ब्युटी अॅंड वेलनेस ई-कॉमर्स कंपनी ‘नायका’ या स्टार्टअपच्या प्रमुख फाल्गुनी नायर यांना भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस वुमनचा बहुमान मिळाला आहे. IIFL Wealth Hurun India Rich List 2022 मध्ये 38,700 कोटींच्या संपत्तीसह नायर भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका ठरल्या आहेत. या श्रेणीत आघाडीवर असलेल्या बायोकॉनच्या प्रमुख किरण मझुमदार शॉ यांना संपत्तीच्या बाबतीत नायर यांनी मागे टाकले.
मागील वर्षभरात नायर यांच्या संपत्तीत 345% वाढ झाली असल्याचे हुरुनच्या अहवालात म्हटलं आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन रिच लिस्ट नुसार फाल्गुनी नायर यांची एकूण संपत्ती 38,700 कोटी इतकी झाली. त्याखालोखाल किरण मझुमदार शॉ यांची एकूण संपत्ती 24,800 कोटी आहे.
गेल्या 10 वर्षात भारतीय बाजारात नायका ब्रॅंडने स्वताची ओळख बनवली आहे. 2012 मध्ये फाल्गुनी नायर यांनी कोटक महिंद्रा ग्रुपमधील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. यासाठी त्यांनी स्वत:कडील 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. नायकाने मागील पाच वर्षांत स्वत:ची स्टोअर्स सुरु केली आहेत. नुकताच मुंबईत नायकाने दोन ऑफिस सुरु केली होती. त्याचे मासिक भाडे 70 लाख रुपयांच्या आसपास आहे. नायका आणि नायका फॅशन या दोन ब्रॅंडचा IPO नंतर देशभरात विस्तार झाला आहे. ब्युटी, पर्सनल केअर, फॅशनमध्ये नायकाची उत्पादनांची विस्तृत श्रेणी आहे.मागील पाच वर्षात नायकाची नेट वर्थ 1388% वाढली आहे.
नायका IPO ने शेअर बाजारात केली बंपर एंट्री
नायकाचे शेअर विक्री करुन फाल्गुनी नायर यांनी 630 कोटींचे भांडवल उभे केले होता. नोव्हेंबर 2021 मध्ये 'नायका'चा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत तब्बल 82% तेजीच लिस्ट झाला होता. IPO साठी कंपनीनं प्रती शेअर 1,125 रुपये दर निश्चित केला होता.पहिल्याच दिवशी नायकाच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. या बंपर लिस्टींगनंतर फाल्गुनी नायर यांच्या संपत्तीत देखील प्रचंड वाढ झाली होती. त्या सेल्फ मेड बिलेनिअर वुमन बनल्या होत्या.
गौतम अदानींनी दररोज 1600 कोटी कमावले
श्रीमंत उद्योजकांच्या श्रेणीत गौतम अदानी अव्वल स्थानी आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 10.94 लाख कोटी इतकी आहे. मागील वर्षभपर अदानी यांनी दररोज सरासरी 1600 कोटी कमावले असल्याचे हुरुनच्या अहवालात म्हटलं आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. अंबानी यांची संपत्ती 7.95 लाख कोटी असून त्यात वर्षभरात 115% वाढ झाली. एक हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या उद्योजकांची संख्या वर्षभरात 96 ने वाढली आहे. भारतात 1103 उद्योजक आहेत ज्यांची संपत्ती एक हजार कोटींवर गेली असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            