कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत तुमचे जर खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. EPFO ने आपल्या देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशातील काही राज्यात पीएफ फंडाच्या बाबतीत नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत EPFO ने एक निवेदन जाहीर केले आहे.
फसवणुकीला बळी पडू नका
EPFO ने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की खातेदारांकडे EPFO च्या नावाने कुणी व्यक्ती फोन आणि ईमेलद्वारे खात्याचे डीटेल्स, मोबाईल नंबर, ओटीपी मागत असेल तर शेअर करू नये. EPFO अशाप्रकारे खातेदारांकडून कुठलीही माहिती मागवत नाही असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.
काही सायबर चोर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नावाशी साधर्म्य असलेले इमेल-आयडी बनवून खातेदारांना मेल करत आहेत आणी त्यांच्याकडून त्याच्या खात्यासंदर्भात माहिती मागवत आहेत. या प्रकारातून काही खातेदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्रकरणे देखील समोर आली होती.
#Beware of fake calls/messages. EPFO never asks its members to share their personal details over phone, e-mail or on social media.#epfowithyou #epf #epfo #passbook #HumHaiNa #Alert #staysafe #पीएफ #AmritMahotsav@PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @PIB_India pic.twitter.com/smn2HIQw4m
— EPFO (@socialepfo) October 16, 2023
सोशल मिडियापासून सावधान
सोशल मिडीयावर देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नावाने काही बनावट मेसेजेस व्हायरल होत आहेत, तसेच EPFO च्या नावाने काही बनावट खाती देखील सोशल मिडीयावर सक्रीय आहेत. या खात्यांवरून देखील ग्राहकांशी संपर्क साधला जात असून, त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती मागितली जात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून EPFO कुठलीही माहिती मागवत नाही असेही EPFO ने त्यांच्या खातेदारांना सूचित केले आहे.
'सावध राहा, सतर्क रहा'
ईपीएफओने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवर दिलेल्या माहितीमध्ये सदस्यांना बनावट कॉल आणि मेसेजपासून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.ईपीएफओने या मेसेजसोबत एक पोस्टरही शेअर केले आहे, ज्यामध्ये 'सावध राहा, सतर्क रहा' असे लिहिले आहे. तुमचा UAN/पासवर्ड/PAN/आधार/बँक खाते तपशील/OTP किंवा इतर कोणतेही वैयक्तिक किंवा आर्थिक तपशील कधीही कोणाशीही शेअर करू नका, असे EPFO ने बजावले आहे. जर तुम्हाला असे बनावट कॉल/मेसेज आले तर तुम्ही ताबडतोब स्थानिक पोलिस/सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करावी असे देखील EPFO निवेदनात म्हटले आहे.