• 04 Oct, 2022 14:54

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ; सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण

Federal Reserve Bank Hike Interest Rate

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेने महागाईट आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Federal Reserve Bank Hike Interest Rate : अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच फेडरल रिझर्व्ह बॅंकेने (Federal Reserve Bank)  0.75 टक्के व्याज दरात वाढ केली आहे. गेले कित्येक दिवसांपासून अमेरिकेत महागाईने कळस गाठला आहे. या महागाईने अमेरिकेने स्वत:चाच 40 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. ही वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याज दरात 0.75 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, फेडरल बॅंकेचे संचालक जेरोम पॉवेल (Federal Reserve Bank Chairman Jerome Powell) यांनी पुढील महिन्यातही व्याज दर वाढीचा इशारा दिला आहे.

अमेरिकेतील वाढती महागाई आणि ती आटोक्यात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बॅंक काय निर्णय घेणार, या बातम्यांच्या आधारावर गेला आठवडाभर भारतीय शेअर मार्केटमध्ये खूप अस्थिरता (Volatility) दिसून आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स (BSE Sensex) 1 हजार अंकांनी खाली आला होता. त्यानंतरही आज (दि. 16 जून) सेन्सेक्स 1 हजार अंकांनी खाली आला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या दरात ही निचांकी पातळी आली आहे. भारतीय शेअर मार्केटमधून परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात विक्री करून बाहेर पडत आहेत.

अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता?

फेडरल रिझर्व्ह बॅंकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दर वाढवताना, येत्या काही दिवसात अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदाऊ शकते. परिणामी बेरोजगारीचा दर वाढ शकतो, असा सूचक इशारा अमेरिकन फेडरलने दिला आहे. 1994 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात व्याज दरवाढ केली आहे. अमेरिकन फेडरलच्या या निर्णयाला ऐतिहासिक दरवाढीचा निर्णय म्हटलं जात आहे.

शेअर बाजार अस्थिर?

एकूणच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर मार्केटमधून गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला आहे. यामुळे सोमवारपासून (दि. 13 जून) भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचे दिसून आले. सकाळी सेन्सेक्स ओपन झाला तेव्हा मार्केटमध्ये उत्साहाचे वातावर असल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 500 अंकांनी वर ओपन झाला. पण त्यानंतर मात्र सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झाली. निफ्टी (Nifty 50) आणि बॅंक निफ्टीमध्येही (Bank Nifty) सकाळी चांगल्या ओपनिंगनंतर घसरण दिसून आली.

मे महिन्यात अमेरिकेचा महागाई दर 8.6 टक्के होता. तो आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम भारतावरही होणार आहे. शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारात आणखी पडझड होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश निर्यातदारांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. या युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.