Pumpkin Fruit: तुकाराम रेळेकर यांच्याकडे 9 एकर जमीन आहे. त्यामध्ये ते कांदा, भेंडी आणि काशीभोपळा अशा तीन पिकांची लागवड करतात. 2015 पासून तुकाराम यांनी काशीभोपळ्याची लागवड करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवले आहे. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, फायबरने समृध्द असलेली भाजी अशी काशीभोपळ्याची ओळख आहे.
Table of contents [Show]
कधी केली जाते लागवड?
जानेवारी, मे आणि जून -जुलै महिन्यात काशीभोपळ्याची लागवड केली जाते. तुकाराम हे दरवर्षी चार ते साडेचार एकरात याचे पिक घेतात. ठरावीक अंतराने टप्प्याटप्प्याने लागवड केल्यास एखाद्या वेळी योग्य दर मिळाले नाही. तरीदेखील पूढील हंगामात चांगले दर मिळत असते. त्यामुळे तोटा होत नाही.
कशी केली जाते लागवड?
काशीभोपळ्याची लागवड ही ठराविक अंतराने टप्प्या टप्प्याने केली जाते. नांगरण, कुळवण करुन जमीनीची योग्य प्रकारे मशागत केली जाते. शेतात शेणखत मुरवले जाते. मोकळ्या रानात किंवा गादीवाफ्यावर ही लागवड केली जाते. लागवडी मध्ये पाच फूट बाय पावणेचार फूट लागवडीचे अंतर ठेवले जाते. काशीभोपळ्याची लागवड करण्यास एका एकरला 200 ग्रॅम बियाणांची आवश्यक्ता असते. लागवड केल्यानंतर 65 ते 70 दिवसांमध्ये भोपळा हाती येतो. परंतु, लाल रंगाचा भोपळा पाहिजे असल्यास आणखी 20 दिवस वाट बघावी लागते. कारण कच्च्या भोपळ्याच्या तुलनेत लाल रंगाच्या भोपळ्याला अधिक मागणी आहे.
मागणी कधी असते?
श्रावण महिन्यात विविध सणांमध्ये भोपळ्याला मागणी असते. दक्षिण भारतातील खाद्य पदार्थांमध्ये सुध्दा भोपळ्याचा वापर केला जातो. नवरात्रोत्सवात देवीच्या पूजेमध्ये या भोपळ्याला मानाचे स्थान आहे. त्यामुळे जून ते ऑक्टोबर हा भोपळ्यासाठी सर्वाधिक मागणीचा काळ असतो.
काय दर असतो?
भोपळ्याला वर्षभर 8 ते 12 रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव मिळतो. कधी कधी तो 20 रुपये किलो पर्यंतही जातो. तर भोपळ्याच्या एका फळाचे वजन 5 ते 15 किलो दरम्यान असते.
नफा किती मिळतो?
काशीभोपळ्याची एका एकर मध्ये लागवड करण्यास एकरी सुमारे 32 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च वजा करता सुमारे 70 ते 90 दिवसांच्या कालावधीत काशीभोपळ्याचे पिक एकराला 50 हजार रुपयांचा नफा देऊन जाते.