत.
कमकुवत होणाऱ्या रूपयापासून सर्वसामान्यांनी कसे संरक्षण मिळवावे
भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत अधिकाधिक कमकुवत होत असल्यास, यूएस स्टॉक खरेदी करता येऊ शकतात किंवा परदेशी बँक खात्यांमध्ये डॉलर सेव्ह करून ठेवल्यास त्याचा अशा काळात फायदा होऊ शकतो. परदेशातील रेमिटन्स (बाहेरगावी पाठवलेली रक्कम) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) द्वारे नियंत्रित केली जाते. रेमिटन्स योजने अंतर्गत, अल्पवयीन मुलांसह सर्व नागरिकांना परदेशातील बॅंक खात्यात व्यवहार करण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी प्रत्येक वर्षी 2.5 लाख डॉलर पाठवण्यास मुभा आहे.