संघटित क्षेत्रातील नव्या रोजगारांच्या संख्येत जून महिन्यात मोठी वाढ झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून 2023 या महिन्यात एकूण 11 लाख नव्या रोजगाराची नोंदणी झाली आहे. ऑगस्ट 2022 नंतर पहिल्यांदाच एका महिन्यात रोजगार वाढ दिसून आली.
'ईपीएफओ'च्या आकडेवारीनुसार मे 2023 मध्ये 9 लाख 20 हजार नव्या नोकऱ्यांची नोंद झाली होती. सप्टेंबर 2022 नंतर एकाच महिन्यात 10 लाख नोकऱ्यांची नोंद झाल्याचे दिसून आले.
जून महिन्यात 2 लाख 80 हजार महिलांना पहिल्यांदाच नोकरी मिळाली आहे. गेल्या 11 महिन्यात नोकरीत नव्याने रुजू होणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. जूनमधील ईपीएफओमध्ये नोंद झालेल्या महिलांची संख्या 3 लाख 90 हजार इतकी आहे.
या महिन्यात नोकरी मिळालेल्या 18 ते 25 वयोगटातील तरुणांचे प्रमाण 57.87% इतके आहे. यातून संघटित क्षेत्रात पहिल्यांदाच नोकऱ्या मिळणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे.
जूनमध्ये एक नोकरी सोडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नोकरीमध्ये रुजू होणाऱ्यांची संख्या 12 लाख 60 हजार इतकी होती. जून महिन्यात निव्वळ 17 लाख 80 हजार नोकऱ्यांची नोंद झाली होती. याच महिन्यात 3491 कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ईपीएफओमध्ये नोंद केली.