• 07 Dec, 2022 09:55

Electronics Mart India स्टॉकची शेअर मार्केटमध्ये जोरदार एंट्री; स्टॉक ठेवायचा की विकायचा?

Electronics Mart India Share Listing

Electronics Mart India Stock Price : इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर्स सोमवारी 52 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाला. शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते अग्रेसिव्ह गुंतवणूकदार हा शेअर दीर्घकाळापर्यंत ठेवू शकतात.

Electronics Mart India Share Price: इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या शेअर्सची सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर) शेअर बाजारात जोरदार लिस्टिंग झाली. IPO अंतर्गत इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडियाच्या आयपीओ प्राईस बॅण्डवर सर्वाधिक किंमत 59 रुपये होती. पण लिस्टिंगच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडियाचा शेअर बीएसईवर 89.40 रुपयांवर सूचीबद्ध झाला. गुंतवणूकदारांना एका झटक्यात प्रत्येक शेअरवर 51 टक्के परतावा मिळाला. सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात Volatility असतानाही या शेअर्समधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. आजही या शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात 10 टक्क्यांनी वाढ दिसून आली. त्यामुळे आता गुंतवणूकदारांनी या शेअर्सबद्दल पुढील रणनीति काय ठरवावी, याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे.

Electronics Mart India Ltd Share Price Chart
 

शेअर्सचे ठेवायचे की विकायचे?

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर (Pravesh Gaur, Senior Technical Analyst, Swastika Investmart Limited) म्हणतात की, आयपीओ प्राईस बॅण्डच्या किमतीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक्स मार्ट 52 टक्के प्रीमियमने सूचीबद्ध (Listing) झाला आहे. गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये इंटरेस्ट दाखवल्यामुळे याचे लिस्टिंग चांगले झाले. इलेक्ट्रॉनिक मार्ट IPO चे मूल्यांकन चांगले होते. तसेच कंपनीचे फ्युचर प्लॅनसुद्धा ग्रोथ देणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यावर विश्वास दर्शवत चांगला रिस्पॉन्स दिला. कंपनीचे लिस्टिंग चांगले झाल्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाची रिलायन्स रिटेल, क्रोमा यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा सुरू होईल. सध्या इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनी ही ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स किरकोळ विक्री क्षेत्रातील भारतातील चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीचे बहुतेक स्टोअर्स हे  तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहेत.

ग्राहकोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लोकांकडूनही या क्षेत्राला भरपूर मागणी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा राहिली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या गुंतवणूकदारांना पैसे गुंतवून ठेवण्यास काही अडचण नाही. ते दीर्घ काळासाठी यात गुंतवणूक करू शकतात, अस तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण ज्यांच्याकडे पुरेसा निधी नाही किंवा ज्यांना मिळालेला परतावा पुरेसा वाटत आहे; त्यांनी नफा बुक करून यातून बाहेर पडावे, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स मार्टला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद!

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या IPO ला गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूणच या आयपीओचे सब्स्क्रीप्शन 72 पटीने झाले होते. हा IPO पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Investment-QIB) 50 टक्के राखीव होता आणि यात 169.54 पटीने सब्स्क्रीप्शन झाले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) 35 टक्के आरक्षित होते आणि तो 19.72 पटीने सब्स्क्राईब झाला होता. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non-Institutional Investor-NII) यात 15 हिस्सा राखीव होता. तो 63.59 पटीने सब्स्क्राईब झाला होता.

(डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त केलेली मते ही विविध तज्ज्ञांची असून यात महामनी डॉट कॉमची ही वैयक्तिक मते नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लांगारांची मदत घ्या.)