मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोलचा दर 18% ने वाढवण्यात आला आहे. येत्या 1 एप्रिलपासून एक्सप्रेस वे वर टोलचे नवीन दर लागू होतील, असे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) म्हटले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा देशातील सर्वात बिझी आणि रहदारीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. दररोज एक्सप्रेस वे वरुन सुमारे 1.5 लाख वाहने धावतात. 95 किमी लांबीच्या या महामार्गावर पाच टोल प्लाझा आहेत. यात खालापूर आणि तळेगाव असे दोन महत्वाचे टोलनाके आहेत.आता टोल वाढवल्याने वाहनधारकांना एप्रिलपासून जादा पैसे मोजावे लागतील.
एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने टोल दरवाढीबाबत सांगितले की टोलच्या शुल्कात दरवर्षी 6% वाढ अपेक्षित आहे. एक्सप्रेस वे वर किती टोल असावा आणि त्यात वार्षिक किती वाढ करावी याबाबत राज्य सरकारने 9 ऑगस्ट 2004 रोजी अध्यादेश जारी केला आहे. मात्र मागील तीन वर्ष दरवाढ टाळली होती. आता एकत्र दरवाढ लागू केली जात असल्याने टोलच्या शुल्कात सरासरी 18% वाढ झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील सुधारित टोलनुसार येत्या 1 एप्रिलपासून कार, जीप अशा वाहनांना 1 एप्रिलपासून 320 रुपये टोल द्यावा लागेल. सध्या तो 270 रुपये आहे. त्यात 50 रुपयांची वाढ झाली. मिनी बस, टेम्पोचा टोलचा दर 495 रुपये इतका वाढणार आहे. सध्या टेम्पो आणि मिनी बससाठी 420 रुपयांचा टोल द्यावा लागतो. टू एक्सल ट्रक्ससाठी टोलचे शुल्क 685 रुपये इतके वाढणार आहे. मोठ्या बसेससाठी आता 940 रुपये इतके शुल्क वाढणार आहे.
एप्रिलपासून एक्सप्रेस वे वर थ्री एक्सेल ट्रक्ससाठी 1630 रुपये टोल शुल्क लागू होईल. सध्या थ्री एक्सेलसाठी 1380 रुपये शुल्क आहे. मल्टी अॅक्सेल ट्रक्स आणि मशिनरी वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांसाठी आता 2185 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.टोल शुल्कातील वाढ वर्ष 2030 पर्यंत कायम राहणार असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. आताच्या शुल्क वाढीला 2026 मध्ये तीन वर्ष पूर्ण झाली तरी त्याबाबत आढावा घेतला जाणार नाही.