देशातील तांदळाचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाची (Non Basmati rice) निर्यात बंद केली. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून या खरीप हंगामामध्ये देशातील तांदूळ उत्पादकांकडून तब्बल 521 लाख टन तांदळाची खरेदी (Rice Procurement) केली जाणार आहे. गेल्या वर्षी 496 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
या राज्यातून होणार खरेदी
केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग आणि भारतीय अन्न महामंडाळाच्या बैठकीमध्ये तांदूळ खरेदी संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये केंद्र सरकार या खरीप हंगामात 521लाख टन तांदळाची खरेदी करणार आहे. त्यामध्ये पंजाब (122 LMT), छत्तीसगड (61 LMT)आणि तेलंगणा (50 LMT), ओडिशा (44.28 LMT), उत्तर प्रदेश राज्यातून (44 LMT), हरियाणाकडून (44 LMT) मध्य प्रदेश (34 LMT), बिहार (30 LMT), आंध्र प्रदेश (25 LMT), पश्चिम बंगाल (24 LMT) आणि तमिळनाडू (15 LMT) या राज्याकडून तांदूळ खरेदी केला जाणार आहे.
तांदळाचे भाव स्थिर राहणार
केंद्र सरकारने जुलै महिन्यात नॉन बासमती तांदूळ निर्यात करण्यास प्रतिबंध घातला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे देशातील तांदळाच्या किंमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे. तसेच केंद्र सरकार राज्यांकडून तांदूळ खरेदी करणार असल्याने तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
1022.51 लाख हेक्टर खरीपाची पेरणी
देशात आताच्या खरीप हंगामामध्ये एकूण 1022.51 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे भाताची लागण 360.79 लाख हेक्टरवर झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून या खरीप हंगामाममध्ये 33.09 लाख टन भरड धान्य खरेदी करण्याचे नियोजित आहे.