International Women’s Day 2023: भारतामध्ये महिलांचा अर्थव्यवस्थेतील वाटा दिवसेंदिवस वाढत आहे. स्वत:चं स्टार्टअप सुरू करण्यापासून ते कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर महिला पोहचल्या आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न करुन संसार सांभाळ्यण्याच्या मानसिकतेतून आपला समाज बाहेर पडला आहे. पुरुषांबरोबर महिलाही चांगला पगार कमवत आहेत. मात्र, बचत आणि गुंतवणुकीची गोष्ट येते तेव्हा भारतीय महिलांमध्ये आणि पुरुषांमध्येही अर्थसाक्षरता आणखी वाढण्याची गरज आहे.
नोकरी करत असताना महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार दिला जातो. समान काम असले तरी कमी पगार ऑफर केला जातो. तसेच लग्नानंतर मूल झाल्यामुळे अनेक महिलांच्या करिअरला ब्रेक लागतो. (personal finance tips for women) दोन तीन वर्षानंतर पुन्हा नोकरीवर रुजू झाल्या तर कमी पगारावर काम करण्याची वेळ येते. पुरुषांपेक्षा महिलांचे जीवनमानही जास्त असते. त्यामुळे वृद्धापकाळात खर्च भागवण्यासाठी महिलांसाठी पैशांचे योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. बदलत्या आर्थिक काळात महिलांनी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
छोट्या छोट्या बचतीतूनही मोठी रक्कम जमा होऊ शकते. अनावश्यक शॉपिंग, गरज नसलेल्या मात्र, आवडीच्या वस्तुंची खरेदी टाळूनही पैसे बचत करू शकता. सध्या मेट्रो लाइफ स्टाइलमुळे पार्टी संकल्पना रुढ होत आहे. या पार्टीजमध्ये हजारो रुपये एका रात्रीतही उडवले जातात. यासारखे खर्च नक्कीच कमी होऊ शकतात. शेवटी हेल्दी लाइफ स्टाइल आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
खर्चाचे बजेट बनवा (Make budget for expenses)
दर महिन्याला होणाऱ्या खर्चाचे बजेट तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. (Personal finance tips for women) यासाठी अनेक अॅप्सही बाजारात उपलब्ध आहेत. किंवा साधे एक्सल शीटही तुम्ही मेंटेन करु शकता. त्याद्वारे तुम्ही कोणत्या गोष्टींवर किती रुपये खर्च करता हे ट्रॅक करू शकता. त्यातून तुम्हाचा कोणत्या गोष्टींवर अनावश्यक खर्च होतो, हे समजेल. घरभाडे, किराणा, मनोरंजन, प्रवास, बँक हप्ते, स्वत:वर होणारा खर्च, शिक्षण यांसारख्या गोष्टींवर दर महिन्याला किती खर्च होतो, याचा ताळेबंद तुम्ही आखू शकता.
गुंतवणूक करा (Invest Money)
फक्त पैशांची बचत करून भागणार नाही. महिलांनी पैसे योग्य ठिकाणी गुंतवायला देखील हवेत. तुमचे उत्पन्न, जोखीम घेण्याची क्षमता यावर तुम्ही कोणत्या पर्यायांमध्ये आणि किती पैसे गुंतवू शकता हे ठरेल. म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड, शेअर मार्केट, सरकारी गुंतवणूक योजना, महिलांसाठीच्या खास सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. एकाच ठिकाणी सर्व पैसे न गुंतवता विविध पर्यायांमध्ये पैसे गुंतवून जोखीमही कमी होईल. जर तुम्हाला या पर्यायांचा अभ्यास नसेल तर आधी अभ्यास करून नंतर गुंतवणूक केलेले योग्य किंवा गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या.
क्रेडिट स्कोरवर ध्यान द्या
चांगला क्रेडिट स्कोर ठेवणे महिला तसेच पुरुष दोघांसाठीही गरजेचे आहे. नोकरदार महिलांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांच्याकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वेळोवेळी सर्व बिल्स भरत आहात का याची खात्री करुन घ्या. तुम्ही जर क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाचे हप्ते भरण्यास उशीर करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होईल. त्यामुळे भविष्यात कर्ज मिळण्यास अडचणी येतील.
महिलांनी पगाराची वाटाघाटी कशी करावी
अनेक ठिकाणी समान काम असतानाही महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळतो. मात्र, महिलांनी पगाराची वाटाघाटी करण्याचे कौशल्य शिकून घेतले पाहिजे. मुलाखतीतून किंवा प्रत्यक्ष मॅनेजरशी बोलताना त्यांना तुमचे कौशल्य आणि आधीच्या कामाचा अनुभव याची आत्मविश्वासाने माहिती द्या. बालसंगोपणामुळे जर महिलांच्या करिअरमध्ये ब्रेक येत असेल तर त्यानंतर नोकरीसाठी जाताना पगाराची वाटाघाटी महत्त्वाची ठरते. नोकरीतील गॅपमुळे कंपनीकडे कमी पगार देण्याचे आयते कारण असते. मात्र, जर महिलांनी योग्य रित्या पटवून दिले तर आधीच्या पगारावर वाढही मिळू शकते. ब्रेकच्या काळात कौशल्य वाढीसाठी छोटे-मोठे कोर्सेस केलेले फायदेशीर ठरेल. मात्र, हे कोर्सेस तुमच्या कामाच्या संबंधित असावेत.
आणीबाणीसाठी निधी साठवून ठेवा-
कमीतकमी सहा महिने पुरेल इतका आणीबाणी निधी साठवून ठेवावा. समजा एखाद्या महिलेचा दरमहा पगार 40 हजार रुपये आहे तर सुमारे दोन ते अडीच लाख रुपये आणीबाणी निधीसाठी राखून ठेवावे. भविष्यात कोणतीही आणीबाणी आल्यास ते पैसे तुम्हाला लगेच वापरता येतील. अपघात, आजारपण, नोकरी जाणे, नैसर्गिक आपत्ती, कौटुंबिक आपत्ती अशा कारणांसाठी तुम्हाला हे आणीबाणी फंडातील पैसे वापरता येतील.
निवृत्तीचे नियोजन आतापासूनच करा
कमावण्याच्या वयातच महिलांनीही निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे. कमी वय असताना केलेली निवृत्ती निधीतील गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा मिळवून देईल. कारण, गुंतवणुकीसाठी जास्त वर्ष मिळतील. नॅशनल पेन्शन योजना, पब्लिक प्रोव्हिंडट फंड आणि महिलांसाठीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
पैसे कमावत असताना अल्पकालीन उद्दिष्टांसोबतच दीर्घकालीन ध्येय लक्षात घेऊन गुंतवणूक करायला हवी. घर घेण्याचा निर्णय, जगभर प्रवास करण्याची हौस किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची योजना जर तुमच्या डोक्यात असेल तर त्यानुसार पैशांची बचत आणि गुंतवणूक करायला हवी. नियोजनाने नक्कीच गोष्टी सोप्या होतील.