भारतात आणि खासकरून मराठीत ‘ते’ गाव असल्यामुळे आपण गावांच्या नावांचा उल्लेखही नपुंसकलिंगी (Neutral Gender) करतो. पण, काही भाषांमध्ये जसं की जर्मन (German), गाव हे पुल्लिंगी (Mesculine) आहे. तिथं गावाला डॉर्फ (Der Dorf) असं म्हणतात. तसंच युरोपातल्या (European Languages) इतर देशांमध्येही आहे. यातून पुरुषी मानसिकताच डोकावते. आणि फ्रान्स देशातल्या पँटिन (Pantin) या शहराने पहिल्यांदा याचा सूक्ष्म विचार केलाय.
1 जानेवारीपासून त्यांनी चक्क गावाचं नाव बदलून पँटिन (पुल्लिंगी) ऐवजी पँटाईन (स्त्रीलिंगी) (Pantine) असं केलंय . अर्थात, हा बदल प्रतिकात्मक असेल. म्हणजे प्रत्यक्ष सरकारी कागदपत्रं आणि सरकारी इमारतींवर कोणताही बदल होणार नाही. रस्त्यांची नावंही तशीच राहतील. पण, लोक मात्र गावाला आता पँटाईन (Pantine) म्हणतील. हा बदल पुढच्या अख्ख्या वर्षासाठी असेल.
या गावाचे महापौर बर्ट्रेंड केर्न (Bertrand Kerne) हे समाजवादी विचारसरणीचे आहेत. आणि त्यांनीच हा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर मांडला. आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपला निर्णय त्यांनी सांगितला आहे. संदेशात ते म्हणतात,
‘गावाचं नाव बदलताना जो e पुढे जोडलाय तो इक्वालिटीसाठी (समानता) आहे. महिलांविरोधातले अत्यचार, कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा त्रास आणि त्यांना मिळणारा असमान मोबदला याची जाणीव लोकांना व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.’
फ्रेंच भाषेत शब्दाला E जोडला की ते नाम अनेकदा स्त्रीलिंगी होतं. आणि तेच पँटाईन या बदललेल्या नावाचं गमक आहे. महापौर आपल्या संदेशात पुढे म्हणतात, ‘उच्च पदावर असलेल्या महिलांना पुरुष सहकाऱ्यांकडून त्रास होतो. खुद्द देशातल्या राजकारणात, तीन ते चार मंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेत. हे बदलावं यासाठी आम्ही गावाचं नाव प्रतिकात्मकरीत्या बदलतोय.’
गावातल्या स्वराज्य संस्थेचं अधिकृत ट्विटर हँडल बदललेलं नाही. तसंच कागदोपत्री कुठेही नाव बदलण्यात आलेलं नाही. गावाच्या वेशीवर असेलली जुन्या नावाची पाटीची तशीच आहे. पण, लोकांमध्ये बोलताना आता पँटिन ऐवजी पँटाईन म्हणायचं आहे. ट्विटरवर या बदलाची खिल्लीही उडवली जातेय. आणि अनेकदा कौतुकही झालंय.
जागतिक अर्थविषयक व्यासपीठ दरवर्षी स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या पगारातल्या तफावतीवरून देशांची यादी जाहीर करत असतं. त्या यादीत फ्रान्स देश पंधराव्या स्थानावर आहे. म्हणजे त्यांच्याकडे पगारातली तफावत जास्त आहे. देशात अलीकडे एलिझाबेथ बॉर्न या महिला पंतप्रधान झाल्या. पंतप्रधानपदावर बसलेल्या त्या फक्त दुसऱ्या महिला आहेत.
पँटाईन विषयी थोडसं Where is Pantine Located?
पँटाईन हे राजधानी पॅरिसचंच एक उपनगर आहे. राजधानीच्या ईशान्येला वसलेलं हे शहर सीन नदीच्या काठावर वसलंय. पॅरिसपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात 2000 च्या वर बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्य कार्यालयं आहेत. त्यामुळे शहराचं औद्योगिक महत्त्व मोठं आहे. शिवाय कारखानेही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं प्रदूषणाची समस्या नेहमी जाणवते.
शहराची लोकसंख्या 60,000 च्या आसपास आहे. आणि यात महिलांचं प्रमाण 50.7% तर पुरुषांचं प्रमाण 49.3% इतकं आहे.